Green Gram : मुगाचे दर वाढणार का?

देशात मागील आठवड्यापर्यंत मुगाची लागवड जास्त होती. मात्र या आठवड्यात पेरा घटला. त्यातच महत्वाच्या मूग उत्पादक राज्यांमध्ये पिकाला पावसाचा फटका बसतोय. मात्र सध्या अनेक बाजारांमध्ये मुगाचा दर हमीभावापेक्षा कमी आहे.
Green Gram
Green GramAgrowon

मका तेजीतच राहण्याचे संकेत

1. देशात सध्या मका तेजीत आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचा तुटवडा असल्याने दर चढे आहेत. मका दर तेजीत असल्यानं यंदा पेरा मोठ्या प्रमाणात वाढेल, असा अंदाज होता. मात्र लष्करी अळी आणि इतर कीड-रोगांमुळं मका पिकाचं मोठं नुकसान होतं. हा अनुभव असल्यामुळे शेतकरी मक्याला जास्त पसंती देताना दिसत नाहीत. कृषी मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात जवळपास ७९ लाख हेक्टरवर मक्याचा पेरा झालाय. म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा यंदा केवळ अर्धा टक्क्यानं मका लागवड वाढलीय. सध्या मक्याला २ हजार ४०० ते २ हजार ७०० रुपये दर मिळतोय. मक्याच्या दरात पुढील काळात काहीशी सुधारण होऊ शकते, असा जाणकारांचा अंदाज आहे.

Green Gram
Balck Gram : उडदानेही गाठला ८ हजारांचा टप्पा

उडीद यंदाही भाव खाण्याची शक्यता

2. राज्यात लवकर लागवड झालेल्या उडदाची काढणी सुरु झालीये. सोलापूर बाजार समितीत नवीन उडदाची आवक होतेय. या उडदाला प्रति क्विंटल ८ हजार ते ८ हजार १०० रुपये दर मिळाला. तर जुन्या उडदाचे व्यवहार ७ हजार ते ७ हजार ६०० रुपये दराने होत आहेत. देशात अद्यापही उडीद लागवड गेल्या वर्षीपेक्षा कमीच आहे. उडदाचा पेरा १२ ऑगस्टपर्यंत ३४ लाख हेक्टरवर झाला होता. म्हणजेच लागवड गेल्या वर्षीपेक्षा जवळपास ५ टक्क्यांनी कमी आहे. पावसाचा उडीद पिकालाही फटका बसतोय. त्यामुळे उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा उडदाला चांगला दर राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Green Gram
Onion : कांद्यावरील रोग-किडींची लक्षणे, उपाययोजना

कांदा दर अद्यापही दबावातच

3. देशात यंदा अतिउष्णता आणि पावसामुळं कांदा पिकाला मोठा फटका बसला. त्यामुळं उत्पादन घटलं. मात्र सध्या बाजारातील आवक आणि मागणी पाहता दर दबावात आहेत. कांद्याला किमान २२ ते २५ रुपये प्रतिकिलो दर मिळाला तरच पीक घेणं परवडेल, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र बाजारात सध्या ७ ते १५ रुपयांचा दर मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय. मात्र ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात कांद्याची आवक कमी होऊन दरात सुधारणा होऊ शकते, असं जाणकारांनी सांगितलं.

हिरव्या मिरचीचे दर सुधारण्याचा अंदाज

4. मागील काही दिवसांपासून बाजारात मिरचीची आवक कमी होतेय. त्यामुळं मिरचीच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली. आताही अनेक भागांत सलग चार ते पाच दिवस पाऊस झाला. त्यामुळे बाजारातील आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी हिरव्या मिरचीच्या दरात काहीशी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. सध्या राज्यात हिरव्या मिरचीला सरासरी ४ हजार ३०० रुपये क्विंटल दर मिळतोय. आज पुणे बाजारात सरासरी ३ हजार ८०० तर मुंबई बाजारात ५ हजार रुपये क्विंटल दराने हिरवी मिरची विकली गेली.

मुगाचे दर वाढणार का?

5. देशातील बऱ्याच बाजारांत सध्या मुगाचे दर (Green Gram Rate) हमीभावापेक्षा कमी आहेत. मात्र पुढील काळात मुगाच्या दरात (Green Gram Price) सुधारणा होण्याची शक्यता निर्माण झालीये. केंद्रानं यंदा मुगासाठी प्रति क्विंटल ७ हजार ७५५ रुपये हमीभाव (Green Gram MSP) जाहीर केलाय. मात्र खुल्या बाजारात सध्या मुगाला सरासरी ७ हजार ६०० रुपयांचा दर मिळतोय. पण दुसरीकडं मुगाची लागवड (Green Gram Cultivation) मागील आठवडाभरात कमी झाली. मागील आठवड्यापर्यंत देशातील मुगाचा पेरा गेल्या वर्षीपेक्षा अडीच टक्क्यांनी जास्त होता. मात्र आता मुगाखालील क्षेत्र ०.३५ टक्क्यानी कमी झालंय. सध्या जवळपास ३२ लाख हेक्टरवर मुगाचा पेरा झालाय.

राजस्थानमध्ये मुगाची लागवड सर्वाधिक असते. मात्र राजस्थानमधील क्षेत्र यंदा ७९ हजार हेक्टरनं कमी झालंय. यंदा इथं २० लाख हेक्टरवर पेरा झालाय. तर कर्नाटकात मूग लागवडीचं क्षेत्र १५ हजार हेक्टरनं कमी होऊन चार लाख हेक्टरपर्यंत घसरलंय. महाराष्ट्रात मात्र मुगाची पिछाडी जास्त आहे. यंदा महाराष्ट्रात १ लाख हेक्टरनं मुगाचा पेरा कमी झालाय. आतापर्यंत राज्यात केवळ २ लाख ७१ हजार हेक्टर क्षेत्रावर मुगाची पेरणी झालीय. त्यात मुगाच्या पिकाला पावसाचाही फटका बसतोय. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान या तीनही राज्यांत पिकाचं नुकसान होतंय. त्यामुळं उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. मात्र मध्य प्रदेशात मुगाची हमीभावाने खरेदी सुरु झालीये. इतर राज्यांतही हमीभावानं खरेदी सुरु झाली तर दराला आधार मिळेल. तसंच केंद्रानं मूग आयातीचा समावेश प्रतिबंधीत श्रेणीत केलाय. त्यामुळं आयात मर्यादीत राहण्याची शक्यता आहे. मुगाच्या पिकाची स्थिती कशी राहतेय, त्यावर दराचं गणित अवलंबून आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com