
IDFC Mutual Fund आता Bandhan Mutual Fund मध्ये विलिन होणार, अशी बातमी नुकतीच आली. या बातमीकडे ग्रामीण भागातील (Rural People) लोकांनी कसे पाहावे? शेतकरी, कष्टकरी, मजूर, शिक्षक, ग्रामीण भागांतील छोटे-मोठे व्यावसायिक यांच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे का? त्यांच्या आयुष्यावर या बातमीचा काही परिणाम होणार आहे का?
खरं तर म्युच्यअल फंड (Mutual Fund) उद्योगात आधी अस्तित्वात असणारे म्युच्युअल फंड दुसऱ्या एखाद्या म्युच्युअल फंडात विलीन होण्याची उदाहरणे बख्खळ आहेत. त्याअर्थाने या बातमीत नवीन काहीच नाही पण देशाच्या बदलत्या राजकीय अर्थव्यवस्थेचे अन्वयार्थ लावण्याचा चष्मा घातला तर बरेच काही दिसू शकते.
बंधन (Bandhan) ही तीसेक वर्षांपूर्वी स्थापन झालेली मायक्रो फायनान्स कंपनी होय. तिचा पसारा बंगाल, ओडिशा, झारखंड या तुलनेने औद्योगिक दृष्ट्या अविकसित राज्यांत, ग्रामीण आणि निमशहरी भागांत, गरीब आणि निम्न मध्यमवर्गात होता आणि आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) काही वर्षांपूर्वी बंधन मायक्रो फायनान्सचे रूपांतर व्यापारी बँकेत करण्याचा परवाना दिला. पूर्ण व्यापारी बँक झाल्यानंतर तिने कोणत्याही इतर बँकिंग कॉर्पोरेट ग्रूपसारखे काम सुरु केले आहे. अर्थात तिचे ग्राहक मोठ्या प्रमाणावर तेच आहेत
याचे काय अन्वयार्थ लावता येतीलः
बंधन म्युच्युअल फंडात GIC , ChrisCapital या परकीय भांडवली संस्थाची गुंतवणूक आहे. त्यांना भारताच्या ग्रामीण, निमशहरी भागातील विविध प्रकारची मार्केट्स खुणावत आहेत .
ग्रामीण, निमशहरी भागातील बचती भांडवली बाजारात आणण्यासाठी अशी संस्थात्मक वेहिकल्स लागणार आहेत. त्यावर काम सुरु आहे. नागरिकांना सार्वजनिक बँकांच्या सुरक्षित ठेवींपासून मागे खेचून त्यांना भांडवली बाजारातील गुंतवणुकीची जोखीम घेण्यास शिकवले जात आहे.
ग्रामीण, निमशहरी भागातील नागरिकांचे शिक्षण, वित्तीय साक्षरता याचे निर्णयकर्त्याना काही पडलेले नाही. भारतातील भांडवली बाजाराचा (कॅपिटल मार्केट) पाया व्यापक करण्याची गरज त्यांना वाटते आहे. त्याचाच हा भाग आहे
आपल्या देशाच्या राजकीय अर्थव्यवस्थेत दररोज दखलपात्र घडामोडी घडत असतात. त्याचे अन्वयार्थ लावता आले पाहिजेत खरा गेम इथे सुरु आहे ; ज्याचे ठोस परिणाम दहा / वीस वर्षांनंतर दिसतात. त्याचा माग ठेवला पाहिजे. ते समजून घेतले पाहिजे.
ज्यांना एखाद्या ठिकाणी काही कुकर्म करायचे आहे ते लोक त्या ठिकाणापासून थोडे दूर एखादा धमाका करतात, छोटा बॉम्ब वगैरे उडवतात ; त्यामुळे स्थानिक पोलीस आणि मुख्य म्हणजे गर्दी त्या ठिकाणी गोळा होते ; जेथे कुकर्म करायचे तेथे गर्दी होत नाही. त्यांना बिनबोभाट आपले इप्सित साध्य करता येते.
सार्वजनिक चर्चाविश्वातही नेमके हेच होत आहे. सारखे सारखे खोके / पेट्या यावर सार्वजनिक चर्चा विश्व व्यापून राहणे त्यांना हवे आहे ; कारण त्यांना माहित आहे की यात नैतिक डंका वाजवण्याचा प्रकार जास्त आहे.
त्यांच्यावर कधीच कारवाई होणार नाही ; कारण शासन तेच चालवत आहेत. त्यामुळे आता लोकांनीच शहाणे होऊन आजूबाजूच्या घटना, घटितांकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.