निविष्ठांची ऑनलाइन विक्री थांबवावी

देशातील काही निविष्ठा उत्पादक कंपन्यांनी ऑनलाइन विक्री सेवा वाढविल्यामुळे विविध राज्यांमधील निविष्ठा विक्रेते संतप्त झालेले आहेत.
Agriculture Inputs
Agriculture InputsAgrowon

पुणे ः देशातील काही निविष्ठा उत्पादक कंपन्यांनी ऑनलाइन विक्री सेवा (Online Sale Of Agriculture Input) वाढविल्यामुळे विविध राज्यांमधील निविष्ठा विक्रेते (Input Seller) संतप्त झालेले आहेत. ‘‘ऑनलाइन विक्री (Online Selling) थांबविण्याबाबत २० ऑगस्टपूर्वी कंपन्यांनी भूमिका स्पष्ट करावी; अन्यथा आम्ही गावपातळीवरील विक्री बंद करू,’’ असा निर्वाणीचा इशारा विक्रेत्यांच्या राष्ट्रीय संघटनेने दिला आहे.

Agriculture Inputs
Agriculture Technology : नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या निधीत गैरव्यवहाराचा संशय

दिल्लीत मुख्यालय असलेल्या ‘अॅग्रो इनपुट डीलर्स असोसिएशन’ने देशातील सर्व निविष्ठा उत्पादक कंपन्यांना एक पत्र पाठविले आहे. “ऑनलाइन निविष्ठा विक्रीमुळे आमचे व्यवसाय धोक्यात आलेले आहेत. ही विक्री तत्काळ थांबवावी. देशातील ८५ टक्के शेतकरी अल्प व अत्यल्प भूधारक आहेत. या शेतकऱ्यांच्या बळावरच देशाने अन्न सुरक्षितता साध्य केली आहे. त्यांना ऑफलाइन विक्री सेवा पुरविण्याचे काम केवळ विक्रेते करीत आहेत. ऑनलाइन विक्रीमुळे शेतकरी आणि विक्रेते हे दोन्ही घटक अडचणीत येणार आहेत. त्यामुळे २० ऑगस्टपूर्वी या समस्येवर मार्ग न काढल्यास आम्हाला निविष्ठा कंपन्यांच्या उत्पादन विक्रीवर सामूहिक बहिष्कार टाकावा लागेल,” असे या पत्रात नमूद केले आहे.

Agriculture Inputs
Agriculture Employment : शेतीतला रोजगार का घटला?

विक्रेत्यांची भूमिका चुकीची

‘असोसिएशन’च्या या भूमिकेमुळे नामांकित कंपन्यांच्या ऑनलाइन सेवा विभागात अस्वस्थता पसरली आहे. “विक्रेत्यांची ही भूमिका साफ चुकीची आहे. देशातच नव्हे; जगभर सर्व विक्री सेवा आता ऑनलाइन प्रणालीकडे वळत आहेत. मात्र ही प्रणाली निवडक ठिकाणीच उपयुक्त ठरते. गावपातळीवर किंवा दुर्गम भागात ऑनलाइन विक्री सेवा शक्य नसते. त्यामुळे विक्रेत्यांचे महत्त्व अजिबात कमी होणार नाही. हा मुद्दा संघटनेने सामोपचाराने सोडवायला हवा,” अशी भूमिका कीडनाशक उत्पादक कंपनीच्या एका प्रतिनिधीने मांडली. “भविष्यात ऑनलाइनच नव्हे; तर ड्रोनद्वारे थेट शेतात निविष्ठा पुरवण्याची पद्धत सुरू होईल. त्यामुळे विक्रेत्यांनी या बदलास सामोरे जावे. उलट या पद्धतीत शिरकाव करून आपला व्यवसाय विस्तारित करावा,” अशीही सूचना या प्रतिनिधीने केली.

नकली पुरवठ्याची भीती

‘असोसिएशन’च्या म्हणण्यानुसार, देशातील निविष्ठा उत्पादक कंपन्या केवळ विक्रेत्यांच्या बळावर मोठ्या झालेल्या आहेत. कोणतीही कंपनी सर्व गावांमध्ये आपला माल विकण्यासाठी स्वतःचा प्रतिनिधी नेमू शकत नाही. अशावेळी खासगी विक्रेताच उपयोगाचा ठरतो. उलट, ऑनलाइन बाजारामुळे नकली मालाचा पुरवठा होण्याची भीती असते. त्यातून अनेक नामांकित कंपन्या अडचणीत आलेल्या आहेत. त्या ऑनलाइन विक्री थांबवून पुन्हा ऑफलाइनकडे वळलेल्या आहेत.

“विक्रेते केवळ खते, कीडनाशके, बियाणे विकत नसून शेतकऱ्यांना माहिती व तंत्रज्ञानदेखील पुरवतात. ते वेळोवेळी पीकसल्ला देत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होते. गावपातळीवर शेतकऱ्यांच्या समस्या केवळ विक्रेते सोडवू शकतात. त्यामुळे ऑफलाइन व्यवसायाचे पारंपरिक जाळे निविष्ठा निर्मिती उद्योगाने विस्कळीत करू नये.”

- मनमोहन कलंत्री, अध्यक्ष, अॅग्रो इनपुट डीलर्स असोसिएशन

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com