Tur Rate : यंदा तूर भाव खाणार का?

पुढच्या १५ दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही तर तुरीचा पेरा २५ टक्के घटेल, असा काही व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. पाऊस व्यवस्थित झाला तरीसुध्दा तुरीच्या लागवडक्षेत्रात ७ ते १० टक्के तुट राहील, असं त्यांचं म्हणणं आहे.
Tur Rate
Tur RateAgrowon

आजचं मार्केट बुलेटीन. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी.

देशात कापूस लागवडीत वाढ

१. जागतिक आणि देशांतर्गत बाजारपेठेत कापसाच्या दरात (Cotton Rate) घट झालीय. परंतु विक्रमी तेजीनंतर ही घट अपेक्षितच होती; त्यामुळे याला बाजारातली पडझड म्हणता येणार नाही, असा जाणकारांचा दावा आहे. यंदाच्या हंगामातही कापसाचे दर चांगले राहण्याची शेतकऱ्यांना आशा आहे. त्यामुळे बाजारातील सध्याच्या घडामोडींचा पेरण्यांवर परिणाम होणार नाही, असं जाणकारांचं म्हणणं आहे. १ जुलै पर्यंतच्या कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार देशात कापसाचा पेरा गेल्या वर्षीपेक्षा ३.८ टक्के वाढलाय. महाराष्ट्रात २३ लाख ६५ हजार हेक्टरवर कापसाचा पेरा झालाय. गेल्या वर्षी हे प्रमाण १९ लाख ५९ हजार हेक्टर होतं. गुजरातमध्ये १० लाख ८६ हजार हेक्टरवर कापसाची लागवड झालीय. गेल्या वर्षी याच कालावधीत ११ लाख ४६ हजार हेक्टरवर लागवड झाली होती. जुलैमध्ये पाऊस चांगला राहील, असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे कापसाचा पेरा वाढण्याची चिन्हे आहेत.

उडदाचे दर चढे राहण्याचा अंदाज

२. सप्टेंबरमध्ये देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तसं झालं तर उडीद पिकाला (Black Gram) फटका बसेल. गेल्या वर्षीही सप्टेंबरमध्ये जास्त पाऊस झाला. त्यामुळे उडदाची काढणी करायला अडचण झाली. यंदा मॉन्सून केरळमध्ये लवकर आला. पण नंतर पावसाने ओढ दिली. त्यामुळे उडदाचा पेरा कमी झालाय. १ जुलै पर्यंतच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षीपेक्षा उडदाचा पेरा ९ टक्के कमी आहे. गेल्या वर्षी सरकारच्या धोरणामुळे उडदाचे भाव नरम राहिले. त्यामुळे उडदाखालचं क्षेत्र भात, मका आणि कापूस या पिकांकडं वळतं होण्याचा अंदाज आहे. त्यातच उडदाची आयात कमी होतेय. सरकारकडे उडदाचा फारसा साठा नाही. यंदाच्या हंगामात सरकार चार लाख टन उडदाचा साठा करणार आहे. या सगळ्या कारणांमुळे यंदा उडदाचे दर चढे राहतील, असा बाजारविश्लेषकांचा अंदाज आहे. अर्थात हा प्राथमिक अंदाज आहे.

भारताच्या गहूनिर्यातबंदीचा बांगलादेश बळी

३. भारताने गव्हाच्या निर्यातीवर बंदी (wheat Export Ban) घालून दीड महिना उलटून गेला. पण अजूनही जागतिक पातळीवर त्याचे पडसाद उमटत आहेत. जागतिक व्यापार संघटनेने म्हणजे डब्ल्यूटीओने भारतावर कठोर शब्दांत टीका केलीय. भारताच्या या निर्णयामुळे जागतिक अन्न संकट गंभीर होईल, या सगळ्याचा फटका गरीब देशांना मोठ्या प्रमाणावर बसेल, असा इशारा डब्ल्यूटीओने दिलाय. बांगलादेश हा भारताच्या निर्णयाचा सगळ्यात मोठा बळी ठरला आहे. गहू निर्यातबंदीच्या निर्णयापूर्वी बांगलादेशला भारतीय गव्हासाठी प्रति टन ४०० डॉलर्स मोजावे लागत होते. आता बांगलादेशला गव्हासाठी खूप जास्त खर्च करावा लागत आहे, असं डब्ल्यूटीओनं म्हटलंय. उष्णतेच्या लाटेमुळे भारतात गव्हाच्या उत्पादनात मोठी घट आली. त्यामुळे भारताने मे महिन्यात गहू निर्यातीवर बंदी घातली.

ड्रॅगन फ्रुटची गुजरात सरकारलाही भुरळ

४. ड्रॅगन फ्रुट (Dragon Fruit Dragon) हे एक विदेशी फळ आहे. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून त्याची खूप चर्चा आहे. या ड्रॅगन फ्रुटची भुरळ आता गुजरात सरकारलाही पडलीय. ड्रॅगन फ्रुट लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी गुजरात सरकारने मोहीम हाती घेतलीय. दहा कोटी रूपयांची तरतूद त्यासाठी केलीय. ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी तीन ते साडे चार लाख रूपयांपर्यंत मदत केली जाणार आहे. हे फळ कमळासारखं दिसतं म्हणून गुजरात सरकारनं 'कमलम' असं त्याचं बारसं केलंय. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ड्रॅगन फ्रुटच्या फळबागा उभ्या राहिल्यात. हे फळ खूप महागडं असल्यामुळे यातून खूप पैसे मिळतील, अशी शेतकऱ्यांना आशा होती. परंतु अनेक ठिकाणी खरेदीची हमी, विक्री व्यवस्था, बाजाराशी थेट कनेक्ट नसल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला नाही. त्यामुळे बाजाराचा नीट अभ्यास करूनच शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रुटसारख्या फळांचा प्रयोग करावा, असा जाणकारांचा सल्ला आहे.

यंदा तूर भाव खाणार का?

५. तूर हे पीक (Tur Crop) नेहमीच चर्चेत असतं. महाराष्ट्रातलं खरीप हंगामातलं (Major Kharip Crop Tur) हे प्रमुख कडधान्य पीक (Pulses Crop) आहे. देशात महाराष्ट्र आणि कर्नाटक ही राज्यं तूर उत्पादनात (Tur Production) आघाडीवर आहेत. पाच वर्षांपूर्वी देशात तुरीचा प्रचंड तुटवडा (Tur Shortage) होता. तूरडाळ २०० रूपये किलोवर गेली. त्यामुळे केंद्र सरकार घायकुतीला आलं होतं. खुद्द पंतप्रधानांनी तूर उत्पादन वाढवण्याचं आवाहन शेतकऱ्यांना केलं. त्याला प्रतिसाद देऊन शेतकऱ्यांनी विक्रमी तूर पिकवली. तेव्हा मात्र सरकारने हात वर केले. हमीभावाने तुटपुंजी सरकारी खरेदी झाली. त्यामुळे तुरीचे भाव पडले. शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं. त्यानंतरही सरकारची धोरणं शेतकरीविरोधीच राहिली. गेल्या काही वर्षांत तर महागाईचा बागुलबुवा दाखवून तूर, हरभरा आणि इतर कडधान्यांचे दर पाडण्याचा एककलमी कार्यक्रम सरकार राबवतंय. त्यामुळे यंदा शेतकरी कडधान्यांचा पेरा कमी करतील, असाच सुरूवातीपासूनचा अंदाज आहे.

एक जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात तुरीची पेरणी घटलीय. गेल्या वर्षीच्या तुलनेत पेरा १४ टक्के कमी आहे. मूग आणि इतर कडधान्यांची लागवड वाढली असली तरी तुरीचं क्षेत्र मात्र कमी झालंय. जून महिन्यात देशाच्या अनेक भागांत पावसाने दडी मारली. त्यामुळे तुरीच्या पेरण्या रखडल्या. पुढच्या १५ दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही तर तुरीचा पेरा २५ टक्के घटेल, असा काही व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. पाऊस व्यवस्थित झाला तरीसुध्दा तुरीच्या लागवडक्षेत्रात ७ ते १० टक्के तुट राहील, असं त्यांचं म्हणणं आहे. थोडक्यात यंदा तुरीचा पुरवठा टाईट राहण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सरकारने १० लाख टन तुरीचा बफर स्टॉक करायचं जाहीर केलंय. त्यामुळे यंदा तुरीने भाव खाल्ला तर आश्चर्य वाटायला नको.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com