Soybean Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वाढले; देशात काय स्थिती होती?

चालू आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ पाहायला मिळाली. अर्जेंटीनातील दुष्काळी स्थिती, चीनकडून मागणी वाढण्याची शक्यता आणि खाद्यतेल दरवाढीचा आधार सोयाबीनला मिळाला.
Soybean Rate
Soybean RateAgrowon

……………
अनिल जाधव

पुणेः आंतरराष्ट्रीय बाजारात चालू आठवड्यात सोयाबीन दरात (Soybean Rate) चढ उतार होते. मात्र आठवड्याच्या शेवटी दरात वाढ पाहायला मिळाली. पण देशातील सोयाबीन बाजार (Soybean Market) एका भावपातळीवर ठाण मांडून होता. पण पुढील आठवड्यात सोयाबीन दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.

चालू आठवड्यात आंतरराष्ट्रीय  बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ पाहायला मिळाली. अर्जेंटीनातील दुष्काळी स्थिती, चीनकडून मागणी वाढण्याची शक्यता आणि खाद्यतेल दरवाढीचा आधार सोयाबीनला मिळाला. चालू आठवड्यात सोयाबीनचा बाजार १४.८४ डाॅलर प्रतिबुशेल्सवर सुरु झाला होता. नाताळच्या सुट्ट्यांनतर बाजार सुरु झाल्यानं बाजाराला चांगला आधार पाहायला मिळाला. रुपयात हा दर ४ हजार ५५० रुपये प्रतिक्विंटल होतो.

त्यानंतर आठवडाभर सोयाबीन दरात चढ उतार राहीले. चालू आठवड्यात सोयाबीनला उच्चांकी १५.३४ डाॅलरचा दर मिळाला. रुपयात हा दर ४ हजार ७०० रुपये होतो. मात्र या दरावर सोयाबीन जास्त काळ टिकलं नाही. दरात पुन्हा करेक्शन आलं. नवीन वर्षाआधी बाजार बंद होताना म्हणजेच शुक्रवारी दर १५.२४ डाॅलरवर पोचला. रुपयात हा दर ४ हजार ६७० रुपये होतो. मागील सहा महिन्यांतील उच्चांकी पातळीवर शुक्रवारी बाजार बंद झाला होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणा
म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजार चालू आठवड्यात ४ हजार ५५० रुपये प्रतिक्विंटलवर सुरु झाला होता. तर दरात चढ उतार होत शुक्रवारी बाजार ४ हजार ६७० रुपयांवर बंद झाला. म्हणजेच चालू आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दारात क्विंटलमागे १२० रुपयांची सुधारणा झाली होती. 

…………….
काय होती दरपातळी?
देशातील बाजारात सोयाबीन दर स्थिर होते. काही बाजारांमध्ये काहीसे चढ उतार पाहायला मिळाले. मात्र त्याचं प्रमाण खूपच कमी होतं. आठवड्याच्या शेवटी बाजार सुधारण्याची शक्यताही निर्माण झाली होती. मात्र बाजारावर काहीच परिणाम जाणवला नाही. आंतरराष्ट्रीय बाजार तेजीत असूनही देशातील दरपातळी स्थिर होती. आठवडाभर देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान दर होते. आंतरराष्ट्रीय बाजार दर वाढले, मात्र देशातील बाजार स्थिर होता. त्यामुळं शेतकरी संभ्रमात होते.

…………….
जानेवारीत दर वाढतील

जानेवारीत देशातील सोयाबीन बाजारावर आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढीचा परिणाम जाणवू शकतो. पण आंतराष्ट्रीय बाजारात अनेक ठिकाणी ४ जानेवारीपर्यंत व्यवहार बंद असतील. पण सुट्ट्या संपल्यानंतर भारतीय सोयापेंड आणि सोयाबीनला मागणी वाढू शकते. त्यानंतर दरात सुधारणा होईल, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

 --

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com