
Chana Market Update छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील मार्केटिंग फेडरेशनच्या नऊ केंद्रांवरून केवळ १२१ शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीने (Chana MSP) हरभरा खरेदीसाठी (Chana Procurement) नोंदणी केली आहे.
कमी नोंदणी होण्यामागे कमी उत्पादकतेची अडचण व ई-पीक पाहणीचाही नोंदणीत खोडा असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी जाधववाडी, कन्नड, खुलताबाद, गंगापूर, पाचोड, सोयगाव, फुलंब्री, सिल्लोड आणि वैजापूर या ९ केंद्रांना मंजुरी मिळाली आहे.
गळवारपासून (ता.१४) सर्व केंद्रांवरून आधारभूत किमतीने हरभरा खरेदी सुरू करण्याचे आदेश आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या नगण्य नोंदणीमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पहिल्या दिवशी खरेदी सुरू झाली नव्हती.
माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमधील जाधववाडी केंद्रावर सर्वाधिक ५२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
त्या पाठोपाठ खुलताबाद केंद्रावरून १६, गंगापूर ३५, पाचोड आठ, सोयगाव चार, फुलंब्री तीन, वैजापूर दोन व सिल्लोड, कन्नड येथे प्रत्येकी एक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी कृषी विभागाच्या द्वितीय अहवालानुसार हेक्टरी आठ क्विंटल हरभरा खरेदी करता येणार आहे.
मंगळवारपासून (ता.१४) खरेदी सुरू करण्याचे आदेश असताना वाढीव अपेक्षित उत्पादकता केव्हा जाहीर केली जाणार, शेतकरी केव्हा नोंदणी करणार व त्याची खरेदी त्यानंतर कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दुसरीकडे बाजारातील हरभऱ्याचा दर हा ४८०० रुपये प्रतिक्विंटलच्या आतच असल्याची स्थिती आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना ई पीक पाहणी व उत्पादकतेची अडचण दूर केल्याशिवाय आपली नोंदणी पोर्टलवर करणे शक्य नाही. त्यामुळे गरजेनुसार बाजारात कमी दराने हरभरा विकून मोकळे होणे हाच पर्याय उरत असल्याचे चित्र आहे.
नोंदणीला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ
आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी नोंदणीला आधी १५ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु शेतकऱ्यांची पोर्टलवर होणारी अल्प नोंदणी व मुदतवाढीची मागणी लक्षात घेऊन आता ३१ मार्चपर्यंत नोंदणीला मुदतवाढ देण्याचे शासन आदेश सोमवारी (ता. १३) जाहीर करण्यात आले आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.