Soybean : सोयाबीन, मक्याचे दर कायम राहणार?

युरोपियन युनियनमधील देशांना सध्या अति उष्णतेचा फटका बसत आहे. त्यामुळे येथील सोयाबीन, मका, गहू, मोहरी आणि सुर्यफुल उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात मका आणि सोयाबीनचा कमी पुरवठा होऊ शकतो.
Soybean & Maize
Soybean & MaizeAgrowon

महिनाभरात गव्हाच्या दरात ६ टक्क्यांची वाढ

देशात गव्हाचं उत्पादन यंदा कमी झालं. त्यातच निर्यात वाढल्यानं दर सुधारले. दर नियंत्रणासाठी सरकारनं गहू निर्यातबंदी केली. तसंच गहू पीठ निर्यातीवरही निर्बंध लादले. मैदा आणि रवा निर्मितीसाठी प्रक्रियादारांकडून खरेदी वाढली. त्यातच बाजारात गव्हाची आवकही कमी झाली. त्यामुळं गव्हाचे दर महिनाभरात ६ टक्क्यांनी सुधारले. २७ जून रोजी देशात गव्हाचा दर सरासरी २०५० रुपये प्रतिक्विंटल होता. त्यात वाढ होऊन २५ जुलै रोजी २१७६ रुपये झाला. गव्हाचे दर लगेच नरमतील, अशी स्थिती दिसत नाही, असं जाणकारांनी सांगितलं.

Soybean & Maize
भारतात Soybean Meal उत्पादन आणि वापर वाढण्याचा अंदाज |Soybean Market|ॲग्रोवन

आयात उडदाचे दर हमीभावापेक्षा अधिक

भारतानं म्यानमारमधून वर्षाला अडीच लाख टन उडीद आयातीचा करार नुकताच केला. मात्र बर्मासह इतर देशांतून उडीद आयात सुरुच आहे. या आयातीमुळं मागीलवर्षी देशातील शेतकऱ्यांना कमी दर मिळाला. कारण आयात होणारा उडीद स्वस्त होता. सध्या देशातील खरीप हंगामातील उडदाचे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. पुढील काही दिवसांत नवीन उडीद बाजारात येईल. मात्र सध्या आयात उडदाचा दर ६ हजार ६०० रुपये, म्हणजेच हमीभावापेक्षा अधिक आहे. बर्मा येथून ९३० ते १०६० डाॅलर प्रतिटनाने उडीद आयात होतोय. रुपयात हा दर ७ हजार ६६५ ते ८ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल होतो. आयात उडीदाचे दर अधिक असल्यानं देशातील शेतकऱ्यांनाही चांगला दर मिळू शकतो, असं जाणकारांनी सांगितलं.

Soybean & Maize
Tur Sowing : जतमध्ये तूर क्षेत्रात ८०० हेक्टरने घट

पामतेल स्वस्त झाल्याने सूर्यफुलतेल आयात घटली

मागीलवर्षी पामतेलाचे दर तेजीत होते. त्यामुळं सूर्यफूल आणि पामतेलाच्या दरातील तफावत कमी झाली होती. परिणामी आयातदारांनी पामतेलाऐवजी सुर्यफूल तेल आयातीला पसंती दिली होती. मात्र रशिया-युक्रेन युद्धामुळं सूर्यफुल तेलाची उपलब्धता कमी झाली. दरही वाढले. त्यामुळं एप्रिल ते जून दरम्यान सूर्यफुल तेल आयात घटली. या काळात ५.६ लाख टन सूर्यफुल तेल आयात झाले. मात्र मागीलवर्षी याच काळात ७.४ लाख टन आयात झाली होती. पामतेलाचा पुरवठा वाढत असताना सूर्यफुल तेल आयात मात्र घटली. त्यामुळं सूर्यफुल तेलाचे दर अद्यापही तेजीत आहेत. इतर खाद्यतेलाचे दर कमी झाले त्या प्रमाणात सूर्यफुल तेल स्वस्त झालं नाही.

Soybean & Maize
Pulses: छत्तीसगडमध्ये कडधान्यांच्या सरकारी खरेदीची हमी

राज्यात मुगाची हमीभावाने खरेदी गरजेची

देशात मूग उत्पादनात गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र ही राज्ये महत्वाची आहेत. गुजरातने उन्हाळी मूग हमीभावाने खरेदीसाठी प्रक्रिया सुरु केली. तर मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांची नोंदणी उद्या संपेल. खरिपातील नवीन मुगाची आवक साधारण १५ ऑगस्टच्या दरम्यान सुरु होईल. सरकारनं यंदा मुगाला ७ हजार ७५५ रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव जाहीर केलाय. मात्र बाजारात सध्या दर कमी आहेत. त्यामुळं महाराष्ट्र सरकारनंही मूग खरेदीसाठी केंद्राकडं पाठपुरावा करावा. हमीभावाने खरेदी केल्यास दराला एक आधार मिळेल. बाजारात दर किमान हमीभावाच्या दरम्यान राहतील, असं जाणकारांनी सांगितलं.

सोयाबीन, मक्याचा दर कायम राहणार?

युरोपियन युनियनमधील देश गहू, बार्ली आणि मक्याची जगाला निर्यात (Maize Export) करतात. गहू निर्यातीत (wheat Export) या देशांचा वाटा सर्वाधिक आहे. युरोपियन युनियनमधील उत्पादनावरून गहू आणि मक्याचा जागतिक पुरवठा (Soybean maize Supply) ठरत असतो, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मागील हंगामात यरोपियन युनियनमधून जवळपास ३०० लाख टन गहू निर्यात झाला होता. तर ऑस्ट्रेलियाने २७५ लाख टनांची निर्यात केली होती. यावरून या देशांचं जागतिक बाजारातील महत्व लक्षात येते. मात्र यंदा युरोपियन युनियनमधील अनेक देशांना अति उष्णतेचा फटका बसतोय. स्पेन, उत्तर फ्रान्स, मध्य आणि उत्तर इटली, मध्य जर्मनी, उत्तर रोमानिया, पूर्व हंगेरी, पश्चिम आणि दक्षिण युक्रेन या देशांमधील पिकांवर अति उष्णतेचा परिणाम होतोय.

अति उष्णतेचा गहू, बार्ली, मका, सोयाबीन, मोहरी आणि सूर्यफूल या पिकांना फटका बसतोय. उच्चांकी तापमान आणि कमी पाऊस, याचा प्रतिकूल परिणाम पिकांवर होतोय. वाढत्या उष्णतेमुळं जलाशयांमधील पाणीसाठेही कमी झाले. त्यामुळं पिकांना सिंचनासाठी पाणी मिळत नाही. सध्या पिके फुलोऱ्याच्या अवस्थेत आहेत. मात्र उष्णतेमुळे फुलगळ वाढली. परिणामी या देशांतील पीक उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळं माॅनिटरींग अॅग्रिकल्चर सर्व्हिसेस अर्थात एमएआरएस या संस्थेने युरोपियन युनियनमधील वसंत ऋतुतील पीक उत्पादनाच्या अंदाजात कपात केली. वसंत ऋतुतील मका, सूर्यफूल आणि सोयाबीन उत्पादन सरासरीपेक्षा ८ ते ९ टक्क्यांनी कमी राहील, असा अंदाज या संस्थेनं व्यक्त केलाय. असे आंतरराष्ट्रीय बाजारात मका आणि सोयाबीनचा कमी पुरवठा होऊ शकतो. त्यामुळं दराला आधार मिळू शकतो, असं जाणकारांनी सांगितलं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com