आता गव्हाच्या पीठावरही निर्यातबंदीची कुऱ्हाड?

केंद्र सरकारनं मे महिन्यात गहू निर्यातीवर बंदी घातली. त्यानंतर भारतातून गव्हाच्या पीठ निर्यातीत वाढ झाली आहे. त्यामुळं सरकार बंदी घालण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे.
आता गव्हाच्या पीठावरही निर्यातबंदीची कुऱ्हाड?
Wheat FlourAgrowon

गहू निर्यातबंदीनंतर (Wheat Export Ban) देशातील गव्हाच्या पीठाची निर्यात (Flour Wheat) अचानक वाढली आहे. त्यामुळं सरकार गव्हाच्या पीठावर निर्बंध घालण्यासाठी हालचाली करत आहे. अजून याबाबत अधिकृत निर्णय झाला नाही. मात्र गहू आणि गव्हाचे पीठ निर्यात केली जाऊ नये म्हणून सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे सरकारी सुत्रांनी सांगितले आहे.

केंद्र सरकारनं मे महिन्यात गहू निर्यातीवर बंदी घातली. त्यानंतर भारतातून गव्हाच्या पीठ निर्यातीत वाढ झाली आहे. त्यामुळं सरकार बंदी घालण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे. अलीकडेच भारतातून आयात केलेला गहू किंवा त्याचे पीठ निर्यात करू नये, अशी मागणी भारताने संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईला केली होती. त्यावर बुधवारी (१५ जून) अरब अमिरातीने भारतीय गहू आणि पिठाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.

वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारताने एप्रिल २०२२ मध्ये ३१४ कोटी किमतीच्या ९५०९४ टन गव्हाच्या पिठाची निर्यात केली. तर २०२१-२२ या आर्थिक वर्षात १८४२ कोटी किमतीच्या सुमारे ५.६६ लाख टन गव्हाच्या पिठाची निर्यात केली. २०२०-२१ मध्ये २७८ लाख टन गव्हाचे पीठ निर्यात केली गेली. तर २०१९-२० मध्ये निर्यात प्रमाण १.९९ लाख टनावावर होती. गहू निर्यातबंदी झाल्यानंतर पिठाच्या निर्यातीमध्ये तीन पट्टीने वाढ झाल्याचेही व्यापारी सांगतात.

गव्हाच्या पीठाची सर्वाधिक निर्यात ही जवळच्या देशांना केली जात आहे. कारण गव्हाच्या तुलनेत गव्हाच्या पिठाची साठवण क्षमता कमी असते. त्यामुळे दक्षिण-पूर्व आणि पश्चिम आशियातील देशांना निर्यात केली जात आहे. भारतीय व्यापाऱ्यांच्या मते, भारतीय गव्हाच्या पिठाला प्रति टन ३५० ते ४०० डॉलर दर मिळतो. मात्र इतर देशातील व्यापाऱ्यांच्या मते, भारतीय गव्हाच्या पिठाला २६ हजार ते २७ हजार डॉलर प्रति टन इतका दर मिळतो.

दरम्यान, यंदा देशातील गव्हाच्या उत्पादनामध्ये उष्णतेच्या लाटेमुळं घट झाली आहे. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील गव्हाचे उत्पादन १०६ दशलक्ष टन असल्याचा अंदाज आहे. सुरुवातीला १११.३२ दशलक्ष टनाच्या अंदाज होता. भारतीय अन्न महामंडळाने १९ दशलक्ष टन गव्हाची खरेदी केली. गेल्यावर्षी सरकारी गहू खरेदी ४३.३३ दशलक्ष टन इतकी होती. गव्हाच्या खुल्या बाजारातील दर प्रति क्विंटल २०१५ रुपये होते. हे दर हमीभावापेक्षा जास्त असल्यामुळे अन्न महामंडळ बफर स्टॉकसाठीची गव्हाची खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण करू शकलं नाही. कारण रशिया आणि युक्रेनमधील संघर्षामुळे जागतिक बाजारात गव्हाची मागणी वाढली होती.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com