Food crisis: आशियायी देशांतील तांदूळ उत्पादन घटणार?

कोरोना महामारीमुळे अन्नधान्याच्या पुरवठ्यात व्यत्यय आला होता. नंतर रशिया- युक्रेन युद्ध सुरू झालं. त्यामुळे अन्नधान्याच्या किमती गगनाला भिडल्या. यादरम्यान साठेबाजीमुळेही महागाई वाढली होती. मात्र तांदळाच्या बाबतीत स्थिती काहीशी वेगळी होती.
Paddy Production
Paddy ProductionAgrowon

भारतासह आशियातील चीन, बांगलादेश, व्हिएतनाम आदी देशांतील तांदूळ उत्पादनात (Paddy Production) घट होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे जगभरात अन्नधान्याच्या किमती (Rise In Food Grain Price) वाढण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारात आधीच अन्न तुटवड्यामुळे (Food Shortage In Global Market) दर वाढले आहेत. तांदूळ तुटवड्यामुळे (Rice Shortage) त्यात आणखी भर पडू शकते.

कोरोना महामारीमुळे अन्नधान्याच्या पुरवठ्यात व्यत्यय आला होता. नंतर रशिया- युक्रेन युद्ध सुरू झालं. त्यामुळे अन्नधान्याच्या किमती गगनाला भिडल्या. यादरम्यान साठेबाजीमुळेही महागाई वाढली होती. मात्र तांदळाच्या बाबतीत स्थिती काहीशी वेगळी होती. जगभरात तांदळाचे भाव स्थिर होते. यावर्षीच्या सुरुवातीला अन्नधान्यांच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या असताना सुद्धा तांदळाचे दर स्थिर होते, असे अन्न आणि कृषी संघटनेचे (Food and Agriculture Organisation- FAO) अर्थतज्ज्ञ शर्ली मुस्तफा यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

Paddy Production
paddy cultivation: ओडिशातील भात लागवडीत २० टक्क्यांची घट

तांदळाचे दर वाढतील का?

तांदळाचे दर वाढण्याची चिन्हे आहेत. कारण जगातील सुमारे ९० टक्के तांदूळ पिकवला जातो आशियायी देशांमध्ये. तिथे यंदा प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका बसला आहे. त्यामुळे तांदूळ उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे, असं व्यापारी आणि विश्लेषकांकडून सांगितलं जातं आहे.

नॅशनल ऑस्ट्रेलिया बँकेचे कृषी अर्थतज्ज्ञ फिन झीबेल यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं, "मुख्य निर्यातदार देशांमध्ये तादूळ उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. तांदळाच्या किमती वाढल्यास विकसनशील देशांत महागाई वाढेल. त्यामुळे मोठ्या आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं." भारतात खरीप हंगामाच्या सुरूवातीला पावसाने दिलेली ओढ, चीनमध्ये आलेली उष्णतेची लाट, बांगलादेशातील पूर आणि व्हिएतनाममध्ये पिकाची घसरलेली गुणवत्ता यामुळे तांदूळ उत्पादन घटण्याची शक्यता आहे.

Paddy Production
Paddy : जुलैच्या पावसामुळे भात लागवडी अंतिम टप्यात

भारतातील स्थिती काय आहे?

पाऊस रखडल्याने यावर्षी भात लागवडीत १३ टक्क्यांची घट झाली, असं ऑल इंडिया राईस एक्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष बी. वी. कृष्णाराव यांनी सांगितले. यंदा तांदूळ उत्पादनात आठ टक्के घट होण्याची शक्यता आहे. भात उत्पादक शेतकरी कडधान्य आणि तेलबियांकडे वळल्यामुळे भाताचं क्षेत्र कमी झाल्याचं त्यांनी सांगितलं. "यावर्षी तांदूळ उत्पादनात घट निश्चित आहे, मात्र यावर सरकारची प्रतिक्रिया काय असेल किंवा सरकार काय भूमिका घेईल हा मोठा प्रश्न आहे," असं मुंबईतील एका व्यापाऱ्याने रॉयटर्सला सांगितलं.

भारतात १ जुलै अखेर सुमारे १३४ लाख टन तांदूळ साठ्याचं उद्दीष्ट असताना प्रत्यक्षात ५५० लाख टन तांदळाचा साठा उपलब्ध होता. भारताने २०२१ मध्ये २१५ लाख टन तांदळाची निर्यात केली. त्यामुळे तांदळाचे दर स्थिर राहिले. जगात भारतानंतर सगळ्यात मोठे निर्यातदार आहेत थायलंड, व्हिएतनाम, पाकिस्तान आणि अमेरिका. या चार देशांनी केलेल्या एकूण निर्यातीपेक्षा भारताची एकट्याची तांदूळ निर्यात जास्त होती. "पण भारतातलं सरकार तांदळाच्या किमतीबाबत अतिसंवेदनशील आहे. किमतींत थोडीशी वाढ झाली तरी भारत तांदळाच्या निर्यातीवर बंधनं आणू शकतो, " असं एका व्यापाऱ्याने सांगितलं.

आशियातील इतर देशांना किती फटका बसला?

भात कापणीच्या वेळी व्हिएतनाममध्ये मोठा पाऊस झाला. त्यामुळे तिथल्या धान्याची गुणवत्ता खराब झाली. व्हिएतनाममधील तांदूळ उत्पादक शेतकरी सांगतात की, त्यांनी भात कापणीच्या वेळी असा पाऊस कधीच पाहिला नव्हता. दहा दिवसात पडलेला पाऊस हा एका महिन्यात पडलेल्या पावसाइतका होता. अतिवृष्टीमुळे भात शेतीचं ७० टक्के नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

जगात सर्वाधिक तांदूळ आयात करणाऱ्या चीनमध्ये भातशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु तिथे उष्णतेच्या लाटेमुळे भातशेतीचं नुकसान झालं. त्यामुळे २०२२-२३ या वर्षात चीनची तांदूळ आयात वाढण्याची चिन्हे आहेत. चीन विक्रमी ६० लाख टनांच्या आसपास आयात करेल, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने (USDA- यूएसडीए) दिला आहे. गेल्या वर्षी चीनने ५९ लाख टन तांदूळ आयात केला होता.

बांगलादेशही मोठ्या प्रमाणावर तांदळाची आयात करण्याची चिन्ह आहेत. कारण बांगलादेशच्या मुख्य भात उत्पादक भागांत मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला. त्यामुळे भाताचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. हवामानात झालेल्या प्रतिकूल बदलांमुळे आशियाई देशांतील पीक उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम तांदळाच्या निर्यातीवरही झाला आहे. व्यापाऱ्यांच्या मते भारत आणि थायलंडमधून निर्यात होणारा तांदूळ महागला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com