Tur Rate : देशात तुरीचे दर का वाढले?

मागील खरिपात तूर उत्पादनात (Tur Production) मोठी घट झाली. मात्र विक्रमी आयातीमुळे (Record Tur Import) दर दबावात होते. शेतकऱ्यांना खुल्या बाजारात हमीभावही (Tur MSP) मिळाला नाही. परंतु तुरीच्या दरात आता वाढ झाली आहे.
Tur Rate
Tur RateAgrowon

आजचं मार्केट बुलेटीन. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी.

शेतीमालचे वायदे सुरु करण्याची मागणी

केंद्र सरकारने २० डिसेंबर रोजी प्रमुख शेतीमालाच्या वायद्यांवर बंदीची कुऱ्हाड चालवली. त्यात सोयाबीन, सोयातेल, कच्चे पामतेल, मूग, गहू, बिगर बासमती भात, मोहरी, मोहरी तेल, हरभरा यांचा समावेश आहे. ही बंदी २० डिसेंबर २०२२ पर्यंत असणार आहे. एनसीडीईएक्सवरील वायद्यांमुळे सट्टेबाजी आणि साठेबाजी होत असल्याचं सरकारचं म्हणणं होतं. मात्र वायद्यांतून शेतकऱ्यांना शेतीमालाचा पुढील काही महिन्यांतील दराची माहिती मिळते. यातून शेतकऱ्यांना कोणत्या पिकाची पेरणी करावी, शेतीमाल केव्हा विकावा, जोखीम व्यवस्थापन कसं करावं याचा निर्णय घेण्यास मदत होते. त्यामुळे सरकारने शेतीमालाचे वायदे पुन्हा सुरु करावेत, अशी मागणी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी केली आहे.

खाद्यतेलाचे दर अजूनही गेल्या वर्षीपेक्षा जास्तच

देशात खाद्यतेलाचे दर कमी झाल्याचा दावा केंद्र सरकार करतंय. गेल्या महिन्याच्या तुलनेत खाद्यतेलाचे दर २ ते ७ टक्क्यांनी कमी झाले. मात्र खाद्यतेलाचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत अजूनही ३ ते २१ टक्क्यांनी जास्तच आहेत. केंद्र सरकारची आकडेवारीच सांगतेय तसं. केंद्रीय ग्राहक आणि सार्वजनिक वितरण विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या पामतेलाचे दर प्रतिलटर १४४ रुपयांवर आहेत. सोयाबीन तेल १६४ तर सूर्यफुल तेल १८५ रुपये प्रतिलिटर आहे. पुणे आणि मुंबई या शहरांत सोयाबीन तेल सध्या सरासरी १८० रुपयाने विकले जात आहे. एका ब्रॅँडच्या तेलाच्या किंमती सगळीकडे सारख्या असाव्यात, अशा सूचना सरकारने दिल्या आहेत. परंतु त्याचे पालन होताना दिसत नाही.

२० लाख टन गहू निर्यातीला हिरवा कंदील?

केंद्र सरकार २० लाख टन गव्हाच्या निर्यातीला हिरवा कंदील दाखवण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने १३ मे रोजी गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यापूर्वी ज्या व्यहारांमध्ये लेटर ऑफ क्रेडीट (Letter of Credit- LC) वितरित करण्यात आले होते, त्यांना या बंदीतून वगळण्यात आले होते. परंतु एलसी असल्यामुळे निर्यातीला परवानगी द्यावी, अशा अर्जांचा सरकारकडे पाऊस पडला. एकूण अर्जांचा विचार करता सुमारे ५० लाख टन गहू निर्यातीला परवानगी मागण्यात आली होती. त्यामुळे विदेश व्यापार महासंचालनालयाने या अर्जांची कडक छाननी करण्याचा निर्णय घेतला. ही छाननी सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. त्यानुसार केवळ २० लाख टन गव्हाच्या निर्यातीलाच सरकार परवानगी देण्याची चिन्हे आहेत.

भात लागवड घटल्याने सरकार काळजीत

देशात यंदा माॅन्सूनचा पाऊस उशीराने सुरु झाला. बहुतेक भागांत पेरणीयोग्य पाऊस झाला नव्हाता. त्यामुळे भात पेरणी धीम्या गतीने झाली. आता पावसाची स्थिती काहीशी सुधारली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने जोर धरला. मात्र भात लागवड गेल्या वर्षीच्या तुलनेत अजूनही २४ टक्क्यांनी कमी आहे. देशात शुक्रवारपर्यंत सुमारे ७२ लाख हेक्टरवर भात लागवड झाली. दुसरीकडे देशातून तांदूळ निर्यात जोमाने सुरुये. गव्हामध्ये सरकारचे हात पोळले आहेत. त्यामुळे सरकारची भिस्त खरिपातील तांदूळ उत्पादनावर आहे. खरिपात भाताची लागवड घटली तर सरकार तांदूळ निर्यातीवर बंधने घालायला मागे पुढे बघणार नाही, असे जाणकारांनी सांगितले.

देशात तुरीचे दर का वाढले?

देशात मागील हंगामात तुरीचे उत्पादन (Tur Production) कमी झाले. परंतु तरीही तुरीला चांगला दर (Tur Rate) मिळाला नाही. कारण सरकराने आधीच्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट तूर आयात (Tur Import) केली. मागील हंगामात सरकारने तुरीसाठी प्रति क्विंटल ६३०० रुपये हमीभाव (Tur MSP) जाहीर केला होता. परंतु खुल्या बाजारात तुरीला ६ हजार रुपयांपेक्षाही कमी दर मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करून तूर खुल्या बाजारात विकावी लागली. मात्र मागील महिनाभरापासन बाजारात तुरीची आवक घटलीय. तर मागणी वाढलीय. त्यामुळे तुरीला उठाव मिळाला. तर दुसरीकेड निर्यातदार देशांतही तुरीचे दर वाढले. भारतात प्रामुख्याने आफ्रिकी देशांतूनच तुरीची आयात होते. या देशांत सध्या तूर तेजीत आहे. त्याचा परिणाम भारतातही दिसून आला. देशात मागील आठवडाभरापासून तुरीचे दर वाढलेत.

आज म्हणजेच ११ जुलैला सुदान तुरीचे दर प्रतिक्विंटल ७०६५ रुपये होते. मोझांबिक तूर ५६७० रुपये प्रतिक्विंटल तर मालावीच्या तुरीला ५१०० रुपये दर मिळाला. बर्माची तूर ७००० रुपयाने विकली गेली. या देशांतून पुढील काही दिवसांत तुरीची निर्यात होणार आहे. देशातील नवीन तूर बाजारात येण्यास आणखी खूप उशीर आहे. तसेच यंदा तूर लागवडही कमी होताना दिसत आहे. त्यामुळे पुढील हंगामातील उत्पादनाविषयी अनिश्चितता निर्माण झालीय. परिणामी पुढील काळात दरवाढ होण्याचा अंदाज बांधून स्टाॅकिस्ट तूर बाहेर काढत नाहीयेत. त्यामुळे खुल्या बाजारात दरवाढ दिसून येतेय. सोमवारी महाराष्ट्रात तुरीला सर्वसाधरण ६ हजार २०० ते ६ हजार ७०० रुपये दर मिळाला. तर देशातील सर्वसाधारण दरपातळी ६ हजार ३०० ते ७००० रुपयांच्या दरम्यान होती.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com