
Mango Market Rate रत्नागिरी ः मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Mumbai APMC) गतवर्षीच्या तुलनेत येदा आंब्याची आवक (Mango Arrival) वाढली आहे. या आठवड्यात दररोज अकरा हजारांपेक्षा अधिक पेट्या दाखल होत आहेत.
त्यातील साडेसात हजार पेट्या कोकणातील असून, रत्नागिरी जिल्ह्यातील वीस टक्के पेट्यांचा समावेश आहे. रत्नागिरीतील आंब्याची आवक १५ मार्चनंतर वाढेल, असा अंदाज आहे. सध्या २ हजार रुपयांपासून ६ हजार रुपयांपर्यंत पाच डझनाच्या पेटीचा दर (Mango Rate) आहे.
मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात आंब्याची विक्री वाशी बाजार समितीमधून केली जाते. त्यामुळे कोकणातील सर्वाधिक आंबा वाशीतच पाठविला जातो.
गेल्या काही वर्षांत कोरोनामुळे थेट विक्रीवर भर दिला जात असला तरीही अजूनही मोठा बागायतदार मध्यस्थांवरच अवलंबून आहे. या वर्षी फेब्रुवारीच्या अखेरीस देवगडमधून मोठ्या प्रमाणात आंबा बाजारात रवाना झाला.
तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यातील पेट्यांचे प्रमाण कमी आहे. चालू आठवड्यामध्ये सलग चार दिवस अकरा हजारांहून अधिक पेट्या वाशी बाजारात दाखल झाल्या. गुरुवारी (ता. २) सकाळी आलेल्या अहवालानुसार ७ हजार ४३४ पेटी कोकणातून, तर ४ हजार ३०१ पेटी इतर राज्यांतून वाशीत दाखल झाली.
कोकणातून आलेल्या पेट्यांपैकी ८० टक्के देवगडमधून, तर उर्वरित वीस टक्के रत्नागिरीतून आल्याचे बाजार समितीमधून सांगण्यात आले. गतवर्षी मार्चच्या सुरुवातीला दीड हजार पेटी वाशीत येत होती.
तसेच यंदा फेब्रुवारीमध्येच आंबा दाखल झाला. त्यात सर्वाधिक देवगडचाच होता. ४ ते ८ डझनांची पेटी २ हजार ते ६ हजार रुपयांना विकली जाते. कर्नाटकमधून बदामी व लालबागचीही आवक होत आहे.
वाशीतील आवक सध्या वाढू लागली आहे. मार्चमध्ये त्यात आणखी वाढ होईल. त्यामुळे आंबा हंगाम या वर्षी चांगला होईल, अशी चिन्हे आहेत. आवक वाढत राहिली तर दरही सामान्य नागरिकांच्या नियंत्रणात येतील. सध्या हापूसला ग्राहकांचीही पसंती मिळत आहे.
- संजय पानसरे, संचालक बाजार समिती
आखातातील निर्यात सुरू
वाशी बाजारात येणाऱ्या पेट्यांपैकी पन्नास टक्के माल आखाती देशांमध्ये निर्यात केला जातो. यंदा लवकर आंबा आखातात पाठविण्यास सुरुवात झाली आहे. सुमारे पाच हजारांहून अधिक पेट्या निर्यात होत आहेत. अन्य देशांमधील निर्यातही वेगाने वाढणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.