Soybean Sowing : सोयाबीनची पेरणी वाढणार की घटणार?

देशात यंदा आतापर्यंत सुमारे ३१ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या पेरणीच्या तुलनेत हे प्रमाण केवळ २६ टक्के आहे. सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (सोपा)ने ही माहिती दिली आहे.
Soybean Sowing
Soybean SowingAgrowon

आजचं मार्केट बुलेटीन. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी.

देशभरात अंड्यांच्या दरात विक्रमी वाढ

देशभरात अंड्याच्या दरामध्ये विक्रमी वाढ झाली आहे. विशेषतः तामिळनाडूमध्ये दरवाढ जास्त आहे. सोयामील, खाद्यतेल व इतर कच्च्या मालाच्या किंमती वाढल्यात. त्यामुळे लेयर आणि ब्रॉयलर कोंबड्यांच्या संगोपनाचा खर्च वाढलाय. त्यामुळे अंड्यांच्या उत्पादनखर्चात वाढ झालीय. तर दुसऱ्या बाजूला भाजीपाला महागल्यामुळे ग्राहक अंड्यांना पसंती देत आहेत. त्यामुळे अंड्यांची मागणी वाढलीय. चेन्नईमध्ये काही रिटेल आऊटलेटमध्ये एक अंडे आठ रूपयाला विकले जात आहे. कोलकत्यामध्ये प्रति नग पाच रूपये ९० पैसे तर मुंबई आणि पुण्यामध्ये पाच रूपये ८५ पैसे दर चालू आहे.

कापसाच्या दरात मोठी घट

देशभरात कापसाचे भाव दहा टक्क्यांनी उतरलेत. तर जागतिक बाजारात कापसाच्या दरात २० टक्क्याहून अधिक घट झालीय. गेल्या सहा महिन्यांतील ही निचांकी भावपातळी आहे. परंतु कापसाच्या दरात मोठी तेजी आल्यानंतर ही घट अपेक्षितच होती, असे बाजारविश्लेषकांनी सांगितले. कापसाच्या बाबतीत मुलभूत घटक मजबूत असल्यामुळे खूप मोठ्या घसरणीची शक्यता नाही. त्यामुळे कापसाच्या पेरण्यांवर या घडामोडींचा परिणाम होणार नाही. गेल्या हंगामात कापसाला चांगला भाव मिळाला. तसेच केंद्र सरकारने कापसाच्या हमीभावातही वाढ केलीय. त्यामुळे यंदा देशात कापसाची लागवड वाढण्याची शक्यता आहे. एकट्या गुजरातमध्ये कापसाचे लागवड क्षेत्र २० ते २५ टक्के वाढण्याची चिन्हे आहेत, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.

भारतीय तांदळाच्या निर्यातीला उठाव मिळणार

बांगलादेशने बिगर बासमती तांदळाच्या आयातीवरचं शुल्क कमी केलंय. त्यामुळे भारतीय तांदळाला निर्यातीसाठी मागणी वाढलीय. त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाचे दर १० टक्क्यांनी वाढलेत. जागतिक बाजारात भारताच्या बिगर बासमती तांदळाचे दर प्रति टन ३५० डॉलरवरुन ३६० डॉलरवर पोहोचलेत. बांगलादेशने तांदळावरचं आयातशुल्क ६२.५ टक्क्यावरून थेट २५ टक्के केलंय. बांगलादेशात सध्या अन्नधान्याचा तुटवडा आहे. रशिया-युक्रेन युद्ध आणि भारताने गव्हाच्या निर्यातीवर घातलेली बंदी यामुळे बांगलादेशची गहू आयात घटली आहे. त्यातच यावर्षी पुरामुळे बांगलादेशातील भातशेतीचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे तांदळाची आयात वाढवण्यासाठी बांगलादेशची धडपड सुरू आहे.

साखरेसाठी दुहेरी दर धोरण लागू करण्याची मागणी

देशातील एकूण साखर उत्पादनापैकी ४० टक्के साखर घरगुती वापरासाठी खर्ची पडते. परंतु उरलेली ६० टक्के म्हणजे सुमारे १६५ लाख टन साखर औद्योगिक उत्पादनांसाठी वापरली जाते. त्यामध्ये शितपेये, मेवा मिठाई, बिस्कीट, चॉकलेट, औषधनिर्मिती वगैरे उद्योगांचा समावेश आहे. सध्या साखरेचा उत्पादनखर्च ३६ ते ३७ रूपये किलो पडतो. साखरेची किमान विक्री किंमत ३१ रूपये आहे. परंतु घरगुती आणि औद्योगिक कारणांसाठी एकाच दराने साखर पुरवली जाते. त्यात बदल करून दुहेरी साखर दर धोरण लागू करावे, अशी मागणी साखर उद्योगातील जाणकारांनी केली आहे. घरगुती वापरासाठी साखरेचा दर प्रति किलो ३५ रूपये तर औद्योगिक वापरासाठी ६५ रूपये ठेवावा, असे त्यांचे म्हणणे आहे.

सोयाबीनची पेरणी वाढणार की घटणार?

पावसाने ओढ दिल्यामुळे देशात सोयाबीनची लागवड (Soybean Cultivation) पिछाडीवर पडली आहे. देशात यंदा आतापर्यंत सुमारे ३१ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी (Soybean Sowing) झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या पेरणीच्या तुलनेत हे प्रमाण केवळ २६ टक्के आहे. सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (Soybean Processors Association Of India) म्हणजे सोपाने ही माहिती दिली आहे. सोपाने पेरणीची आकडेवारी काढण्यासाठी देशभरात सर्वेक्षण केले. त्यातून सोयाबीन पेरणीविषयीचा हा प्राथमिक अंदाज काढण्यात आला आहे. गेल्या वर्षी देशात संपूर्ण खरीप हंगामात सुमारे १२० लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती. यंदा प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये अजून समाधानकारक पाऊस झालेला नाही.

सोयाबीन उत्पादनात मध्य प्रदेशचा पहिला क्रमांक लागतो, तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात सुमारे १८ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या पेरणीच्या तुलनेत हे प्रमाण ४० टक्के भरते. तर मध्य प्रदेशमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १७ टक्के क्षेत्रावर पेरणी उरकली आहे. राजस्थानात गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्के, कर्नाटकात २४ टक्के तर तेलंगणात २५ टक्के क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला आहे. दरम्यान, जुलैच्या मध्यापर्यंत सोयाबीनची पेरणी करता येऊ शकते; त्यामुळे सध्याचे पेरणीचे आकडे कमी दिसत असले तरी काळजीचे कारण नाही, असे ‘सोपा'चे कार्यकारी संचालक डी एन पाठक यांनी सांगितले. गेल्या हंगामात सोयाबीनला विक्रमी दर मिळाला होता. त्यामुळे यंदा शेतकरी सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात वाढवतील, असे मानले जात आहे. परंतु देशात अनेक ठिकाणी अजून पेरणीयोग्य पाऊस झालेला नसल्यामुळे पेरणीचा वेग मंदावलाय. येत्या काही दिवसांत मॉन्सूनची प्रगती कशी राहते, पावसाचे प्रमाण किती राहते यावर सोयाबीनच्या पेरण्यांचं पुढचं गणित अवलंबून आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com