
Cotton Market Update जळगाव ः खानदेशात कापूस आवक (Cotton Arrival) एप्रिल महिन्यात वाढली असून, ती सध्या प्रतिदिन सरासरी ५० हजार क्विंटल आहे. खेडा किंवा थेट खरेदी वेगात सुरू असून खेडा खरेदीत किमान दर (Cotton Rate) ७८०० रुपये, कमाल दर ८०५० रुपये प्रतिक्विंटल मिळत आहे.
दर स्थिर असून, त्यात जुजबी वाढ झाली आहे. मार्चमध्ये ७३०० ते ७४००, ७५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. खानदेशात केळी, पपईप्रमाणे कापसाचीदेखील १०० टक्के थेट खरेदी केली जाते. बाजार समिती किंवा खासगी कारखान्यांत कापूस शेतकरी विक्रीस आणत नाहीत. मागील महिन्यात प्रतिदिन सरासरी ३५ हजार क्विंटल म्हणजेच सात लाख कापूस गाठींएवढ्या (एक गाठ १७० किलो रुई) कापसाची आवक होत होती.
या महिन्यात मागील पाच ते सहा दिवसांत आवक बऱ्यापैकी वाढली आहे. धुळे, नंदुरबार भागांत शेतकऱ्यांनी ८० ते ८२ टक्के कापसाची विक्री केली आहे. जळगाव जिल्ह्यात अमळनेर, पारोळा, भडगाव, चाळीसगाव, जामनेर, बोदवड या भागात किमान ७० टक्के शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली. तर जळगाव, चोपडा, यावल, धरणगाव, मुक्ताईनगर भागात फक्त ५५ ते ६० टक्के कापसाची विक्री शेतकऱ्यांनी केली आहे.
मागील वर्षी मार्चअखेर ९५ टक्के शेतकऱ्यांनी आपल्या कापसाची खेडा खरेदीत किंवा थेट खरेदीत विक्री केली होती. मागील वर्षी ९० टक्के कापसाची विक्री ७१००, ७५००, ७८०० ते ८२५० रुपये प्रतिक्विंटल या दरात म्हणजेच सरासरी ७८०० रुपये प्रतिक्विंटल या दरात झाली होती. यंदाही सरासरी दरपातळी एवढीच राहिली आहे.
मागील वर्षी एप्रिलअखेरीस कापूस दर ११ हजार रुपयांवर पोहोचले होते. शेतकऱ्यांना यंदा किमान १० हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर खेडा खरेदीत मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु बाजार सुरुवातीपासून अस्थिर आहे.
यामुळे यंदा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. कारण कापसाचा एकरी खर्च लक्षात घेता उत्पन्न २० ते २५ हजार रुपयांपर्यंत मिळत आहे. कापसाला यंदा प्रतिक्विंटल पाच हजार रुपये खर्च आला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.