
अनिल जाधव
पुणेः सोयाबीन उत्पादक (Soybean Producer) मागील महिनाभरापासून दर वाढीची वाट पाहत होते. मागील आठवड्यात म्हणजेच डिसेंबरच्या शेवटी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे (International Soybean Market) दर तेजीत होते. मात्र देशातील सोयाबीन बाजार आपल्या जागेवरून हालायचं नावच घेत नव्हता. पण आता नव्या वर्षातील पहिल्याच दिवशी बाजारानं सोयाबीन उत्पादकांना दिलासा दिला. अनेक बाजारांमध्ये आज सोयाबीन दरात सुधारणा झाली होती.
यंदा ऑक्टोबर महिन्यात सोयाबीन दर दबावात होते. पावसानं पिकाचं नुकसान झाल्यानं गुणवत्ता खराब झाली होती. या सोयाबीनला ४ हजार ५०० रुपयांपासून दर मिळाला. मात्र नोव्हेंबर महिन्यात गुणवत्तापूर्ण माल हाती आल्यानंतर बाजारात दर वाढले. सोयाबीनने काही बाजारांमध्ये ६ हजारांचाही टप्पा गाठला होता. मात्र डिसेंबरमध्ये दर पुन्हा कमी झाले. मागील महिनाभर सोयाबीनचा सरासरी दर ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान होता. सोयाबीन ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपयापेक्षा कमीही होत नव्हते आणि वाढतही नव्हते. त्यामुळं शेतकरी चिंतेत होते.
………………..
दरपातळी कितीवर पोचली?
पण मागील काही दिवसांपासून जानेवारीत सोयाबीनचे दर वाढतील, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत होते. त्यानुसार आज सोयाबीनच्या दरात अनेक बाजांमध्ये १०० ते २०० रुपयांची वाढ झाली. मात्र काही बाजारांमधील दरपातळी आजही कायम होती. आज सोयाबीनला सरासरी ५ हजार ४०० ते ५ हजार ७०० रुपये दर मिळाला. जास्तीत जास्त सोयाबीन ज्या दराला विकलं जातं तो सर्वसाधारण किंवा सरासरी दर असतो. म्हणजेच किमान दर आणि कमाल अर्थात जास्ती जास्त दर यापेक्षा वेगळे असतात. पण सरासरी दर जास्त शेतकऱ्यांना मिळतो म्हणून त्याचा उल्लेख केला जातो.
…………..
दरवाढीचा अंदाज
मागील आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर तेजीत आले होते. सोयाबीनचे वाढलेले दर टिकून राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यातच सोयापेंडचेही दर तेजीत आहेत. खाद्यतेलाच्या दराचाही सोयाबीनला आधार मिळतोय. या सर्व घटकांमुळं आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी राहू शकते, असा अंदाज आहे. त्यामुळं देशातील सोयाबीन दरातही सुधारणा होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
………………
जानेवारीत काय दर राहतील?
सोयाबीनचे दर या महिन्यात वाढण्याचा अंदाज आहे. पुढील महिनाभर सोयाबीन दरात २०० ते ३०० रुपयांची सुधारणा अपेक्षित आहे. सोयाबीनचा भाव ५ हजार ६०० ते ५ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान पोहचू शकतो. पण इथं एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. ती म्हणजे सोयाबीनची ही दरपातळी सध्याची बाजारातील स्थिती म्हणजेच मुलभूत घटक लक्षात घेऊन व्यक्त केली आहे. मुलभूत घटक बदलले की दर यापेक्षा जास्त वाढूही शकतात आणि स्थिरही राहू शकतात. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच सोयाबीनची विक्री केल्यास फायदेशीर ठरेल, असं आवाहन जाणकारांनी केलंय.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.