Tur Import : आफ्रिकेतून तूर आयात का वाढतेय?

केंद्र सरकार देशात तुरीचे दर कमी असो वा जास्त आयात करतच असते. भारताचा मुख्य तूर पुरवठार देश अशी म्यानमारची ओळख होती. मात्र मागील पाच वर्षांमध्ये म्यानमारमधील तूर उत्पादन आणि निर्यात कमी होत गेली. तर आफ्रिकेतील टंझानिया, मोझांबिक आणि मालावी देशातील उत्पादन आणि भारताला होणारी निर्यात वाढली.
Tur Import
Tur ImportAgrowon

सोयाबीनचे दर स्थिरावण्याची शक्यता

1. अपेक्षेपेक्षा कमी पेरणी आणि पिकाचं होणारं नुकसान, यामुळं शेतकऱ्यांना यंदा सोयाबीन पिकाकडून मोठी अपेक्षा आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सलग ८ ते १० दिवस पाऊस झाला होता. तर आता मागील दोन दिवस देशातील अनेक भागांत जोरदार पावसानं हजेरी लावलीय. त्याचा फटका सोयाबीन पिकाला बसतोय. सध्या काही बाजारांमध्ये नव्या सोयाबीनची आवक वाढतेय. मात्र ओलावा अधिक असल्यानं दर दबावात आहेत. तसेच मागील हंगामातील सोयाबीनलाही ४ हजार ८०० ते ५ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळतोय. हंगामाच्या सरुवातीला हा दर टिकून राहू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

कापसाचे दर टिकून राहणार

2. देशात मागील आठवड्यापर्यंत कापसाची लागवड गेल्या वर्षीपेक्षा जवळपास साडेसात टक्क्यांनी अधिक होती. आता लागवडीचा कालावधी जवळपास संपलाय. नव्या कापसाची आवकही हळूहळू वाढतेय. हरियाणा आणि पंजाबमध्ये आगाप लागवडी आता वेचणीला आल्या आहेत. तर महाराष्ट्र आणि गुजरातमधील काही बाजारांमध्येही कापूस विक्रीला येतोय. सध्या उद्योगांकडून कापसाला कमी उठाव दिसतोय. मात्र नव्या कापसात ओलावा अधिक असूनही ८ हजार ८०० ते १० हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय. त्यामुळे कापसाची आवक वाढल्यानंतर मागणी वाढून दर टिकून राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

टोमॅटोची आवक वाढण्याची शक्यता कमी

3. बाजारात सध्या टोमॅटोला चांगला दर मिळतोय. बाजारातील आवक मर्यादीत असल्यानं दर टिकून आहेत. मात्र मागणी वाढली आहे. राज्यातील वेगवेगळ्या बाजार समित्यांमधील आवक कमी जास्त आहे. पुणे, मुंबई, नागपूर आणि नाशिक बाजारांमध्ये आवक ५०० ते १५०० क्विंटलच्या दरम्यान आहेत. तर इतर बाजारांमधील आवक ही ५० क्विंटलच्या दरम्यान होतेय. सध्या बाजारात टोमॅटोला प्रति क्विंटल २ हजार ५०० ते ४ हजार रुपयांचा दर मिळतोय. टोमॅटोची आवक लगेच वाढण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे टोमॅटोचा हा दर पुढील काही दिवस टिकून राहण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

हिरव्या मिरचीचा ठसका कायम

4. बाजारात हिरव्या मिरचीचा ठसका कायम आहे. राज्यात मागील दोन महिन्यांपासून हिरव्या मिरचीची आवक मर्यादीत आहे. तर सणांमुळं हिरव्या मिरचीला मागणी वाढलेली दिसतेय. त्यामुळं दरही चांगला मिळतोय. सध्या राज्यातील सर्वच बाजारांमध्ये हिरव्या मिरचीची दैनंदिन आवक सरासरीच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळं सरासरी ३ हजार ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळतोय. हिरवी मिरची पुढील दोन महिने भाव खाण्याची शक्यता असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं.

आफ्रिकेतून तूर आयात का वाढतेय?

5. देशात सध्या तुरीचे दर (Tur Rate) वाढलेले आहेत. मात्र देशात तुरीचे दर कमी असो वा जास्त, सरकार आयात (Tur Import) करतच असते. भारताचा तुरीचा मुख्य पुरवठार (Tur Exporter) हा म्यानमार होता. मात्र मागील पाच वर्षांमध्ये म्यानमारमधील तूर उत्पादन (Tur Production) आणि निर्यात (Tur Export) कमी होत गेली. तर आफ्रिकेतील उत्पादन आणि भारताला निर्यात वाढली. मात्र याचा फटका देशातील तूर उत्पादकांना बसतोय. केंद्रानं मागील हंगामात तुरीला प्रति क्विंटल ६ हजार ३०० रुपये हमीभाव जाहीर केला होता. मात्र शेतकऱ्यांकडे तूर आहे तोपर्यंत बाजार हमीभाव गाठणार नाही, याची काळजीही सरकारनं घेतली. विक्रमी ८ लाख ६० हजार टन तूर आयात केली. हा अनुभव फक्त याच वर्षात आला नाही तर यापूर्वीही असचं झालंय.

देशात उत्पादन वाढल्यानंतर सरकार खरेदी करत नाही. बाजारात दर पाडले जातात. त्यामुळं पुढच्या हंगामात शेतकरी लागवड कमी करतात. हे चक्र मागील अनेक वर्षापासून सुरुच आहे. परिणामी तूर उत्पादनही कमी जास्त होत राहतं. मग कमी पुरवठ्याच्या नावाखील पुन्हा आयात केली जाते. आफ्रिकेतील टंझानिया, मोझांबिक आणि मालावी या देशांमध्ये जवळपास ६ ते ७ लाख टन तूर उत्पादन होतं. तसंच या देशांतील तूर सप्टेंबर महिन्यात बाजारात येते. नेमकं याच काळात देशात सणांमुळं मागणी वाढलेली असते. त्यामुळं आपसूकच या देशांतून आयात वाढते. आताही या आयातीचा देशातील बाजारावर दबाव येतोय. त्यामुळं सध्या दर काहीसे नरमले आहेत. मात्र देशातील तूर उत्पादन घटण्याची शक्यता असल्यानं तुरीला ७ हजार ते ८ हजार रुपये दर कायम राहू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com