
जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाने (Cotton Corporation Of India) (सीसीआय) खुल्या बाजारात कापूस खरेदीसंबंधी (Cotton Procurement) राज्यात काही खरेदी केंद्र सुरू केले. परंतु या केंद्रांत कापसाची आवक (Cotton Arrival) नसल्याची स्थिती आहे. कमी प्रतिसाद असल्याने इतर भागांतील केंद्र ‘सीसीआय’ने सुरू करणे टाळले आहे.
‘सीसीआय’ने खुल्या बाजारात म्हणजेच आंतरराष्ट्रीय व देशातील बाजारात जे दररोज जाहीर होतील, त्यानुसार कापूस खरेदी सुरू केली. मराठवाड्यात बीड, जालन्यात प्रत्येकी दोन, नगर जिल्ह्यात एक, खानदेशातील नंदुरबारात खरेदी केंद्र काही दिवसांपूर्वीच सुरू केले. ८४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर बीड व जालना भागात दिला. काहीशी आवक या केंद्रांत झाली. पण नंतर कापूस दरात आणखी घसरण झाली.
यामुळे शेतकऱ्यांनी या केंद्रांतही कापूस विक्री टाळली. खरेदीस प्रतिसाद नसल्याने खानदेश, विदर्भात कापूस खरेदी केंद्र सुरू करणे सीसीआयने यानंतर टाळल्याचे दिसत आहे. अत्यल्प खरेदी सीसीआयने खुल्या बाजारात केली आहे. सध्या कापसाचा दर ७५०० ते ७८०० रुपये प्रतिक्विंटल, असा आहे.
काही भागांत यापेक्षा कमी दरही खेडा खरेदीत दर्जानुसार दिले जात आहेत. सीसीआय २८ मिलिमीटर लांब व ८ टक्के आर्द्रतेचा कापूस खरेदी करीत आहे. या दर्जाचा कापूस अनेक भागात शेतकऱ्यांकडे आहे. परंतु अपेक्षित दर सध्या नसल्याने शेतकरी कापूस विक्री टाळत आहेत.
खानदेशात नंदुरबारनंतर शहादा, धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील चोपडा, जळगाव, जामनेर, पाचोरा येथे कापूस खरेदी सुरू करण्याचे नियोजन सीसीआयने केले होते. परंतु हे नियोजन बाजार अस्थिर असल्याने कोलमडले आहे.
सीसीआयने कापूस खरेदी खुल्या बाजारात सुरू केली. परंतु ही खरेदी सुरू करताच दोन दिवसांत दरात आणखी घसरण झाली. शेतकरी सीसीआयच्या केंद्रात कापूस विक्रीसाठी आणत नसल्याने खरेदीला प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती आहे. सर्वत्र किंवा निर्देशित केंद्र सुरू करण्याची तयारी केली आहे. परंतु शेतकऱ्यांकडून खरेदीबाबत प्रतिसाद मिळायला हवा.
- अर्जुन दवे, व्यवस्थापक, सीसीआय
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.