
पुणेः रशिया आणि युक्रेनमधून सूर्यफुल तेलाचा पुरवठा वाढला आहे. या दोन्ही देशांनी आपल्याकडील साठे कमी करण्यासाठी आक्रमक विक्री सुरू केली आहे. त्यामुळे सूर्यफुल तेलाचे दर घटले आहेत. सोयातेलाच्या तुलनेत सूर्यफुल तेल आणखी स्वस्त झाले आहे. तेलासाठी आयातीवर अवलंबून असलेले भारत आणि युरोपीयन युनियनसारखे देश सोयातेलाच्या तुलनेत सूर्यफुल तेलाची खरेदी वाढवण्याच्या तयारीत आहेत. त्याचा परिणाम म्हणून सोयातेलाचे दर घटण्याचा अंदाज आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने यासंबंधीची बातमी दिली आहे.
जगातील ६० टक्के सूर्यफुल रशिया आणि युक्रेन या दोन देशांत पिकवले जाते. जागतिक सूर्यफुल तेल उत्पादनात या देशांचा वाटा ७६ टक्के आहे. या दोन देशांमध्ये युध्द सुरू असल्यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली. त्यामुळे तिथे सध्या मागील हंगामातील सूर्यफुलाचा मोठा साठा आहे. हा साठा कमी करण्यासाठी या देशांनी सूर्यफुलाचे गाळप वाढवले. सूर्यफुल तेलाचा निपटारा करण्यासाठी दरही कमी केले आहेत. रशिया नव्या हंगामासाठी आपल्याकडील जुना साठा कमी करत आहे. तर युक्रेनला निर्यातीसाठी सेफ पॅसेज मिळाला आहे. त्याचा फायदा घेऊन युक्रेन बंदरांवर अडकून पडलेल्या सूर्यफुल तेलाचा निपटारा करत आहे.
या दोन्ही देशांच्या आक्रमक विक्रीमुळे सूर्यफुल तेल सोयाबीन तेलापेक्षा आणखी स्वस्त झाले आहे. गेल्या नऊ महिन्यांतील सर्वात कमी दरपातळीवर सूर्यफुल तेल पोहोचले आहे. त्याचा फटका सोयातेलाला बसत आहे. एरवी सूर्यफुल तेलाचे दर सोयातेलापेक्षा जास्त असतात. मात्र आता परिस्थिती उलट झाली आहे. दर कमी झाल्यानंतर सूर्यफुल तेलाची विक्री वाढली आहे, असे इंटरनॅशनल सनफ्लाॅवर ऑईल असोसिएशनचे अध्यक्ष संदीप बाजोरिया यांनी सांगितले.
चालू आठवड्यात सोयातेलापेक्षा सूर्यफुल तेल टनामागे १०० डाॅलरने स्वस्त झाले. तसेच पामतेलाच्या तुलनेत सूर्यफुल तेलाच्या दरातील तफावत आता कमी झाली आहे. मागील महिन्यात पामतेल आणि सूर्यफुल तेलाच्या दरातील तफावत टनामागे ५०० डाॅलर होती. म्हणजेच सूर्यफुल तेल ५०० डाॅलरने महाग होते. पण आता ही तफावत २५० डाॅलरवर आली आहे.
सोयातेलावरील परिणाम
सूर्यफुल तेल स्वस्त झाल्याचा थेट परिणाम सोयातेलाच्या किंमतींवर झाला आहे. कारण या दोघांची स्पर्धा असते. आंतरराष्ट्रीय बाजारात मागील दोन दिवसांत सोयातेलाचे दर मोठ्या प्रमाणात तुटले होते. सूर्यफुल तेलाचे घटलेले दर हे त्यामागचे एक महत्त्वाचे कारण ठरले. काल बाजार बंद झाला तेव्हा सोयातेलाचे दर ६५.१९ सेंट प्रतिपाऊंडवर होते. गुरुवारी आणि शुक्रवारी सोयातेलाचे दर ११ टक्क्यांनी कमी झाले होते.
भारत खरेदी वाढवणार?
आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी झाल्याने भारत सूर्यफुल तेलाची खरेदी वाढविणार आहे. भारताने ऑक्टोबरमध्ये सुमारे १ लाख ४५ हजार टन तर नोव्हेंबरमध्ये १ लाख ८० हजार टन सूर्यफुल तेलाची आयात केली. पण डिसेंबरमध्ये भारताची सूर्यफुल तेल खरेदी २ लाख ३० हजार टनावर जाण्याची शक्यता असल्याचे डिलर्सनी सांगितले.
किती होती तफावत?
सध्या भारताला सूर्यफुल तेल स्वस्त मिळत आहे. वाहतूक, विमा आणि इतर खर्चासह भारताला सूर्यफुल तेल १ हजार ३०० डाॅलर प्रतिटन दराने मिळत आहे. मात्र सोयाबीन तेल बुधवारी १ हजार ३२० डाॅलरने आयात होत होते. सहाजिकच भारताने सूर्यफुल तेलाची खरेदी वाढवली. मात्र सोयातेलाचे दर खूप कमी होण्याची शक्यता नसल्याचे विश्लेषकांनी सांगितले. शुक्रवारी सोयातेलाच्या दरात काहीशी घसरण झाल्यानंतर दर पुन्हा काहीसे सुधारून ६५.१९ सेंटवर पोचले होते.
सोयाबीनवरील परिणाम
सोयातेलाचे दर कमी झाल्यानंतर सोयाबीनचे दरही तुटले होते. सोयाबीनचे दर १४.७१ डाॅलर प्रतिबुशेल्सवरून १४.२५ डाॅलरपर्यंत आले होते. मात्र सोयातेलात सुधारणा होताच सोयाबीनचे दर पुन्हा १४.४० डाॅलरवर पोचले होते. सोयातेलाचे दर आणखी सुधारतील आणि त्यामुळे सोयाबीनच्या दरावरही सकारात्मक परिणाम होईल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.