Turmeric Market : हंगामाआधीच हळदीचा रंग फिका

मागील काही वर्षांतील हळद बाजाराचा आढावा घेतल्यास एक गोष्ट लक्षात येते. हळदीचा हंगाम सुरु होण्याआधी जानेवारी आणि फेब्रुवारीत दरात तेजी येते.
Turmeric Market
Turmeric MarketAgrowon

पुणेः पडलेल्या दरामुळं कापूस (Cotton Rate) आणि सोयाबीन (Soybean Rate) उत्पादक मेटाकुटीला आले असतानाच, आता हळदीच्या दरातही (Turmeric Rate) मोठी घसरण पाहायला मिळाली.

चालू महिन्यातच हळदीचे दर क्विंटलमागं जवळपास एक हजार रुपयाने नरमले आहेत. त्यामुळं ऐन हंगामाच्या तोंडावर हळद उत्पादकांचीही (Turmeric Producer) चिंता वाढली.

मागीलवर्षी जानेवारी महिन्यात हळदीला सरासरी ७ हजार रुपये भाव होता. पण यंदा चालू महिन्यात हळदीला सरासरी ६ हजार रुपये दर मिळत आहे. पण गुवत्तेनुसार ५ हजार ते ६ हजार ५०० रुयांपर्यंतही भाव आहे.

मागील काही वर्षांतील हळद बाजाराचा (Turmeric Market) आढावा घेतल्यास एक गोष्ट लक्षात येते. हळदीचा हंगाम सुरु होण्याआधी जानेवारी आणि फेब्रुवारीत दरात तेजी येते.

पण यंदा उलटं घडलं, असं निजामाबाद येथील हळद व्यापारी आणि निर्यातदार शुभम झावर यांनी सांगितलं.

जाणकारांच्या मते देशात मागील हंगामात १३ लाख २९ हजार टन हळद उत्पादन झाले. त्यापैकी तब्बल २ लाख टन माल शिल्लक आहे. तर यंदा १३ लाख १४ हजार टन उत्पादनाचा अंदाज आहे.

या शिल्लक साठ्यामुळे यंदा उत्पादन कमी राहूनही पुरवठा वाढला. हंगामाच्या आधीच हळदीचे दर दबावात आल्याने शेतकरी, व्यापारी आणि स्टाॅकिस्टही अडचणीत आल्याचे  सांगली येथील हळद व्यापारी मनोहर सारडा यांनी सांगितलं. 

दर किती कमी होतील?

सध्या हळदीचे दर कमी झाल्यामुळं दुसरीकडे उठाव वाढण्याचा अंदाज आहे. यंदा रमजान लवकर आल्याने त्याचीही मागणी येत आहे. निर्यातही वाढत आहे.

मागील १५ दिवसांमध्ये देशातून ६० ते ७० कंटेनर्सची निर्यात झाली. तसंच या घटलेल्या दरात जुन्या मालाचा साठाही होत आहे. त्यामुळं सध्याच्या दरात फार घट होईल, असं वाटत नाही.

हळदीचे दर ५ हजार ते ६ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Turmeric Market
Turmeric Processing : सुधारित पद्धतीने हळद प्रक्रिया

वायद्यांमध्येही घसरण

वायद्यांमध्येही हळदीच्या दरात घट झाली आहे. डिसेंबरमध्ये एनसीडीईएक्सवर वायदे १८ डिसेंबरला ८ हजार ६९२ रुपयांवर होते. ते १ जानेवारीला ८ हजार २६० रुपयांवर आले.

त्यानंतर मोठी घट झाली. ३० जानेवारीला वायद्यांमधील भाव ७ हजार ३८८ रुपयांपर्यंत नरमला. म्हणजेच वायद्यांमध्ये हळदीचे दर या महिन्यात एक हजार रुपयाने तुटले.

यंदा मागील हंगामातील शिल्लक साठा जास्त आहे. उत्पादनही चांगलं आहे. पण मागणी नव्हती. सध्या रमजानमुळे हळदीला मागणी वाढली. पण नवं पीक आणि शिल्लक साठ्यामुळं पहिल्यांदाच हंगामाच्या आधी दर दबावात आले आहेत.
शुभम झावर, व्यापारी आणि निर्यातदार, निजामाबाद, तेलंगणा
मागील हंगामात हळदीला चांगला भाव होता. आम्हीही चांगल्या भावात स्टाॅक केला. पण मागणी आली नाही. सध्या निर्यातीसाठी मागणी असली तरी दर कमी आहेत. त्यामुळे व्यापारी आणि स्टाॅकिस्टही गोत्यात आले. 
मनोहर सारडा, हळद व्यापारी, सांगली
आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडूतील काही भागांमध्ये यंदा लागवड कमी जास्त दिसते. पण महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात हळद लागवड मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं देशातील उत्पादनात चांगलं राहणार आहे.
लक्ष्मीनारायण मुर्क्या, हळद व्यापारी, वसमत

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com