जगातील अन्न संकट गहिरे होणार

जगातील प्रमुख देशांत प्रतिकूल हवामानामुळे शेतीमालाचे उत्पादन घटेल. तसेच निर्यातबंदीच्या पवित्र्यामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होणार आहे. त्याचा परिणाम म्हणून जगाला भीषण अन्नसंकटाला तोंड द्यावे लागणार आहे.
Food Security
Food SecurityAgrowon

आजचं मार्केट बुलेटीन. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी.

राईस ब्रान तेलाच्या मागणीत वाढ

1. भाताच्या तुसापासून किंवा कोंड्यापासून तयार केलेल्या राईस ब्रान ऑईलची मागणी वाढली आहे. सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (Solvent Extractor Of India) म्हणजे एसईएने काही महिन्यांपूर्वी एक सर्वेक्षण केलं. त्यानुसार, इतर तेलांपेक्षा राइस ब्रान तेल (Rice bran Oil ) सुमारे २५ टक्के महाग होतं. परंतु यंदा रशिया-युक्रेन युध्द, जागतिक बाजारात पुरवठ्यात झालेली घट यामुळे खाद्यतेलांच्या किमती भडकल्या. त्यामुळे आयात खाद्यतेलांपेक्षा राईस ब्राईन तेल स्वस्त झालंय. मागच्या दहा वर्षात पामतेलाची किंमत सरासरी ६० रुपये लिटर होती, तर राइस ब्रान तेल १०० रुपये लिटर होतं. आज २०२२ मध्ये मात्र एक लिटर पामतेलासाठी १९० ते २१० रुपये मोजावे लागतात. तर एक लिटर राईस ब्रान तेल आहे १९० ते २२५ रुपये. त्यामुळे राईस ब्रान तेलाचे उत्पादन वाढवले तर आयातीचा भार थोड्या प्रमाणात का होईना कमी होऊ शकतो.

पाच वर्षांत भरडधान्यांचा आलेख चढता

2. गेल्या पाच वर्षांत देशात भरडधान्यांच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. २०१५-१६ मध्ये भरडधान्यांचे उत्पादन सुमारे १४५ लाख टन इतके झाले होते. २०२०-२१ मध्ये ते सुमारे १८० लाख टनापर्यंत पोहोचले आहे. बाजरीच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. भरडधान्यांमध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता असते. त्यामुळे दुष्काळी भागांतही त्यांचे चांगले उत्पादन येते. तसेच ते वातावरणातील बदलाला तोंड देऊन तग धरतात. तसेच त्यांचे पोषणमूल्यही खूप चांगले असते. त्यामुळे कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी भरडधान्यांचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे त्याला भारताचे सुपरफुड म्हणून ओळखले जाते.

वायदेबाजारात कापसाच्या दरात घट

3. मल्टि कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX मधील कापसाचे व कपाशीचे राजकोटमधील स्पॉट भाव कमी होत आहेत. मे महिन्यात भाव वाढत होते. गेल्या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव ०.४ टक्क्याने घसरून रु. ४७,९०० वर आले होते. या सप्ताहात ते पुन्हा ४.२ टक्क्यांनी घसरून रु. ४५,८९० वर आले आहेत. जुलै डिलिव्हरी भाव १०.८ टक्क्यांनी घसरून रु. ४१,३३० वर आले आहेत. कपाशीचे स्पॉट भावसुद्धा ४.१ टक्क्यांनी घसरून रु. २,२७९ वर आले आहेत.

व्याजदरवाढीमुळे कृषी बाजारात घसरण

4. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बॅंक, भारतातील रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडिया यासह जगातील अनेक देशांतील मध्यवर्ती बॅँकांनी व्याजदरात कपात केली. त्यामुळे शेतीमालाच्या बाजारपेठेत घसरण झाली आहे. कमोडिटी मार्केटमध्ये सर्व प्रमुख पिकांचे दर उतरले आहेत. परंतु गेल्या वर्षी याच कालावधीत असलेल्या भावपातळीशी तुलना करता सध्याचे दर अजूनही जास्त आहेत. त्यामुळे तेजी अजून कायम असल्याचा अनेकांचा समज आहे. परंतु मागील चार-सहा आठवड्यांमध्ये किंमती मोठ्या प्रमाणात घसरल्या आहेत. अमेरिकेतील सीबॉट म्हणजे शिकागो बोर्ड ऑफ ट्रेडिंग या कमोडिटी एक्सचेंजवर गव्हाच्या दरात ३० टक्के, सोयाबीनमध्ये १० टक्के, कापसात २९ टक्के, पामतेलात २६ टक्के, सोयातेलात १६ टक्के घट झाली आहे. भारतात शेतीमालाच्या घाऊक किंमती याच प्रमाणात बदललेल्या नाहीत परंतु कल साधारणपणे असाच आहे. मॉन्सूनच्या प्रभावामुळे येथे देखील किंमतींमध्ये थोडी नरमाई दिसून येत आहे.

जगातील अन्न संकट गहिरे होणार

5. गेल्या दोन महिन्यांमध्ये जागतिक पातळीवर अन्नधान्याच्या किमती (Food grain Price) वरच्या पातळीवर स्थिर झाल्या आहेत. कारण अनेक देशांमध्ये काढणीचा हंगाम तोंडावर आहे. परंतु येत्या वर्षामध्येही गव्हाचा तुटवडा (Wheat Shortage) पडण्याची चिन्हे दिसत आहेत. अमेरिकेत दुष्काळ पडल्यामुळे गव्हाच्या उत्पादनावर (Wheat Production) विपरित परिणाम होणार आहे. तर फ्रान्समध्ये चालू महिन्यात जोरदार वारे, गारा आणि पाऊस यामुळे गव्हाच्या पिकाला फटका बसला आहे. त्याच्याच बरोबरीने अर्जेन्टिनात गव्हाची पेरणी खोळंबली आहे. अर्जेन्टिना हा जगातील सहाव्या क्रमांकाचा गहू निर्यातदार देश आहे. तिथे गहू उत्पादनात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे.

या सगळ्या कारणांमुळे जागतिक पातळीवर २०२२-२३ या हंगामात गहू उत्पादनाच्या अंदाजात कपात करण्यात आली आहे. तसेच जगातील प्रमुख देश आपापली गरज आधी भागवण्याच्या मागे लागले आहेत. त्यामुळे देशा-देशांमधली सहकार्याची भावना कमजोर झाली आहे. जगातील अनेक देशांनी शेती उत्पादनांच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा सपाटा लावलाय. जगात आजपर्यंत किमान १९ देशांनी निर्यातबंदीची पाचर मारून ठेवलीय. त्यात भारताचाही समावेश आहे. भारताने १३ मे रोजी रातोरात गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली. सध्याची एकंदर स्थिती पाहता जगातील अन्न संकटाची तीव्रता वाढणार आहे, असे जागतिक संस्थांचे म्हणणे आहे. यापूर्वी २००८ मध्ये गंभीर अन्न संकट ओढवले होते. परंतु सध्याची स्थिती त्यापेक्षाही अधिक भयावह आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. या अन्न संकटामुळे जगातील अनेक देशांमध्ये राजकीय स्थैयालाही धोका निर्माण झाला आहे. पुढील सहा ते नऊ महिने अत्यंत तणावाचे राहतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com