यंदा होणार विक्रमी साखर निर्यात

यावर्षी ९० लाख टन निर्यातीचा 'इस्मा'चा अंदाज
Sugar Export
Sugar ExportAgrowon

कोल्हापूर : साखर उद्योगाच्या आतापर्यंतच्या इतिहासातील विक्रमी साखर निर्यात (Record Sugar Export) यंदा होण्याची शक्यता आहे. विक्रमी उत्पादन व देशांतर्गत बाजारात साखरेचे दर (Domestic Sugar Rate) कमी असल्याने चिंता व्यक्त होत असताना निर्यातीची वाढलेली टक्केवारी (Increase Export Percentage) कारखान्यांना दिलासादायक ठरणार आहे. कारखाने निर्यातीला प्राधान्य देत असल्याने साखर उद्योगातील संस्थांना निर्यातीचे अंदाज सातत्याने वाढवावे लागत आहेत. 'इस्मा'च्या (ISMA) नव्या अंदाजानुसार ९० लाख टन साखर निर्यात होणार असल्याचे म्हटले आहे. आतापर्यंत सुमारे ८२ लाख टनांचे निर्यात करार झाले आहेत. ७२ लाख टनांहून अधिक साखर प्रत्यक्षात निर्यात झाली आहे.

अजूनही सहा महिन्यांहून अधिक कालावधी असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात दर (International Market Rate) वाढल्यास निर्यातीचा आकडा एक कोटी टनापर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज निर्यातदार सूत्रांनी व्यक्त केला.

हंगाम सुरू झाल्यापासून प्रत्येक महिन्याला दहा लाख टन या सरासरीने साखरेची निर्यात (Sugar Export) झाली. विशेष म्हणजे देशाच्या निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा तब्बल ५० टक्के आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातून ४५ लाख टनांहून अधिक साखर निर्यात झाली आहे. अनेक बंदरांनी स्वतःचाच निर्यातीचा उच्चांक मागे टाकत नवा उच्चांक स्थापन केला आहे.

२०१३-१४ पासून २९१ टक्क्यांची वाढ

भारताच्या साखर निर्यातीत २०१३-१४ पासून २९१ टक्क्यांची घसघशीत वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०१३-१४ मध्ये ११७७ दशलक्ष अमेरिकी डॉलर इतक्या किमतीच्या साखरेची निर्यात झाली होती तर आता आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये तब्बल ४६०० दशलक्ष अमेरिकी डॉलर इतक्या किमतीची साखर निर्यात करण्यात आली आहे. डीजीसीआय अँड एस. अर्थात वाणिज्य गुप्तचर आणि सांख्यिकी महासंचालनालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, भारताने जगभरातील १२१ देशांना साखर निर्यात केली आहे. गेल्या तीन हंगामांपासून साखर निर्यातीला कारखान्यांनी पसंती देण्यास सुरुवात केली. काही देशांमध्ये तेथील स्थानिक परिस्थितीमुळे निर्यातीला अडथळे आले. पण ही तूट अन्य देशांनी साखरेची मागणी पूर्ण करून भरून काढली. यामुळे निर्यातीमध्ये घट झाली नाही. यंदा इंडोनेशिया आणि बांग्लादेशकडे सर्वाधिक निर्यात झाली. ज्याचा वाटा एकूण निर्यातीपैकी सुमारे ४४ टक्के आहे, गेल्या वर्षी याच कालावधीत इंडोनेशिया आणि अफगाणिस्तानने भारतातून एकत्रितपणे ४८ टक्के साखर खरेदी केली होती.

अफगाणिस्तानमधील परिस्थितीमुळे यंदा अफगाणिस्तानकडे साखर कमी प्रमाणात गेली. २०१९-२० या हंगामापासून निर्यातवाढीस सुरुवात झाली. विशेष म्हणजे कोविडचे संकट असतानाही यात घट झाली नाही. यावर्षी ३८ लाख टनांची निर्यात झाली. ही वाढती निर्यात आतापर्यंत ८२ लाख टनांपर्यंत पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मिळणारे साखरेचे दर व साखर अनुदान या दोन्हीमुळे महाराष्ट्र-कर्नाटक आदी राज्यांतील कारखान्यांनी साखर निर्यातीला प्राधान्य दिल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले.

उत्पादनाबरोबर निर्यातीतही महाराष्ट्र आघाडीवर

देशात यंदा साखर उत्पादनात (Sugar Production) महाराष्ट्राने निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. याचबरोबर निर्यातीतही ५० टक्क्यांहून अधिक वाटा घेत यशस्वी घोडदौड सुरू ठेवली आहे. ८२ लाख टनांपैकी तब्बल ४५ लाख टनांहून अधिक साखर करार एकट्या महाराष्ट्रातून झाले आहेत. बंदर जवळ असल्याने कारखान्यांनी निर्यातीला प्राधान्य दिले.

आम्ही साखर निर्यातीमध्ये यंदा आमचाच विक्रम मोडण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी साडेनऊ लाख टन साखरेची निर्यात आम्ही बंदरातून केली होती. आता हा आकडा १५ लाख टनांपर्यंत पोहोचला आहे. अजूनही यात वाढ अपेक्षित आहे. महाराष्ट्र कर्नाटकातील सुमारे ४० कारखाने निर्यातीसाठी आमच्या बंदराला पसंती देतात. गेल्या वर्षीपेक्षा यंदा निर्यातीचा ओघ वाढलेला आहे.
समीर गायकवाड, असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट, जयगड बंदर
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगला दर असल्याने अजूनही साखर निर्यातीचा वेग कायम आहे. साखर उद्योगातील ९० लाख टनांचा अंदाज दिला असला तरी यंदाची निर्यात एक कोटी टनांपर्यंत होऊ शकते. हा साखर उद्योगातील आजपर्यंतच्या इतिहासातील उच्चांक ठरेल, अशी शक्यता आहे.
अभिजित घोरपडे, साखर निर्यातदार

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com