Sugar Rate : देशांतर्गत बाजारात ऑक्टोबर मध्यापर्यंत समाधानकारक दराने साखरविक्री

राज्यातील उसाचा गळीत हंगाम १ ऐवजी १५ ऑक्टोबरनंतर सुरू होणार असल्याने याचा सकारात्मक परिणाम साखरविक्रीवर होणार आहे.
Sugar Export
Sugar ExportAgrowon

कोल्हापूर : राज्यातील उसाचा गळीत हंगाम (Sugarcane Crushing Season Maharashtra) १ ऐवजी १५ ऑक्टोबरनंतर सुरू होणार असल्याने याचा सकारात्मक परिणाम साखरविक्रीवर (Sugar Sale) होणार आहे. यंदाच्या हंगामातील साखर बाजारात (Sugar Market) येण्यास पंधरा दिवस जादा कालावधी लागणार असल्याने या कालावधीत सध्या कारखान्याकडे असणारी साखर समाधानकारक दराने (Sugar Rate) विकण्यासाठी संधी असल्याचे सध्याचे चित्र आहे.

सध्या देशभरात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून दसरा, दिवाळीच्या तयारीची धामधूम सुरू आहे. केंद्राने देशातील साखर कारखान्यांना सप्टेंबरसाठी साडेबावीस लाख टन साखरविक्रीचा कोटा दिला आहे. कोटा जाहीर केल्यानंतर तो अतिरिक्त असल्याची ओरड साखर उद्योगाची होती.

जुलैचा कोटा ऑगस्टपर्यंत विक्री करण्यास एकीकडे परवानगी दिलेली असताना दुसरीकडे सप्टेंबरचा कोटा वाढवून देण्याची काय गरज होती असा सवाल साखर उद्योगाने केंद्राला केला होता. पण केंद्राने सणासुदीमुळे हा कोटा वाढवून दिल्याचे सांगत हा विषय तिथेच थांबवला होता.

Sugar Export
Sugar Export : साखर निर्यात धोरणावरून उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात शीतयुद्ध

सध्या एस ३० साखरेस क्विंटलला ३३१० ते ३३३५ तर एम ३० साखरेस ३३३० ते ३३५० रुपये दर आहे. काही कारखान्यांना ३३७० रुपयांपर्यंतही दर मिळाला आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कारखान्यांनी दराचा अंदाज घेत साखरविक्री करण्यास प्राधान्य दिले आहे.

मिठाई उद्योगातून दिवाळीसाठी अद्याप पूर्ण क्षमतेने साखर खरेदी सुरू झालेली नाही. यंदा कोणत्याही साथ-आजाराचा दिवाळीवर परिणाम होण्याची शक्यता कमी असल्याने पूर्ण क्षमतेने ही खरेदी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून होऊ शकते. यामुळे १५ ऑक्टोबरपर्यंत तरी साखरेचे दर ३४०० रुपयांच्या आसपास राहू शकतात, असे साखर उद्योगातून सांगण्यात आले.

Sugar Export
Sugar Mills : गत हंगामातील महसूल विभागणी सूत्र यंदाच्या हंगामापूर्वीच निश्चित करा

१५ ऑक्टोबरला पश्चिम महाराष्ट्र वगळता अन्य भागांतील साखर कारखाने सुरू होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील विशेष करून दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली भागातील कारखाने २० तारखेपर्यंत सुरू होतील, असा अंदाज कारखाना प्रतिनिधींचा आहे.

तज्ज्ञांच्या मतानुसार देशात यंदा एक ऑक्टोबरपासून साखर हंगाम सुरू करण्याचे नियोजन आहे. यंदा कर्नाटकातील साखर हंगाम सर्वप्रथम सुरू होणार असला तरी काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याने सुरुवातीच्या टप्प्यात रखडतच हंगामाची सुरुवात होईल, असा अंदाज आहे.

यामुळे यंदाच्या हंगामातील साखर पूर्ण क्षमतेने बाजारात येण्यास ऑक्टोबरचा उत्तरार्ध जाईल, तोपर्यंत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांना आहे ती साखर विक्री करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

१५ ऑक्टोबरनंतर नवीन साखर बाजारात

गेल्या पंधरा दिवसांपासून साखरेची मागणी व दर स्थिर आहेत. दिवाळीची खरेदी सुरू होताच दरात किरकोळ वाढ होईल, असे साखर बाजारातील सूत्रांनी सांगितले. १५ ऑक्टोबरनंतर मात्र यंदाच्या हंगामाची साखर बाजारात आल्यास दर कमी होऊ शकतात, असे साखर उद्योगातून सांगण्यात आले. पण दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुढील पंधरा दिवस तरी साखर कारखान्यांना सध्या समाधानकारक दरात साखरविक्री करता येऊ शकेल, असे उद्योगातील सूत्रानी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com