Onion Rate : कांदा ठरला आतबट्ट्याचा

सप्टेंबर महिन्यापासून कांदा दराला काहीसा उठाव मिळत असतो. त्यामुळं शेतकरी कांदा चाळीत साठवून ठेवतात. मात्र यंदा कांदा उत्पादन कमी होऊनही दरात अपेक्षेप्रमाणं वाढ झालेली नाही.
Onion
OnionAgrowon

पुणेः सप्टेंबर महिन्यापासून कांदा दराला (Onion Rate) काहीसा उठाव (Onion Demand) मिळत असतो. त्यामुळं शेतकरी कांदा चाळीत साठवून (Onion Storage) ठेवतात. मात्र यंदा कांदा उत्पादन (Onion Production) कमी होऊनही दरात अपेक्षेप्रमाणं वाढ झालेली नाही. उलट चाळीतील कांदा खराब (Onion Damage) होऊन शेतकऱ्यांचं नुकसानचं वाढलं. त्यामुळं किमान दोन हजार रुपये दर मिळायला हवा, असं शेतकऱ्यांनी सांगितलं.

त्याचं झालं असं की, यंदा उन्हाळी कांदा लागवडी आणि काढणीचं नियोजन चुकल्यानं बाजारावर दबाव आला होता. तो आजपर्यंत कायम आहे. उन्हाळ कांदा लागवडीच्या काळात कांदा दर सरासरी ७०० रुपये प्रतिक्विंटलवर होता. मात्र कांदा उत्पादन खर्चाचा विचार केल्यास क्विंटलमागं किमान ९०० ते १२०० रुपये खर्च येतो, असं शेतकऱ्यांनी सांगितलं.

कांदा काढणीच्या काळातही बाजार ७०० रुपयांवर होता. त्यामुळं दरवाढीच्या कारणानं शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवला. मात्र या कांद्याला आता ५ महिने झाले. त्यातच तापमान जास्त राहील्यानं कांदा सड होत आहे.

Onion
Onion Rate : ‘नाफेड’ने खरेदी केलेला कांदा चाळीतच सडतोय

उन्हाळी कांदा लागवडी सरासरी नोव्हेंबर- डिसेंबरपर्यंत संपतात. मात्र गेल्याहंगामात पाऊस लांबल्यानं जवळपास ७५ टक्के लागवडी १५ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत झाल्या. परिणामी कांदा काढणीही एकाच काळात होऊन बाजारात आवक वाढली.

त्यातच पाऊस आणि उष्णतेचा पिकाला फटका बसला. हवामान बदलामुळं कांदा वेळेआधीच पक्व होण्याचं प्रमाण वाढलं. पिकाचं नुकसान तर झालच शिवाय गुणवत्ताही खालावली. त्यातच तापमान जास्त असल्यानं कांदा लवकर सडत आहे.

Onion
Onion Rate : दोनशे रुपयांनी कांदा दरात फायदा

बाजारावर दबाव का?

कांदा सड वाढल्यानं शेतकरी मिळेल त्या दरात कांदा विक्री करत आहेत. त्यामुळं बाजारात जास्त आवक दाटतेय. नाफेडनेही कांदा खरेदी करून साठा केला. तो कधीनाकधी बाजारात येणारच आहे. याचाही मानसिक दबाव बाजारावर आहेच. शिवाय केंद्रानं कांदा निर्यात बंद केलेली आहे. जास्त आवकेच्या काळात निर्यात सुरु राहील्यास बाजारावरील दबाव काहीसा कमी होतो. मात्र यंदा तसं झालं नाही. कांद्याला उत्पादनखर्चापेक्षा कमी दर मिळाल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला.

सध्याचा दर काय?

मागील आठवड्यापासून दरात काहीशी सुधारणा झालेली दिसतेय. मात्र सध्या बाजारात कांद्याला सरासरी ८०० रुपये ते १४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. या दरातही शेतकरी तोट्यातच आहेत. कांद्याला २ हजार रुपयांपेक्षा जास्त दर मिळाला तरच शेतकऱ्यांना परवडेल, अशी स्थिती निर्माण झालीये.

यंदा सरासरीपेक्षा जास्त तापमान राहीलं. त्यामुळं कांदा सडण्याचं प्रमाण वाढलं. सरासरी ४० ते ५० टक्क्यांपर्यंत सड झाली. केवळ २० टक्केच कांदा चांगला निघत आहे. शेतकऱ्यांना नाइलाजानं कांदा विकावा लागत आहे.
मधूकर मोरे, कांदा उत्पादक, मोरे नगर, जि. नाशिक
यंदा उत्पादनात घट झाली त्यातच चाळीतला कांदा सडण्याचं प्रमाणही वाढलंय. म्हणजेच कांद्याचं जवळपास निम्म नुकसान झालं. त्यामुळं शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च क्विंटलमागं १७०० रुपयांपर्यंत गेला. शेतकऱ्यांना १७०० रुपये दर मिळाला तरी त्यातून केवळ बराबरीच होईल. यंदा कांदा आतबट्ट्याचा ठरल्यानं शेतकऱ्यांचा कांदा लागवडीतील रस कमी झालेला दिसतो.
काशिनाथ पागिरे, कांदा उत्पादक, नेवासा, जि. नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com