
Kolhapur Jaggery Market : साखर कारखान्यांबरोबर नियमित गूळ हंगामही संपला असला तरी येथील बाजार समितीत एक दिवसाआड गुळाची आवक सुरू आहे.
व्यापाऱ्यांकडूनही गुळाला मागणी असल्याने दरही चांगले मिळत आहेत. सध्या गुळाला क्विंटलला ३५०० ते ४४०० रुपये दर मिळत आहे. सरत्या हंगामात गुजरातमधील व्यापाऱ्यांनी शीतगृहासाठी गूळ फारसा खरेदी केला नाही.
हंगामात सत्तर टक्केच गुळाची शीतगृहासाठी खरेदी झाली. गेल्या दोन वर्षांपासून कोल्हापूरसह कर्नाटकातून वर्षभर गूळ उपलब्ध होत असल्याने व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या गुळाची विक्री करण्यास प्राधान्य दिले. यामुळे शीतगृहात अपेक्षित गुळाची खरेदी झाली नाही, याचा फायदा सध्या आवक होत असलेल्या गुळाला होत आहे.
साधारणतः मार्चमध्ये दररोज होणारे गूळ सौदे बंद झाले. गेल्या दोन महिन्यांपासून एक दिवसाआड सौदे होत आहेत. जिल्ह्यातील करवीर, राधानगरी, शाहूवाडी या तालुक्यांत विशेष करून गुऱ्हाळघरे सुरू आहेत.
या भागातून एक दिवसाआड दहा किलोच्या १८ ते २० हजार गूळ रव्यांची आवक होत आहे. एक किलोच्या गुळाच्या सुमारे पाच हजार बॉक्सचे सौदे होत आहेत. या तालुक्यांमध्ये सुमारे पंचवीस गुऱ्हाळे नियमित सुरू आहेत.
पावसाळा सुरू होईपर्यंत तरी गुळाचे उत्पादन सुरूच राहील. हंगामाच्या तुलनेत आवक कमी असली तरी बाजार समितीत गुळाची आवक सुरूच राहण्याचा अंदाज आहे.
चार दिवसांपूर्वी पर्यंत गुळाचे दर प्रतिनुसार क्विंटलला ३७०० ते ४५०० रुपये इतके होते. गेल्या चार दिवसांत गुळाच्या दरात क्विंटलला २०० रुपयांची घट झाली आहे. सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी सौदे होत आहेत. दरात काही प्रमाणात चढ उतार असले तरी हंगामात मिळणाऱ्या दरापेक्षा सध्या मिळणारे दर चांगले असल्याची माहिती बाजार समिती व व्यापारी सूत्रांनी दिली.
कार्यक्षेत्राबाहेरील उसाचा वापर
जिल्ह्याच्या पश्चिम भागात गुऱ्हाळे मोठ्या प्रमाणात आहेत. हंगामात याच भागातील उसापासून गूळ तयार केला जातो. सध्या जिल्ह्याच्या पश्चिम भागातील ऊस संपला आहे. या भागातील गुऱ्हाळ मालक उसासाठी उसाची मुबलक उपलब्धता असणाऱ्या शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील ऊस उत्पादकाकडे वळला आहे.
प्रसंगी कालावधी पूर्ण न झालेला ऊसही खरेदी करून गुळासाठी वापरण्यात येत असल्याने अजूनही गुऱ्हाळे सुरू आहेत. या भागातील ऊस उत्पादकांनाही उसाला चांगला दर मिळत असल्याने ऊस उत्पादक गुऱ्हाळघरांना ऊस देण्यास प्राधान्य देत आहे.
कोल्हापूर बाजार समितीत सध्याची गूळदर स्थिती (प्रती क्विंटल, रुपयांत)
दर्जा---किमान---कमाल---सरासरी
स्पेशल---४५६०- ४५६०---४५६०
नंबर १---४१५०- ४२५०---४२००
नंबर २---३९५०-४१४०---४०००
नंबर ३---३६५०-३९४०---३८००
नंबर ४---३३००-३६४०---३४००
एक किलो बॉक्स---३३२५- ४३२५---३९००
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.