Sugarcane Farming : कोकणात इंधनासाठी ऊस लागवड

कोकणातील उसापासून केवळ इंधननिर्मिती करण्याची कल्पना डोळ्यांसमोर ठेवून सुमारे १० वर्षांपूर्वी कोकणात ऊस लागवड कशा पद्धतीने करता येईल यावर संशोधन केले होते. आणि त्यातून सिंचनाविना तसेच कोणत्याही रासायनिक खतांविना कोकणात ऊस पीक घेण्याची पद्धतीही विकसित केली होती.
Sugarcane Sowing
Sugarcane SowingAgrowon

डॉ. आनंद कर्वे -

कोकणातील उसापासून केवळ इंधननिर्मिती (Fuel generation) करण्याची कल्पना डोळ्यांसमोर ठेवून सुमारे १० वर्षांपूर्वी कोकणात ऊस लागवड (Sugarcane Cultivation in Konkan) कशा पद्धतीने करता येईल यावर संशोधन केले होते. आणि त्यातून सिंचनाविना तसेच कोणत्याही रासायनिक खतांविना (Chemical fertilizers) कोकणात ऊस पीक (Sugarcane Crop) घेण्याची पद्धतीही विकसित केली होती. या पद्धतीने ऊस लागवड केल्यास फारसा खर्च न करता प्रति हेक्टर सुमारे शंभर ते दीडशे टन उसाचे उत्पन्न मिळेल. कोकणात इंधनासाठी ऊस लागवड केली आणि तिथे इंधनाचे कारखाने निघाले, तर कोकणातील ग्रामीण भागातही पश्‍चिम महाराष्‍ट्राप्रमाणे (West Maharashtra) सुबत्ता येईल.

उसाच्या रसात ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि सुक्रोज अशा तीन प्रकारची साखर विरघळलेल्या स्वरूपात आढळते. पक्व उसाच्या ताज्या खोडात सुमारे १५ टक्के एकूण शर्करा असते, पण त्यातल्या विविध प्रकारच्या साखरेचे प्रमाण मात्र भौगोलिक परिस्थितीनुसार बदलते. घाटावरील हवामानात उसातील सुक्रोजचे म्हणजेच स्फटिकशर्करेचे प्रमाण १२ ते १४ टक्के इतके असते, तर कोकणातल्या हवामानात ते सुमारे ९ टक्के इतकेच असते.

Sugarcane Sowing
Lumpy Skin : राज्यात ‘लम्पी स्कीन’ नियंत्रणात

कोकणातील उसातून स्फटिकशर्करा काढणे परवडत नाही म्हणून कोकणात साखर कारखाने नाहीत आणि ऊस लागवडही केली जात नाही. परंतु वर दिलेल्या कोणत्याही प्रकारच्या साखरेचे ‘यीस्ट’नामक एका बुरशीद्वारे ऑक्सिजनविरहित वातावरणात किण्वन केल्यास त्यांच्यापासून इथेनॉल (मद्यार्क) मिळते.

Sugarcane Sowing
Lumpy Skin : सातारा जिल्ह्यात ३४२ पशुधन मृत

भारतात आयात केल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आयात केला जाणारा आणि आपल्या परकीय चलनाचा सर्वाधिक व्यय करणारा पदार्थ म्हणजे पेट्रोलियम किंवा खनिज तेल. स्वयंचलित वाहनांमध्ये आपण इंधन म्हणून इथेनॉल वापरू शकतो आणि असे केल्यास आपल्याला खनिज तेलाची आयात बऱ्याच प्रमाणात कमी करता येईल.

कोकणातील उसापासून केवळ इंधननिर्मिती करण्याची कल्पना डोळ्यांसमोर ठेवून प्रस्तुत लेखकाने सुमारे १० वर्षांपूर्वी कोकणात ऊस लागवड कशा पद्धतीने करता येईल यावर संशोधन केले होते. आणि त्यातून सिंचनाविना तसेच कोणत्याही रासायनिक खतांविना कोकणात ऊस पीक घेण्याची पद्धतीही विकसित केली होती. ती पुढीलप्रमाणे ः एप्रिल महिन्यात गादीवाफ्यांवर उसाच्या कांड्यांचे प्रत्येकी एक डोळा असलेले तुकडे मातीत उभे लावून त्यांपासून रोपे तयार करून घ्यावीत. साधारणतः १ चौ.मीटर क्षेत्रातून ३०० ते ४०० रोपे मिळतील. या रोपांना पावसाळा सुरू होईपर्यंत हाताने पाणी घालून ती जगवावीत. हा गादीवाफा घराजवळ असेल, तर घरगुती सांडपाण्यावरही ही रोपे वाढविता येतील. जून महिन्यात पावसाळा सुरू झाल्यावर रोपे गादीवाफ्यातून काढून शेतात लावावीत. दोन ओळींमधील अंतर १ मी. आणि एका ओळीतल्या दोन रोपांमधील अंतर ५० से.मी. ठेवावे (प्रति हेक्टर २० हजार रोपे). कोकणात पावसाळ्यात पुरेसा पाऊस पडतो. त्यामुळे पावसाळ्याच्या चार महिन्यांमध्ये या पिकाला पाणी देण्याची अजिबात गरज नसते. आणि कोकणातील हवा दमट असल्याने, पावसाळ्यानंतरही दोन महिने हा ऊस पाणी न देता शेतात ठेवता येतो. त्याची नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तोडणी केल्यास या उसाच्या खोडांमध्ये सुमारे १२ ते १५ टक्के किण्वनक्षम साखर तयार झालेली असते. जर या रसावर ताबडतोब प्रक्रिया करणे शक्य नसेल, तर त्या रसाची काकवी करून ठेवावी आणि गरजेनुसार ती वापरावी.

महाराष्ट्रात ऊस हे सर्वाधिक पाणी वापरणारे आणि सर्वाधिक रासायनिक खते खाणारे पीक समजले जाते. कोकणात पाऊस भरपूर पडतो आणि वर दिलेल्या लागवडप्रणालीत आपला ऊस मुख्यतः पावसाळ्यातच शेतात उभा राहणार असल्याने त्याला लागणाऱ्या पाण्याचा विचार या लेखात केलेला नाही. पण रासायनिक खतांविना उसाची लागवड हा वादाचा मुद्दा असल्याने त्यावर या लेखात ऊहापोह केला आहे.

मातीत नैसर्गिकरीत्या आढळणारे खनिज पदार्थ पाण्यात अत्यंत कमी प्रमाणात विरघळतात. त्यामुळे मातीतली खनिजे वनस्पतींना उपलब्ध होऊ शकत नाहीत. आणि म्हणूनच शेतकऱ्यांना पाण्यात विद्राव्य अशी रासायनिक खते वापरावी लागतात. पण याउलट मातीतल्या सूक्ष्मजंतूंना मात्र आपल्याला आवश्यक असणारे खनिज घटक थेट मातीतून ग्रहण करता येतात. प्रस्तुत लेखक हा वनस्पतिशास्त्राचा अभ्यासक असून, निसर्गात वाढणाऱ्या वनस्पतींना मातीतली खनिजे कशी मिळतात याचा अभ्यास तो गेली कित्येक वर्षे करीत आहे. प्रस्तुत लेखकाच्या मते वनस्पतींना मातीतली खनिजे थेट मातीतून घेता येत नाहीत तर ती त्यांना मातीतल्या सूक्ष्मजंतूंद्वारे मिळतात आणि ती मिळविण्यासाठी वनस्पती आपल्या मुळांमधली प्रतिजैवके वापरून मातीतल्या सूक्ष्मजंतूंना चक्क मारून खातात. सर्व वनस्पतींच्या मुळांमध्ये औषधी गुणधर्म असतात हा शोध आपल्या आयुर्वेदाचार्यांनी फार पूर्वीच लावला होता (नास्ति मूलम् अनौषधम्|).

प्रस्तुत लेखकाने आपल्या अभ्यासातून हे सिद्ध केले आहे, की मुळांमधील प्रतिजैवकांमुळे मुळांच्या संपर्कात आलेले सूक्ष्मजंतू मरतात आणि या जंतूंच्या पेशिकांमधून बाहेर पडणारे सेद्रिय पदार्थ मुळांद्वारे शोषून घेतले जातात. मुळांमध्ये असणारी प्रतिजैवके आणि मेलेल्या जंतूंच्या पेशिकांमधून बाहेर पडणारे पदार्थ शोषून घेण्याची क्षमता या गुणधर्मांचा फायदा घेऊन मलमूत्रामुळे प्रदूषित झालेल्या पाण्याचे शुद्धीकरण करणारी ‘रूट झोन टेक्नॉलॉजी' नामक एक प्रणाली जगात अनेक ठिकाणी वापरली जाते. नागपूरस्थित नॅशनल एन्व्हायर्न्मेंटल इन्जिनियरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (National Environmental Engineering Research Institute) या सरकारी संस्थेने विकसित केलेली फायटोरिड (Phytorid) नामक जलशुद्धीकरणप्रणालीही याच तत्त्वावर आधारलेली आहे. पण यातला विरोधाभास असा आहे, की आपण विकसित केलेली जलशुद्धीकरणाची पद्धती वनस्पतींच्या कोणत्या गुणधर्मांवर आधारित आहे हेच त्या विकसकांना उमगलेले नाही.

मलमूत्राने प्रदूषित झालेले पाणी शुद्ध करण्याची जी यांत्रिक पद्धती आहे, तिच्यात दूषित पाण्यातून ऑक्सिजन वायू बुडबुडविला जातो, म्हणून वनस्पतींवर आधारित पद्धतीतही वनस्पतींच्या मुळ्यांद्वारे दूषित पाण्यात ऑक्सिजन सोडला जातो असे या विकसकांचे म्हणणे आहे. पण ते चुकीचे आहे. वस्तुस्थिती अशी आहे की वनस्पतींच्या मुळ्या सतत श्‍वसन करीत असल्याने त्यांच्यातून जमिनीत किंवा पाण्यात कार्बन डायऑक्साइड सोडला जातो, ऑक्सिजन नाही.

वनस्पती आपल्याला लागणारी खनिजद्रव्ये मातीतल्या सूक्ष्मजीवांकडून मिळवितात हे उमगल्याने मातीत सूक्ष्मजंतू असणे वनस्पतींच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहे हे वाचकांच्या लक्षात येईल. ज्याप्रमाणे आपण आपले अन्न मिळविण्यासाठी विविध प्रकारचे प्राणी आणि वनस्पती वाढवितो, त्याच प्रकारे वनस्पतीही मातीतल्या सूक्ष्मजंतूंना वाढवितात. त्यासाठी त्यांना खाद्य म्हणून वनस्पती आपली कोमेजलेली फुले, पिकलेली पाने आणि पिकलेली फळे जमिनीवर टाकतात. या पदार्थांना खाऊन मातीतले सूक्ष्मजंतू वाढतात आणि मग आपल्या मुळांमधील प्रतिजैवकांचा वापर करून वनस्पती त्या जंतूंना मारून खातात. हीच प्रक्रिया आपला ऊसही करणार असल्याने, कोकणातील उसाच्या लागवडप्रणालीत पिकाच्या दोन ओळींमधील जागेत कोणताही जैवभार (हिरवी पाने, पालापाचोळा, पिकांमधून निघणारा त्याज्य माल, भाताचा पेंढा किंवा अन्य जैवभार) जमिनीवर पसरून ठेवावा.

त्यामुळे जमिनीतल्या सूक्ष्मजंतूंना कार्बनयुक्त अन्न मिळते. हा जैवभार जमिनीच्या पृष्ठभागावरच राहू द्यावा. पावसाने भिजलेला जैवभार कुजून तो जसजसा मातीत मिसळत जाईल त्यानुसार शेतात नवा जैवभार पसरत राहावे. जैवभाराच्या या आच्छादनामुळे शेतातल्या तणांचे तर नियंत्रण होईलच, पण मातीत मिसळल्या जाणाऱ्या जैवभारामुळे जमिनीतल्या सूक्ष्मजंतूंचेही पोषण होईल आणि या सूक्ष्मजंतूंमुळे उसाचेही पोषण होईल. या पद्धतीने ऊस लागवड केल्यास फारसा खर्च न करता प्रति हेक्टर सुमारे शंभर ते दीडशे टन उसाचे उत्पन्न मिळेल.

पश्‍चिम महाराष्ट्रातल्या बागायती भागात ज्याप्रमाणे दर २५-३० किलोमीटरवर एकेक साखर कारखाना दिसतो आणि या कारखानदारीने तिथल्या ग्रामीण भागात जशी सुबत्ता दिसते, त्याप्रमाणे कोकणात जर इंधनाचे कारखाने निघाले तर कोकणातील ग्रामीण भागातही तशीच सुबत्ता येईल. पेट्रोलियमची आयात तेवढ्या प्रमाणात कमी करता आली तर देशाचाही फायदा होईल यात शंका नाही.

लेखक ‘आरती’चे (अॅप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट-ARTI) संस्थापक अध्यक्ष आणि विश्‍वस्त आहेत.

९८८१३०९६२३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com