Cotton : नवीन कापसाला १० हजार रुपये दर

देशात यंदा कापूस लागवड ६.६५ टक्क्यांनी जास्त आहे. तर देशातील काही बाजारांमध्ये चालू हंगामातील नवीन कापसाची आवक सुरू झाली आहे.
Cotton Rate
Cotton RateAgrowon

पुणे ः देशात यंदा कापूस लागवड (Cotton Cultivation) ६.६५ टक्क्यांनी जास्त आहे. तर देशातील काही बाजारांमध्ये चालू हंगामातील नवीन कापसाची आवक (New Cotton Arrival) सुरू झाली आहे. पुढील महिन्यात उत्तरेतील आणखी काही बाजारांमध्ये नवीन कापूस येईल. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे दर (Cotton Rate) तेजीत आहेत.

Cotton Rate
Cotton : साठ गावांत ‘एक गाव एक वाण’

देशात यंदा कापूस लागवड सहा टक्क्यांनी वाढली. मात्र पावसाने पिकाचे नुकसान होत आहे. त्यातच पिकावर देशभरात कीड-रोगांचा प्रादुर्भाव होऊन नुकसान होत असल्याचे अहवाल आहेत. त्यामुळे उत्पादनाचे अंदाज चुकण्याची शक्यता आहे. पिकाचे नुकसान होत असल्याने लागवड वाढली तरी त्याचा दरावर काही परिणाम होताना दिसत नाही. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात कापूस दरात ८ टक्क्यांची वाढ झाली. तसेच पुढील काळात कापसाच्या दरात घसरण होण्याची शक्यता दिसत नसल्याचे जाणकारांनी सांगितले.

Cotton Rate
Cotton : गुलाबी बोंडअळीला कसं रोखाल?

देशात साधारणपणे ऑक्टोबरमध्ये नवीन कापसाची आवक होते. मात्र हरियानातील पालवाल जिल्ह्यात नवीन कापसाची आवक सुरू झाली. खरिपात आगाप लागवड झालेल्या कापसाची आवक होत असल्याचे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले. तर हरियानातील इतर भाग आणि पंजाबमध्ये सप्टेंबरपासून नवीन कापसाची आवक वाढेल. सध्या बाजारात ५०० गाठींपेक्षा कमी कापसाची आवक होत आहे. मात्र या कापसाचा दर गेल्या वर्षीपेक्षा जवळपास दुप्पट आहे. नवीन कापसाला ९ हजार ९०० ते १० हजार रुपये दर मिळत आहे. मागील वर्षी या काळातील कापसाला सरासरी ५ हजार रुपये दर मिळाला होता.

जाणकारांच्या मते, यंदा देशात सुरुवातीच्या अंदाजाप्रमाणे कापूस उत्पादन होण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे पुढील काळात कापसाचा दर ४५ हजार ते ४७ हजार रुपये प्रतिगाठींच्या दरम्यान राहतील. बाजारात कापसाची आवक दाटल्यानंतर दर ३५ हजार रुपयांपर्यंतही कमी होऊ शकतात. मात्र त्यानंतर दरात पुन्हा सुधारणा होईल. बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दर पुन्हा वाढतील, असा अंदाजही जाणकारांनी व्यक्त केला. मगील वर्षीचा कापूस सध्या खुप कमी प्रमाणात शिल्लक आहे. त्यामुळे जिनिंग मिल्स नवीन उत्पादनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे यंदा कापूस दराला चांगली झळाळी असेल, असे जाणकारांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय बाजारातही मागील काही आठवड्यांमध्ये कापसाचे दर २१ टक्क्यांनी सुधारले. न्यू यॉर्क येथील इंटरकाँटिनेंटल कॉटन एक्स्चेंजवर कापूस दराने १२५ सेंट प्रतिपाउंडचा वरचा टप्पा गाठल्यानंतर सध्या कापसाचे वायदे ११५ सेंटवर आहेत. अमेरिकेतील कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आणि घटलेला शिल्लक साठा यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापासाचा दर तेजीत आहे, असे जाणकारांनी सांगितले.

- भारतातील कापूस उत्पादनाबाबतही नाही निश्‍चिती.

- देशात सध्या १२४ लाख २७ हजार हेक्टरवर कापूस

- पिकाचे नुकसान जास्त

- पीक आणि नुकसानस्थिती पुढील १५ ते २० दिवसांत स्पष्ट होणार

- अमेरिकेतील कापूस पिकाची स्थिती यंदा चांगली नाही

- अमेरिकेत यंदा नीचांकी उत्पादन राहण्याची शक्यता

यंदा चांगला दर मिळण्याचा अंदाज

सरळ भाषेत सांगायचे झाले तर यंदा अमेरिका आणि भारतातही कापूस उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. अमेरिकेत तर उत्पादन नीचांकी पातळी गाठण्याची शक्यता आहे. तर भारतात कापूस लागवड ६ टक्क्यांनी वाढूनही उत्पादन मागील वर्षी प्रमाणे राहू शकते, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत. याचाच अर्थ असा की कापूस उत्पादकांना यंदा चांगला दर मिळणार आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांनी आतापासूनच बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवायला हवे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com