Rice: तांदळातल्या तेजी-मंदीची चावी भारताकडे

ज्याचा परिणाम भातशेतीवर (Rice) होतोय. तिची प्रकृती सुधारलेली नाही. मग तिला खतपाणी (Fertilizer) द्यायचं तर खताचे भाव (Fertilizer Price) आसमानाला भिडलेत. आता या सगळ्या अडचणींमुळं पुढचा हंगाम काजळून गेला आहे.
Rice Export
Rice ExportAgrowon

हिरव्यागार भातशेतीला अद्यापही बाळसं धरता आलेलं नाही. ती खंगली आहे. तिला हवा असलेला तिचा सखा पाऊस मध्येच रागावतोय, रुसतोय. ज्याचा परिणाम भातशेतीवर (Rice) होतोय. तिची प्रकृती सुधारलेली नाही. मग तिला खतपाणी (Fertilizer) द्यायचं तर खताचे भाव (Fertilizer Price) आसमानाला भिडलेत. आता या सगळ्या अडचणींमुळं पुढचा हंगाम काजळून गेला आहे.

अन्नधान्याची टंचाई (Food Crisis) आता जगाच्या वेशीवर घंटानाद करू लागलीय. जगात सगळ्यात जास्त भात आशिया खंडात पिकवला आणि खाल्ला जातो. परंतु आशियातील प्रमुख देशांमध्ये भाताचं पीक संकटात सापडलं आहे. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे खतांच्या वाढलेल्या किंमती.

आशियातल्या थायलंड, चीन, फिलिपाईन्स आणि भारत या चार देशांत भाताची स्थिती काय आहे, त्यावर जगाचं भाताचं गणित अवलंबून आहे. थायलंड हा तांदूळ निर्यातीत (Rice Export) जगात दुसऱ्या नंबरवर आहे. तिथं खतांच्या किमती भडकल्यामुळे भाताचं उत्पादन घटण्याची चिन्हं आहेत. कासिकॉर्नबँक पीसीएल या संस्थेने तयार केलेल्या अहवालात ही माहिती दिलीय. फिलिपाईन्स हा तांदळाच्या आयातीत जगात दुसऱ्या नंबरवर आहे. तिथंही भात पिकवला जातो. पण यंदा तिथंही खतांची समस्या असल्यामुळे पीक तोळामासा आहे.

त्यामुळे हा देश मोठ्या प्रमाणावर आयात करण्याची शक्यता आहे. म्हणजे जगात तांदळाचा तुटवडा वाढणार. चीनमध्ये भात उत्पादक शेतकरी किडींच्या हल्ल्यामुळे हवालदिल झालेत. तिथं पिकाचं मोठं नुकसान आहे. व्हिएतनामची तांदूळ निर्यात सध्या वाढती दिसत असली तरी महाग वाहतुक आणि भाताचा वाढलेला उत्पादनखर्च यामुळे तिथंही चिंतेचं वातावरण आहे. तर भारतात मॉन्सून अजून नेहमीसारखा बरसलाच नाही. त्यामुळे पावसाची लहर कशी राहतेय, त्यावर भाताचं उत्पादन किती होणार ते अवलंबून आहे.

आशिया खंडात भात हे एवढं महत्त्वाचं पीक आहे की, तिथलं राजकीय आणि आर्थिक स्थैर्य या पिकावर अवलंबून आहे. रशिया-युक्रेन युध्दामुळे गहू आणि मक्याच्या किमती आभाळाला भिडल्या. पण तशी अवस्था तांदळाची झाली नाही.

तांदळाचे दर तुलनेने कमीच राहिले. परंतु ही स्थिती आणखी किती काळ कायम राहील, याबद्दल शंका आहे. कारण तुटवड्याची टांगती तलवार आहे. २००८ मध्येही तांदळाचा मोठा तुटवडा पडला होता आणि त्यामुळे दर भडकले होते. तांदळाचे दर प्रति टन एक हजार डॉलरवर पोहोचले होते. म्हणजे आता जेवढे दर आहेत, त्याच्या दुप्पट दर झाले होते.

सध्या मका, गहू आणि तेलबिया पिकांच्या उत्पादनाची स्थिती सुधारतेय. जगातील प्रमुख देशांतील उत्पादनाचा अंदाज तसं सांगतोय. पण पुढं हवामान कसं राहतंय, त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. गेल्या काही वर्षांत वातावरणातील बदलाचा (क्लायमेट चेंज) मोठा फटका बसतोय पिकांना. आताही तसंच काही झालं आणि गहू, मक्याच्या किमती वाढल्या तर तांदळाची मागणी आणखीनच वाढेल.

जगात अशी सगळी स्थिती असल्यामुळे आता सगळ्यांच्या नजरा लागल्यात भारतावर. कारण जगातील ४० टक्के तांदूळ भारत निर्यात करतो. तांदळाचा जागतिक पुरवठा संकटात सापडलाय, परंतु भारतात मात्र अजूनही मोठ्या प्रमाणात तांदूळ उपलब्ध आहे; त्यामुळेच जगात तांदळाचे दर नियंत्रणात आहेत, असे दि राईस ट्रेडर या संस्थेचे उपाध्यक्ष व्ही. सुब्रमणियन यांनी सांगितले.

भारताने वाढत्या महागाईचे चटके बसत असल्याने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली. आता पुढचा नंबर तांदळाचा असेल, अशी चर्चा सुरू आहे. अर्थात मॉन्सूनची प्रगती कशी राहतेय, त्यावर सगळं चित्र अवलंबून आहे. पाऊसपाणी ठीक राहिलं तर भाताच्या निर्यातीवर बंदी घालण्याची नौबत येणार नाही कदाचित. सध्या तरी भारतातून तांदूळ निर्यात होत असल्यामुळे जगात पुरवठ्याचा प्रश्न तितका गंभीर झालेला नाही.

भारत तांदूळ उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र निर्यातीत भारत जगात अव्वल आहे. २०२१-२२ या वर्षात जागतिक तांदूळ निर्यात ५२९ लाख टन झाली. त्यात भारताचा वाटा २१० लाख टनांचा होता. म्हणजेच एकट्या भारताने जगातील तब्बल ४० टक्के तांदूळ निर्यात केला. यावरून जागतिक तांदूळ बाजारात भारताचे महत्त्व लक्षात येते. भारताने तांदळाची निर्यात बंदी केली तर जागतिक बाजारात तांदळाचे दर भडकतील. गरीब देशांना मोठा फटका बसेल.

थोडक्यात तांदूळ बाजारपेठेतल्या तेजी-मंदीची चावी सध्या भारताच्या हातात आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com