
कोल्हापूर : गेल्या ऊस हंगामात (२०२१-२२) देशातील ऊस उत्पादकांना (Sugarcane Farmer) देय असलेल्या १ लाख १५ हजार १९६ कोटी रुपयांपैकी १ लाख ५ हजार ३२२ कोटी रुपये देण्यात आले. १ ऑगस्ट २०२२ अखेर गेल्या वर्षीच्या हंगामातील ९१.४२ टक्के रक्कम ऊस उत्पादकांना पोहोच करण्यात आली आहे. ऊस उत्पादकांना मिळालेली ही आजपर्यंतच्या हंगामातील सर्वाधिक रक्कम असल्याचे केंद्राने म्हटले आहे. केंद्राने एफआरपीचा निर्णय घेतल्यानंतर दिलेल्या निवेदनात गेल्या हंगामात उचांकी ऊस बिलाचे वाटप (Sugarcane FRP Distribution) केल्याचे म्हटले आहे.
उसाच्या एफआरपी वाढीबाबत सरकार आणि शेतकरी संघटनांच्या हिशेबात वेगळेपण येत असले तरी शासकीय आकडेवारीनुसार सरकारने गेल्या आठ वर्षांत एफआरपीमध्ये ३४ टक्के वाढ केल्याचा दावा केला आहे. केंद्राने जुने सरकार असताना मिळत असलेली एफआरपी आणि आत्ताची एफआरपी यात तुलना केली आहे.
शासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्राच्या साखर उद्योगाला प्रोत्साहन देणाऱ्या विविध योजनांमुळेच शेतकरी व साखर कारखानदारीला चांगले दिवस आल्याचे केंद्रीय सूत्रांनी सांगितले. आजवर कोणाला जमले नाही, अशी कामगिरी केवळ शासनाने दिलेल्या सुविधांमुळे झाली, असा दावाही केंद्राने केला आहे.
शासकीय सूत्रांच्या माहितीनुसार...
- २०१३-१४ ला एफआरपी २१०० रुपये, कारखान्यांकडून २३९७ लाख टन ऊस खरेदी व्हायचा.
- उत्पादकांना कारखान्यांकडून केवळ ५१ हजार कोटी रुपये मिळायचे; २०१३-१४ नंतर प्रत्येक वर्षी त्यात वाढ
- २०२१-२२ मध्ये ३५३० लाख टन उसाची खरेदी; उत्पादकांना मिळाले १ लाख १५ हजार १९६ कोटी रुपये
विक्रम यंदा मोडीत निघणार
यंदाही देशात उसाच्या लागवडीत वाढ झाल्याने गेल्या वर्षीचा विक्रम ही मोडीत निघण्याची शक्यता असल्याचे केंद्राने सांगितले आहे. या वर्षी ३ हजार ६०० लाख टन उसाची खरेदी कारखाने करतील, असा अंदाज आहे. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरातही वाढ होईल. शेतकऱ्यांना देशातील सर्व कारखान्यांकडून १ लाख २० हजार कोटी रुपये मिळतील, असे केंद्राला वाटते.
केवळ २२८ कोटींची थकबाकी
गेल्या वर्षीपर्यंत ९२ हजार ९३८ कोटी रुपये शेतकऱ्यांची थकबाकी होती. यापैकी ९२ हजार ७१० कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. सध्या केवळ २२८ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.