Tur Rate : तुरीचे दर दबावात येतील का ?

देशातील तूर पुरवठा यंदा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त होतोय. देशात यंदा कमी लागवड, पावसाने नुकसान आणि कीड-रोगामुळे देशातील उत्पादन कमी राहणार आहे.
Tur rate
Tur rate Agrowon

देशातील तूर पुरवठा यंदा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त होतोय. देशात यंदा कमी लागवड, पावसाने नुकसान (Crop Damage) आणि कीड-रोगामुळे देशातील उत्पादन (National Production) कमी राहणार आहे. नव्या तुरीची आवक डिसेंबर महिन्यापासून वाढेल. मग बाजारात तुरीची आवक वाढल्यानंतर दर (Tur Import Rate)कसे राहतील? आयात तुरीचा बाजारावर दबाव येईल का? याची माहिती आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

कापूस दर स्थिर

आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर सध्या दबावात आहेत. त्याचा परिणाम देशातील कापूस दरावर होतोय. जागतिक बाजारात कापसाला मागणी वाढल्यानंतर दर सुधारण्याचा अंदाज आहे. सध्या आयसीईवर कापसाचे वायदे ७७.२८ सेंट प्रतिपाऊंडवर आहेत. तर देशात ७ हजार ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान कापूस विकला जातोय. आंतरराष्ट्रीय बाजारात दर सुधारल्यास देशातही कापूसाला आधार मिळू शकतो, असं कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं.

Tur rate
Crop Insurance : पीकविमा भरपाईसाठी ४९ लाख पूर्वसूचना

आल्याचे दर दबावात

आल्याचं पीक मागील तीन वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी आतबट्ट्याचं ठरतंय. यंदाही आल्याचे दर दबावात आहेत. त्यातच व्यापारी खेरदी करताना जूनं आणि नवं असा फरक करून दर देत आहेत. ऑक्टोबर महिन्यात पहिल्या २० दिवसांमध्ये आलं उत्पादक भागात जोरदार पाऊस पडला. परिमाणी आल्याच्या गुणवत्तेवरही परिणाम झाला. त्यामुळे शेतकऱ्यांपुढील समस्या आणखी वाढल्या. सध्या बाजारात आल्याची आवक कमीच होत आहे. मात्र आल्याला २ हजार ५०० ते ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय.

गूळ दरात सुधारणा

राज्यात सध्याचे गुळाचे दर काहीसे सुधारलेले दिसतात. दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर गुळाचे सौदे झाले. तसचं राज्यातील ऊस गाळप हंगामाचाही बिगूल वाजलाय. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये बहुतांशी गुऱ्हाळांचीही धुराडी पेटतील. सध्या राज्यात गुळाला प्रतिक्विंटल ३ हजार ५०० ते ५ हजार रुपये दर मिळतोय. गुळाचे दर पुढील काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

मक्याचे दर कमीच

राज्यात काही बाजार समित्यांमध्ये आता नवा मका विक्रीसाठी येतोय. मात्र नव्या मालामध्ये ओलावा जास्त असल्याने दर हमीभावापेक्षा कमी मिळत आहेत. सध्या नव्या मक्याला प्रतिक्विंटल १ हजार ६०० ते १ हजार ९०० रुपये दर मिळतोय. तर जुना मका १ हजार ९०० रुपयांपासून २ हजार ३०० रुपयांपर्यंत विकला जातोय. पुढील महिनाभरात बाजारांमध्ये मका आवक वाढेल. या काळात मक्याला सरासरी २ हजार ते २ हजार २०० रुपये दर मिळू शकतो, असा अंदाज मका व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.

आयात तूर खरेदीचा बाजारावर काय परिणाम होईल?

देशातील तूर पुरवठा यंदा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त होतोय. त्यामुळे दरही तेजीत राहण्याची शक्यता आहे. देशातील नवी तुरीची आवक डिसेंबर महिन्यापासून वाढेल. तर पुढील किमान तीन महीने बाजारात तूर येत राहील. पण यंदा कमी लागवड, पावसाने नुकसान आणि कीड-रोगामुळे देशातील उत्पादन कमी राहणार आहे.

बाजारातील अभ्यासक आणि प्रक्रिया उद्योगाच्या मते देशात यंदा २५ ते २७ लाख टनांच्या दरम्यान तूर उत्पादन होईल. मात्र केंद्राने जवळपास ३९ लाख टन तूर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केलाय. पण सरकार सुधारित अंदाजात उत्पादनाचा आकडा कमी करू शकते, असंही जाणकारांनी सांगितलं. दुसरीकडे देशात दरवर्षी सरासरी ४४ लाख टन तुरीचा वापर होतो. त्यामुळे चालू वर्षात तुरीची टंचाई वाढण्याची शक्यता आहे.

ही टंचाई लक्षात घेऊन केंद्र सरकार आयात तुरीची खरेदी करत आहे. मात्र आफ्रिकेतून तूर आयातीत काही समस्या येत आहेत. तर म्यानमारमध्ये पावसाचा पिकाला फटका बसतोय. त्यातच टंचाई असल्याने प्रक्रिया उद्योगही आयात तूर खरेदी करतोय. त्यामुळे सरकारने जाहीर केलेल्या आधारभूत दरात किती खरेदी होईल, याबाबत शाशंकता आहे. पण सरकारच्या आधारभूत दरापेक्षा बाजारातील दर अधिक राहतील, असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे सध्या तरी तुरीला ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान दर राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com