इजिप्त गव्हाच्या बदल्यात भारताला खत देणार ?

पाच लाख टन गहू आयातीचा करार करण्याची शक्यता
इजिप्त गव्हाच्या बदल्यात भारताला खत देणार ?
wheatagrowon

पुणेः इजिप्त भारताकडून पाच लाख टन गहू आयातीचा करार करण्याची शक्यता आहे. त्याबदल्यात भारताला खत(Fertilizer) आणि इतर उत्पादने देण्याची तयारी दर्शविली आहे. पुढील हंगामातही गव्हाची टंचाई भासण्याच्या भीतीने इजिप्त (Egypt)सावध झाला आहे. गहू पुरवठ्यातील अनिश्चितता लक्षात घेऊन देशात गव्हाचा पुरेसा साठा असावा यासाठी इजिप्तची धडपड चालू आहे.

इजिप्तने यंदा पहिल्यांदाच भारताकडून गहू आयात केला. मागील आठवड्यात सर्व तपासण्या, अटी आणि शर्ती पूर्ण करून ५५ हजार टन गहू इजिप्तच्या बाजारात दाखल झाला. भारतीय गव्हाची गुणवत्ता आणि पोषणमूल्य लक्षात घेऊन इजिप्तने आणखी पाच लाख टन आयातीसाठी(Import) प्रयत्न सुरु केले आहेत. त्याबदल्यात इजिप्त भारताला खतं आणि इतर उत्पादने देऊ शकेल, असे इजिप्तचे पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय व्यापारमंत्री अली अल-मुसेल्ही यांनी सांगितलं.

टर्की देशानं विषाणूच्या नावाखाली भारतीय गहू नाकरला होता. त्यामुळं गहू निर्यातीवर परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र जागतिक पातळीवर गहू टंचाई भासत आहे. अनेक देश गव्हासाठी चाचपणी करत आहेत. मात्र सध्या केवळ भारताकडेच नवीन पीक आहे. भारताने निर्यातबंदी केली असली तरी शासन पातळीवर निर्यात सुरू आहे. केंद्र सरकारने ज्या देशांची अन्नसुरक्षेसाठी गहू पाठवण्याची मागणी मान्य केली आहे, त्यांना निर्यातबंदीतून सूट देण्यात आली आहे.

२०२१ च्या हंगामात अनेक देशांत गहू उत्पादन कमी झालं. रशिया आणि युक्रेन हे देश गहू निर्यातीत आघाडीचे देश आहेत. त्यांच्यात युध्द सुरू झाल्यामुळे निर्यात ठप्प झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत गव्हाचे दर ४० टक्क्यांनी वाढले. तसेच रशिया, युक्रेनमध्ये यंदा गव्हाची पेरणी घटली आहे. त्यामुळे जागतिक गहू टंचाई केवळ याच वर्षपुरती मर्यादीत राहील, असं म्हणता येणार नाही. त्यातच हवामान विषयक संकट आणि उष्णता हे घटक गहू पिकावर परिणाम करतात. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अंदाजानुसार २०२२ आणि २०२३ या वर्षांतही धान्य उत्पादन कमी राहील. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाचे दर तेजीत आहेत. या अंदाजानंतर सीबाॅटवर गव्हाचे वायदे ५ टक्क्यांनी सुधारले.

एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार नुकतंच इस्लामिक विकास बॅंकेच्या बैठकीदरम्यान मुसेल्ही यांनी गहू निर्यातीच्या संदर्भात भारतीय राजदुतांसोबत चर्चा केली आहे. भारताकडून विविध टप्प्यांत पाच लाख टन गहू आयातीचे करार करण्यासाठी चर्चा झाल्याचं मुसेल्ही यांनी स्पष्ट केलंय. इजिप्तमध्ये सध्या चार महिने पुरेल एवढाच गव्हाचा साठा शिल्लक आहे. चालू हंगामातील पीक खरेदी केल्यानंतर २०२२ च्या शेवटपर्यंत पुरेल एवढा गहू सरकारडे असेल. परंतु पुढील हंगामातील अनिश्चितता लक्षात घेऊन इजिप्त भारताकडून गहू खरेदी वाढवण्याच्या विचारात आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com