
१) दोन आठवडे कांद्याचे दर नरमच राहणार (onion rate)
कांद्याचे दर पडल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. काही बाजार समित्यांमध्ये तर शेतकऱ्यांना उलटी पट्टी मिळत आहे. म्हणजे कांदा विकून झाल्यावर शेतकऱ्यांना पैसे मिळण्याऐवजी उलट त्यांनाच आडत्याला पैसे द्यावे लागतात.
कारण कांदा (onion) विकून मिळणाऱ्या पैशातून वाहतुक, हमाली व इतर खर्च भरून निघत नाही. कांद्याच्या दरात पुढील पंधरा दिवस सुधारणा होण्याची शक्यता नाही, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.
सध्या लेट खरिपाचा कांदा बाजारात (onion Market) आहे. त्याची टिकवणक्षमता कमी असते. मार्चच्या मध्यापासून रब्बी कांद्याची आवक सुरू होईल. हा कांदा जास्त काळ टिकतो. त्याची आवक सुरू झाल्यावर परिस्थितीत सुधारणा होईल, असं जाणकारांनी सांगितलं.
२) मोहरी उत्पादन घटल्याचा सोयाबीनला फायदा
यंदा देशात मोहरीची विक्रमी लागवड झाली. त्यामुळे यंदा उत्पादनात विक्रमी वाढ होईल, असा केंद्र सरकारचा सुरूवातीचा अंदाज होता. परंतु प्रतिकूल हवामानाचा फटका पिकाला बसला आहे. आधी कडक थंडी आणि आता उष्णतेची लाट यामुळे मोहरीचे उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत.
यंदा १२० ते १२५ लाख टन मोहरी उत्पादन होईल, असा अंदाज होता; परंतु हवामानाने साथ दिली नाही, असे सॉल्वन्ट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन अर्थात एसईएचे कार्यकारी संचालक बी व्ही मेहता यांनी सांगितले. गेल्या वर्षी १०५ लाख टन मोहरी उत्पादन झालं होतं.
यंदाही तीच पातळी कायम राहील, असे मेहता म्हणाले. मोहरी उत्पादन कमी होणार असल्याने केंद्र सरकारला पामतेल, सोयातेल आणि सूर्यफुल तेलाची आयात वाढवावी लागेल.
दरम्यान या घडामोडींमुळे सोयातेलाची मागणी वाढेल. त्याचा फायदा सोयाबीनला होईल. सोयाबीनमधील दरवाढीला भक्कम आधार मिळेल, असे बाजारअभ्यासकांनी सांगितले.
३) विक्रमी गहू उत्पादनाची सरकारला अजूनही आशा
सध्या उष्णता वाढत असली तरी त्याचा फटका गहू पिकाला फारसा बसणार नाही, असे केंद्रीय कृषी आयुक्त पी के सिंह यांनी सांगितले. दिवसाचे तापमान थोडेसे जास्त आहे, परंतु रात्रीचे तापमान कमी आहे; त्यामुळे गहू पिकावर फारसा परिणाम होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
वाढत्या उष्णतेचा गहू पिकावर काय परिणाम होईल, याचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमली होती. समितीने शेतांवर जाऊन गहू पिकाची पाहणी केली. तसेच हरियाणातील कर्नाल येथे पाच प्रमुख गहू उत्पादक राज्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
यंदा देशातील ७५ टक्के गहू लागवड वेळेवर झाली. तसेच पंजाब, हरियाणामध्ये ५० टक्के क्षेत्रावर तापमानाला सहनशील वाणांची लागवड झालेली आहे.
त्यामुळे यंदा उत्पादनात घट होणार नाही. गेल्या वर्षीपेक्षा उत्पादनात ४.१ टक्के वाढ होईल. यंदा विक्रमी ११२ दशलक्ष टन गहू उत्पादन होईल, असे केंद्रीय कृषी आयुक्तांनी सांगितले.
४) महाराष्ट्र, कर्नाटकात साखर उत्पादन घटणार
दि ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनने देशातील साखर उत्पादनाच्या अंदाजात कपात केली आहे. चालू हंगामात साखरेचे उत्पादन आधीच्या अंदाजापेक्षा १० लाख टन कमी राहील, असे असोसिएशनने म्हटले आहे. यंदा ३३५ लाख टन साखर उत्पादन होण्याचा सुधारित अंदाज देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात आणि कर्नाटकात साखरेचे उत्पादन घटेल. तिथे उसाचे उत्पादन घटले असून साखर उताराही कमी आहे. महाराष्ट्रात गेल्या वर्षी १३७ लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदा मात्र ११३ लाख टन उत्पादनाचा अंदाज आहे.
तर कर्नाटकात साखर उत्पादन ६२ लाख टनावरून ५५ लाख टनावर येण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात मात्र साखर उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी तिथे १०२ लाख टन उत्पादन झाले होते. यंदा १०८ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे.
५) ‘एल-निनो’च्या चर्चेमुळे सोयाबीन, कापसाचे दर वाढणार?
गेल्या काही दिवसांपासून एल-निनो चर्चेत आला आहे. अमेरिकी हवामान संस्था यंदाच्या मॉन्सून हंगामात ‘एल-निनो’चा प्रभाव राहण्याचा इशारा देत आहेत. भारतातील हवामान संस्थांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळला आहे.
एल निनो म्हणजे काय ते आधी समजून घेऊ. प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील भागातील हवेचा दाब वाढलेला असतो, तेव्हा पश्चिमेकडून पूर्व दिशेस वारे वाहतात. त्यासोबत बाष्पाने भरलेले ढग तिकडे वाहून जातात. त्यामुळे पश्चिमेकडील भागात दुष्काळ पडतो तर पूर्वेकडील भागात अतिवृष्टी होते.
थोडक्यात यंदा एल-निनो हा घटक सक्रिय राहिला तर भारत आणि आशिया खंडातील इतर देशांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहील. तर अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना इत्यादी भागांत अधिक पाऊस होईल. ‘एल-निनो’चा अंदाज खरा ठरला तर खरीप पिकांच्या उत्पादनावर परिणाम होईल.
प्रामुख्याने सोयाबीन व इतर तेलबिया, कापूस, मका यांना फटका बसेल. तसेच पाण्याची उपलब्धता कमी झाल्यामुळे रब्बी पिकांवरही परिणाम होऊ शकतो. तसेच फळे व भाजीपाला पिकांवरही उत्पादनघटीचे सावट असेल.
पुढचे दोन-तीन महिने ‘एल-निनो’ची चर्चा कायम राहणार आहे. त्याचा बाजारावर लगेच होणारा परिणाम म्हणजे सोयाबीन, कापूस आणि तुरीच्या दरात वाढ होऊ शकते. कारण पुढच्या हंगामात उत्पादन कमी राहणार असे चित्र निर्माण झाले तर त्याचा बाजारावर लगेच परिणाम होईल.
सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या शेतमालाचे दर वाढतील. अर्थात एल-निनो खरंच येईल का, त्याचा नेमका किती परिणाम होईल, याचा अंदाज आताच बांधणं घाईचं ठरेल. मे महिन्याच्या शेवटी नेमकं चित्र स्पष्ट होईल, असं हवामान तज्ज्ञांनी सांगितलं.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.