
पुणेः भारतातून एप्रिल ते जून या तिमाहीत तेलबिया पेंड (Oil Seed Meal) गेल्यावर्षीपेक्षा ३९ टक्क्यांनी अधिक झाली. तर जून महिन्याचा विचार करता निर्यात (Oil Seed Meal Export) आतापर्यंतची सर्वाधिक राहीली. मोहरी पेंड निर्यात (Mustard Meal Export) ८४ टक्क्यांनी जास्त झाली. तर सोयापेंडनिर्यात (Soymeal Export) ३६ टक्क्यांनी माघारली, असे साॅल्व्हेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात एसईएने सांगितले.
तेलबियांचे गाळप करून तेल काढल्यानंतर पेंड मिळते. यात प्रोटीन जास्त असते. त्यामुळे त्याचा वापर पशुखाद्यात अधिक होतो. यंदा मोहरी पेंड निर्यात गेल्यावर्षीपेक्षा जवळपास दुप्पट झाली. तर सोयापेंड निर्यात ३६ टक्क्यांनी माघारली. सोयापेंड वगळता मोहरीपेंड, शेंगदाणा पेंड, राईसब्रान पेंड आणि इरंडीपेंड निर्यात वाढली.
एसईएच्या मते, भारताने एप्रलि ते जून या तिमाहीत एकूण १० लाख २१ हजार टन तेलबिया पेंड निर्यात केली. एप्रिल महिन्यात ३ लाख ३४ हजार टन, मे मध्ये २ लाख ५५ हजार टन आणि जून महिन्यात ४ लाख ३१ हजार टन तेलबिया पेंड निर्यात झाली. जून महिन्यात आतापर्यंतची विक्रमी निर्यात झाली. तर गेल्यावर्षीच्या तुलनेत ११९ टक्क्यांनी निर्यात अधिक होती. मागील वर्षी एप्रिल ते जून या काळात ७ लाख ३५ हजार टन तेलबिया पेंड निर्यात झाली होती.
मोहरीपेंडेची सर्वाधिक निर्यात
तेलबिया पेंड निर्यातीत सर्वाधिक वाटा मोहरी पेंडचा होता. या तिमाहीत ७ लाख ७ हजार टन मोहरी पेंड निर्यात झाली. तर मागील वर्षी याच काळात ३ लाख ८४ हजार टन निर्यात झाली होती. गेल्यावर्षीपेक्षा यंदा मोहरीतेल निर्यात ८४ टक्क्यांनी वाढली. देशात यंदा मोहरीचे विक्रमी उत्पादन झाले. तसेच खाद्यतेलाला मागणीही होती. त्यामुळे मोहरीचे गाळप वाढले. परिणामी मोहरी पेंडची उपलब्धता अधिक झाली. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यातीसाठी पडतळ होती. त्यामुळे मोहरीपेंड निर्यात वाढली. भारताची मोहरीपेंडेचे दर रास्त असल्याने दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, थायलंड आणि इतर काही देशांना निर्यात वाढली, असेही एसईएने सांगितले.
सोयापेंड निर्यात कमीच
सोयापेंड निर्यात मात्र अजूनही कमीच आहे. मागीलवर्षी या तिमाहित सोयापेंड निर्यात १ लाख १८ हजार टन झाली होती. मात्र यंदा केवळ ७६ हजार टनांची निर्यात झाली. म्हणजेच गेल्यावर्षीच्या तुलनेत सोयापेंड निर्यात ३६ टक्क्यांनी कमी राहीली. भारतीय सोयापेंडच दर अद्यापही आंतरराष्ट्रीय बाजारातील दरापेक्षा अधिक आहेत. त्यामुळे निर्यात कमी होतेय. सध्या कांडला पोर्टवर निर्यातीसाठीचा दर ६७५ डाॅलर प्रतिटन पडतोय. तर अर्जेंटीनाकडून ५३९ डाॅलर तर ब्राझीलकडून ५२२ डाॅलर प्रतिटनाने सोयापेंड मिळतेय, अशी माहिती एसईएने दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.