
Nagar News : उन्हाळ्यात दुध आणि दुग्धजन्य पदार्थाला चांगली मागणी असतानाही दुधाच्या दरात कपात केली जात आहे. गेल्या २० दिवसांत गाईच्या दुधात सुमारे चार रुपयांनी घट झाली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून टिकून असलेला गाईच्या दुधाचा ३८ रुपयांचा दर घसरून ३४ रुपयांवर आला आहे.
देशांतर्गत दूध पावडर व बटरचे दर कमी झाल्याचे सांगत दुधाच्या दरात कपात केल्याचे सांगितले जात आहे. अजून दरात कपात होण्याची शक्यता एका दूधसंकलन केंद्र चालकाने व्यक्त केली. दुधाच्या दरात कपात होत असल्याने दूध उत्पादक मात्र हतबल झाले आहेत.
दूध, बटरच्या दरावर दूध व्यवसाय अवलंबून आहे. एकेकाळी शाश्वत असलेला दूध व्यवसाय गेल्या सहा-सात वर्षांपासून सातत्याने अस्थिर होत आहे.
कोरोना संकटाच्या काळात दुधाची व दुग्धजन्य पदार्थांची मागणी कमी झाल्याने दुधाचे दर कमी झाले होते. १६ ते १७ रुपये प्रतिलिटर दराने खरेदी केली जात होती. त्यानंतर दोन वर्षांत हळूहळू दूधदरात वाढ झाली.
मात्र त्या आधीही दूध दरासाठी राज्यात आंदोलन करून संप करावा लागला होता. दुधाचे दर सातत्याने अस्थिर ठेवून दूध उत्पादकांना अडचणीत आणले जात असल्याचा आरोप सातत्याने होत आहे.
राज्यात साधारण ७० सहकारी व ३०० पेक्षा खासगी दूध संघाद्वारे दोन ते सव्वादोन कोटी लिटर दुधाचे संकलन होते. त्यातील ४० टक्के दुधाची पावडर, बटर व अन्य दुग्धजन्य पदार्थ तयार होतात. तर ६० टक्के दूध ग्राहकांना पाउचमधून विकले जाते.
शिवाय राज्यात २५ लाख लिटरच्या जवळपास दुधाची थेट ग्राहकांना विक्री केली जात आहे. थेट विक्री केले जाणारे दूध हे म्हशीचे असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या अनेक वर्षानंतर यंदा साधारण चार ते पाच महिन्यांपासून दुधाचे दर वाढले. पशुखाद्य व अन्य बाबींचा विचार केला तर सध्या मिळणारे दुधाचे दर बरे आहेत, असे सांगत दूध उत्पादक काहीसे समाधानी होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दूध दरात पुन्हा कपात सुरु झाली आहे.
थोडक्यात महत्त्वाचे...
- गेल्या तीन महिन्यांपासून दुधाला प्रतिलिटर ३८ रुपये दर मिळाले.
- परिणामी, सात ते दहा टक्के दूध उत्पादन वाढले
- गेल्या काही दिवसांपासून दर कपात सुरू
- दूध व दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणी. शिवाय, उन्हामुळे साधारण १० टक्के दूध उत्पादनात घट. तरीही दर कमी. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट
- दूध खरेदी धोरण पावडर, बटर खरेदीवर अवलंबून. सरकारकडून त्यांच्या आयातीची चर्चा. त्यामुळे पावडर, बटरसह दुधाचे दर कमी.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.