जागतिक गहू टंचाई दोन वर्षे राहणार?

जगातील एकूण गहू पुरवठ्यापैकी ३० टक्के गहू पुरवठा रशिया आणि युक्रेनमधून होतो. मात्र युद्धामुळे युक्रेनमधील उत्पादन आणि निर्यात मंदावली आहे. रशियाच्याही निर्यातीवर परिणाम झाला.
जागतिक गहू टंचाई दोन वर्षे राहणार?
Wheat ExportAgrowon

आजचं मार्केट बुलेटीन. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाचे दर नरमले

पामतेलाच्या दराने (Palm Oil Rate) आंतरराष्ट्रीय खाद्यतेल बाजाराला (Edible Oil Market) फोडणी दिली होती. त्यामुळे भारतासह महत्वाच्या खाद्यतेल आयातदार (Edible Oil Import) देशांत महागाई वाढली होती. इंडोनेशियाची निर्यात कमी झाल्यानंतर मलेशियात पामतेलाचे दर वाढले होते. मात्र इंडोनेशियाने नुकतेच पामतेल निर्यात शुल्कात कपात केली. त्याचा दबाव मलेशियाच्याही पामतेल दरावर झाला. साडेसहा ते सात हजार रिंगीट प्रतिटनांदरम्यान असलेले दर कमी झाले. रिंगीट हे मलेशियाचे चलन आहे. सध्या पामतेलाचे भाव ५५०० रिंगीट प्रतिटनांपर्यंत खाली आले. यामुळे भारतालाही स्वस्त पामतेल मिळून ग्राहकांना दिलासा मिळू शकतो. परंतु पामतेलाला अचानक मागणी वाढली तर दरात आणखी सुधारणा होऊ शकते, असे जाणकारांनी सांगितले.

जागतिक तांदूळ उत्पादन वाढीचा अंदाज

सध्या जागतिक पातळीवर अन्नधान्य टंचाईची (Food Crisis) स्थिती आहे. त्यामुळे इतर शेतीमालासह तांदळाचेही दर (Rice Rate) वाढले. उत्पादनात झालेली घट हे यामागचे मुख्य कारण आहे. परंतु २०२२-२३ या वर्षात जागतिक तांदूळ उत्पादनात गेल्यावर्षीच्या तुलनेत १७ लाख टनांनी वाढ होईल. चालू हंगामात जागतिक तांदूळ उत्पादन ५ हजार १५३ लाख टनांवर पोचेल, , असा अंदाज व्यक्त होत आहे. तर ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, बर्मा, इंडोनेशिया, इराण, नेपाळ, पाकिस्तान आणि थायलंड या देशांत एक लाख टनाने उत्पादन वाढेल. तर भारतातील उत्पादन ८४ हजार टनांनी वाढून १३०५ लाख टनांवर पोचेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. सध्या भारतातून तांदूळ निर्यात वेगाने सुरु आहे. माल उपलब्ध असल्याने इतर देशांच्या तुलनेत भारताचा तांदूळ स्वस्त आहे. पुढील हंगामातही उत्पादन वाढल्यास निर्यातही वाढू शकते.

गुऱ्हाळघरांना जाणाऱ्या उसाला एफआरपीची मिळण्याची शक्यता

राज्यात गुऱ्हाळघरांची संख्या मोठी आहे. साखर कारखान्यांनी ऊस नेला नाही तर शेतकऱ्यांना गुऱ्हाळघारांचा आधार मिळतो. मात्र या उसाला एफआरपी मिळत नाही. तसेच गुऱ्हाळघरांना घातलेल्या उसाची किंमत एफआरपीप्रमाणे दिली जाते अथवा नाही याबाबत राज्य सरकारकडे अधीकृत माहिती नाही. त्यामुळे गुऱ्हाळघरे आणि खांडसरी उद्योगांच्या उसाला एफआरपी लागू करण्यासाठी राज्य सरकारने अभ्याससमिती नेमली आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली नेमेलेली ही समिती दोन महिन्यांत आपला अहवाल सादर करणार आहे. या उसाला एफआरपी लागू झाली तर ऊस उत्पादकांना मोठ दिलासा मिळेल.

भारताकडून पहिल्यांदा नारळतेल घेण्याच्या चीनच्या हालचाली

जागतिक पातळीवर नारळ उत्पादनात भारत आघाडीवर आहे. भारत अनेक देशांना नारळ तेल पुरवतो. मात्र चीनने आजवर कधीही भारताकडून नारळ तेल आयात केलेले नाही. परंतु सध्या भारतीय नारळ तेलाचे दर प्रतिस्पर्धी फिलिपाईन्स आणि इंडोनेशियातील दरांपेक्षा कमी आहेत. त्यामुळे चीन भारताकडून नारळ तेल आयात करण्याचा विचार करत आहे, असे सूत्रांनी सांगितले. कोकोनट डेव्हलपमेंट बोर्डाने यासंदर्भात चीनमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला आहे. नारळ तेल निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया पार पाडण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या नारळ तेलाचे दर १७५८ डॉलर्स प्रति टनांवर आहेत. या तुलनेत भारतीय नारळ तेलाचे दर १९४७ डॉलर्स प्रति टन आहेत. मात्र आयात आणि इतर खर्च गृहित धरता भारतीय तेल चीनला स्वस्त पडते, असे जाणकारांनी सांगितले.

जागतिक गहू टंचाई दोन वर्षे राहणार?

जगातील एकूण गहू पुरवठ्यापैकी (Wheat Supply) ३० टक्के गहू पुरवठा रशिया आणि युक्रेनमधून (Russia Ukraine War) होतो. मात्र युद्धामुळे युक्रेनमधील उत्पादन आणि निर्यात मंदावली आहे. रशियाच्याही निर्यातीवर परिणाम झाला. क्रेनचे कृषी मंत्री मायकोला सोलस्की यांच्या मते या युद्धामुळे केवळ चालू हंगामाच नाही तर पुढील तीन हंगामामध्ये जागतिक पातळीवर गव्हाची टंचाई निर्माण होईल. ज्यामुळे गव्हाच्या किंमती वाढून जगाल फटका बसेल. युक्रेनच्या कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार, रशियन आक्रमणामुळे युक्रेनमधील २४ लाख हेक्टर जमीनीवर लागवडहोऊ शकली नाही. त्याचा फटकाही युक्रेनला सोसावा लागत आहे. आजवर युक्रेनमधील ४२ हजार शेळ्या आणि मेंढ्या, ९२ हजार गाई आणि २ लाख ५८ हजार वराह, ५७ लाख कोंबड्या या युद्धामध्ये मारल्या गेल्या. रशियन आक्रमणामुळे केवळ शेतमालाच्या मुक्त निर्यातीवर परिणाम झाला नाही तर जगभरातील ४०० दशलक्ष लोकांच्या अन्न सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचे युक्रेनमधील जाणकारांचे मत आहे.

युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात तेलबिया आणि अन्नधान्य पिकांचं उत्पादन होते. मात्र २४ फेब्रुवारीपासून रशियाने सुरू केलेल्या आक्रमणामुळे युक्रेनची निर्यात ठप्प झाली. कारण रशियाने युक्रेनमधील काळ्या समुद्रातील निर्यात मार्ग बंद केले. त्यामुळे युक्रेन रेल्वे, नदी आणि रस्त्यावरून निर्यात करण्याचा प्रयत्न करतो आहे. पण त्यात पूर्णपणे यश आले नाही. त्यामुळे जागतिक बाजरातील धान्य, खाद्य तेल, खत आणि उर्जेच्या किंमतीमध्ये वाढ झाली. गव्हाचे उत्पादन केवळ याच हंगामात नाही तर पुढील दोन हंगामातही कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर गहू टंचाई कायम राहून दर तेजीत राहतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com