
आजचं मार्केट बुलेटीन. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी.
सूर्यफुल, सोयातेल आयातीचे नियम जाहीर
1. विदेश व्यापार महासंचालनालयानं कच्चे सोयातेल आणि सूर्यफुल तेल आयातीसाठीचे नियम जाहीर केलेत. प्रत्येकी २० लाख टन सोयातेल आणि सूर्यफुल तेल आयात करता येईल. प्रत्येक आयातदाराला दोन लाख टन सोयातेल किंवा सूर्यफुल तेल आयात करण्याची परवानगी देण्यात आलीय. ही आयात ३० जून २०२३ पर्यंत करता येईल. कच्च्या पामतेल आयातीसाठी ९९ तर सोयातेल आयातीसाठी ८५ अर्ज आलेत. आयातदारांना प्रक्रिया क्षमतेचं प्रमाणपत्र सादर करावं लागेल. या आयातीवर शून्य टक्के शूल्क असेल. या आयातीमुळे सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होणाराय.
ब्राझीलमध्ये साखर उत्पादनात २३ टक्के घट
2. जगात सगळ्यात जास्त ऊस पिकवणाऱ्या ब्राझीलमध्ये साखर उत्पादनात मोठी घसरण झालीय. १५ जूनच्या आकडेवारीनुसार ७२ लाख टन साखर उत्पादन झालंय. गेल्या वर्षी याच कालावधीशी तुलना करता उत्पादन २३.६ टक्के घटलंय. त्यामुळे आयसीई वायदेबाजारावर साखरेचा वायदा मजबुत झालाय. भारताने गेल्या महिन्यात साखर निर्यातीवर बंधनं घातली. त्यामुळे वायदेबाजारात तेजीचं वातावरण आहे. भारताने जुलै महिन्यासाठी २१ लाख टन साखरेचा कोटा जाहीर केलाय. पावसाळ्यात साखरेच्या वाहतुकीमध्ये अडथळे येतात. ब्राझीलमधील उत्पादनघटीमुळे भारतातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होण्याची चिन्हे आहेत.
आयातशुल्क वाढवल्याने सोनं महागलं
3. सोन्याच्या आयातीवरील शुल्क वाढवण्यात आलंय. त्यामुळे सोनं आता महाग झालंय. सोन्यावरचं आयातशुल्क ७.५ टक्क्यांवरून थेट १२.५ टक्क्यांवर नेलं आहे. केंद्र सरकारने शुक्रवारी त्यासंबंधीची अधिसूचना काढली. सोने खरेदीमध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून भारतात लोक सोने खरेदीला पहिली पसंती देतात. त्यामुळे सोन्याला नेहमीच मोठी मागणी असते. भारत आपली गरजआयातीच्या माध्यमातून भागवतो. त्यामुळे रूपया कमजोर होतो. सोन्याची आयात मोठ्या प्रमाणावर वाढली, त्यामुळे चालू खात्यातील तूट प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याची आयात कमी करण्यासाठी आयातशुल्क वाढवण्यात आलंय.
कांदा निर्यातीमुळे सरकारी तिजोरीत मोठी भर
4. भारतीय कांद्याला बांगलादेश आणि नेपाळकडून मागणी वाढलीय. त्यामुळे निर्यातीतून डॉलरमध्ये मिळणाऱ्या उत्पन्नात २२ टक्के वाढ झालीय. भारताला २०२१-२२ मध्ये कांदा निर्यातीतून ४६० दशलक्ष डॉलर्स उत्पन्न मिळालं. आधीच्या वर्षी ३७८ दशलक्ष डॉलर्स उत्पन्न मिळलं होतं. रूपयांत हे उत्पन्न बघितलं तर गेल्या वर्षीच्या तुलनेत २१ टक्के वाढ झालीय. २०२१-२२ मध्ये कांदा निर्यातीतून ३४३१ कोटी रूपयांचं उत्पन्न मिळालं. त्या आधीच्या वर्षी २८२६ कोटी रूपये मिळाले होते. डॉलरच्या तुलनेत रूपयाची झालेली घसरण झालीय. तर दुसऱ्या बाजुला वाहतुकीच्या भाडेदरात वाढ झालीय. त्यामुळे निर्यातीमधून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ झालीय.
कडधान्यांचा पेरा वाढणार की घटणार?
5. राज्यात यंदा कडधान्यांचा पेरा मोठ्या प्रमाणावर घटण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामात सोयाबीन आणि कापसाला चांगला भाव मिळाला. पण सरकारच्या धोरणांमुळे कडधान्य पिकांची मात्र वाट लागली. त्यामुळे शेतकरी यंदा कडधान्याचं क्षेत्र कमी करण्याची चिन्हं आहेत. त्यातच यंदा पावसाने ओढ दिलीय. जून महिना संपला तरी सगळीकडे समाधानकारक पाऊस झालेला नाही. कडधान्य पिकांना पेरणीसाठी उशीर झाला तर ही पिकं परतीच्या पावसात अडकतात. त्यामुळे पावसाळा लांबला तर शेतकरी कडधान्यांचा पेरा कमी करतील. जुलैमध्ये पेरण्यांना वेग येईल; परंतु यंदा सरासरीच्या ६० टक्के क्षेत्रावरच कडधान्यांचा पेरा होईल, अशी माहिती राज्याचे कृषी विस्तार संचालक विकास पाटील यांनी दिली. राज्यात कडधान्यांचं क्षेत्र सोयाबीनकडं वळतं होईल, असं ते म्हणाले. राज्यात आतापर्यंत तुरीची सरासरीच्या आठ टक्के, मुगाची १० टक्के आणि उडदाची सात टक्के क्षेत्रावर पेरणी झालीय. कुळीथ, चवळी, मटकी आदी कडधान्य पिकांची केवळ तीन टक्के पेरणी झालीय.
राज्यात कडधान्य पिकांचा पेरा घटला असला तरी देशपातळीवर मात्र थोडंसं वेगळं चित्र आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाकडील ३० जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशातील एकूण कडधान्य पेरणीत गेल्या वर्षीपेक्षा ७ टक्के वाढ झालीय. एकूण सुमारे २८ लाख हेक्टरवर कडधान्यांचा पेरा झालाय. गेल्या वर्षी याच कालावधीत सुमारे २६ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी उरकली होती. तुरीचा पेरा १०.५ लाख हेक्टरवरून सुमारे १२ लाख हेक्टरवर पोहोचलाय. परंतु पुढच्या टप्प्यात कडधान्यांचा पेरा कमी होईल; सोयाबीन, कापूस यासारख्या स्पर्धक पिकांची लागवड वाढेल, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितलंय.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.