
१ जानेवारीपासून NCDEX मध्ये मक्याचे (Maize Rate) मे २०२३ डिलिव्हरीसाठी व्यवहार सुरू होतील. त्यामुळे आता NCDEX मध्ये मक्याचे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे डिलिव्हरीसाठी आणि हळदीचे (Turmeric Rate) एप्रिल, मे व जून डिलिव्हरीसाठीचे व्यवहार असतील. MCX मध्ये कपाशीचे फेब्रुवारी, एप्रिल व नोव्हेंबर NCDEX व्यवहार चालू आहेत. हरभरा, मूग, सोयाबीन (Soybean Rate) व तूर (Tur Rate) यांचे फ्यूचर्स व्यवहार २०२३ या वर्षामध्ये बंद असतील.
डिसेंबर महिन्यात कापसाची आवक वाढती होती. मका, मूग, सोयाबीन व तूर यांची आवक कमी होत होती. डिसेंबर महिन्यात कापसाचे भाव कमी होत होते. इतर सर्व शेतीमालाच्या भावात वाढीचा कल होता. सोयाबीनचे भाव रु. ५,४८४४ वरून रु. ५,७५७ वर गेले. तुरीचेही भाव महिना-अखेरीस वाढले.
या सप्ताहामध्ये किमतीतील सविस्तर चढ-उतार पुढील प्रमाणे आहेत ः
कापूस/कपाशी
MCX मधील कापसाचे व कपाशीचे राजकोटमधील स्पॉट भाव (रु. प्रति १७० किलोची गाठी) नोव्हेंबर महिन्यात वाढत होते. गेल्या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव ३.१ टक्क्यांनी घसरून रु. २९,७५० वर आले होते; या सप्ताहात ते पुन्हा २.४ टक्क्यांनी घसरून रु. २९,०४० वर आले आहेत. कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) १.३ टक्क्याने घसरून रु १,६०० वर आले आहेत. कापसाचा हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) रु. ६,३८० व मध्यम धाग्यासाठी रु. ६,०८० आहे.
मका
मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) नोव्हेंबर महिन्यात वाढत होत्या. गेल्या सप्ताहात स्पॉट किमती ०.६ टक्क्याने वाढून रु. २,२५० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या २ टक्क्यांनी घसरून रु. २,२०५ वर आल्या आहेत. फ्यूचर्स (जानेवारी डिलिव्हरी) किमती रु. २,२१४ वर आल्या आहेत. मार्च फ्यूचर्स किमती रु. २,२३९ वर आहेत. मक्याचा हमीभाव रु. १,९६२ आहे. सध्याच्या किमती हमीभावापेक्षा अधिक आहेत.
हळद
हळदीच्या स्पॉट (निजामाबाद) किमती नोव्हेंबर महिन्यात वाढत होत्या. गेल्या सप्ताहात त्या १.३ टक्क्यांनी वाढून रु. ७,४५९ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.८ टक्क्याने घसरून रु. ७,४०१ वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती रु. ८,३७० वर आल्या आहेत. मे फ्यूचर्स किमती रु. ८,३७० वर आल्या आहेत.
हरभरा
हरभऱ्याच्या स्पॉट (बिकानेर) किमती गेल्या सप्ताहात ०.७ टक्क्याने घसरून रु. ४,९६९ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा ०.४ टक्क्याने घसरून रु. ४,९४७ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,३३५ आहे.
मूग
मुगाच्या किमती नोव्हेंबर महिन्यात घसरत होत्या. मुगाची स्पॉट किमत (मेरटा) या सप्ताहात रु. ७,२२५ वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ७,७५५ आहे. सध्या किमती हमीभावापेक्षा कमी आहेत.
सोयाबीन
गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किमत (इंदूर) रु. ५,६४६ वर आली होती; या सप्ताहात ती २ टक्क्यांनी वाढून रु. ५,७५७ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,३०० आहे.
तूर
तुरीची स्पॉट किमत (अकोला) या सप्ताहात १.९ टक्क्याने वाढून रु. ७,११२ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ६,६०० आहे.
कांदा
कांद्याच्या किमती नोव्हेंबर महिन्यात घसरत होत्या. कांद्याची किमत (पिंपळगाव) गेल्या सप्ताहात रु. १,४१७ होती; या सप्ताहात ती रु. १,३०० वर आली आहे.
टोमॅटो
गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किमत (जुन्नर, नारायणगाव) रु. ५०० वर आली होती. या सप्ताहातसुद्धा ती रु. ५०० वर स्थिर आहे.
(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची
किंमत प्रति १७० किलोची गाठी;
कपाशीची किंमत प्रति २० किलो).
: arun.cqr@gmail.com
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.