
फ्यूचर्स किमती ः सप्ताह- २२ ते २८ एप्रिल २०२३
Commodity Market Update एप्रिल महिन्यात कापूस (Cotton) वगळता इतर सर्व वस्तूंच्या किमती घसरल्या. मक्याच्या १९ टक्क्यांनी, हळदीच्या २ टक्क्यांनी, हरभरा (Chana) व मूग यांच्या ५ टक्क्यांनी, तर सोयाबीनच्या किमती ४ टक्क्यांनी कमी झाल्या.
या घसरणीला मुख्य कारण या महिन्यात वाढलेली आवक. मक्याच्या आवकेत या महिन्यात २३२ टक्क्यांनी वाढ झाली. हळदीची आवक ८३ टक्क्यांनी, तर हरभऱ्याची आवक ८ टक्क्यांनी वाढली. सोयाबीनच्या किमतीत यापुढे वाढ होणार नाही, या अंदाजाने आवकेत ६३ टक्क्यांनी वाढ झाली. तुरीची आवक (Tur Arrival) आता कमी होत आहे.
कापसाची आवक १७ टक्क्यांनी वाढली असली, तरी कापसाचे भाव गेल्या महिन्याच्या तुलनेने ०.६ टक्क्याने वाढले आहेत.
गेल्या दोन सप्ताहांत मात्र ते घसरत आहेत. या वर्षी कापसाचे उत्पादन कमी होण्याचा अंदाज आहे व देशांतर्गत मागणीसुद्धा वाढती आहे. जागतिक पातळीवर मंदी असली तरी भारतातील मागणी वाढती आहे.
त्यामुळे रब्बी हंगामानंतर कापसाच्या भावावर लक्ष ठेवणे जरुरीचे आहे. सध्याच्या स्पॉट भावापेक्षा ऑगस्ट डिलिव्हरी भाव फक्त २ टक्क्यांनी अधिक आहेत. मेनंतर पुढील किमती एप्रिलमधील आवकेवर व मॉन्सूनच्या वाटचालीवर अवलंबून असतील.
२ मेपासून मक्याचे सप्टेंबर डिलिव्हरी व्यवहार NCDEX मध्ये सुरु होतील. यासाठी गुलाब-बाग हे डिलिवरी केंद्र असेल. सांगलीला सुद्धा डिलिवरी देता येईल. तेथे अधिकृत भावापेक्षा रु. १५० अधिक मिळतील. या व्यवहारासाठी ऑप्शन ट्रेडिंगसुद्धा करता येईल.
२८ एप्रिल रोजी संपणाऱ्या सप्ताहातील किमतीमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.
कापूस/कपाशी
MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात रु. ६२,३६० वर आले होते. या सप्ताहात ते ०.९ टक्क्याने घसरून रु. ६१,७८० वर आले आहेत. जून फ्यूचर्स भाव १.६ टक्क्याने घसरून रु. ६२,९०० वर आले आहेत.
ऑगस्ट फ्यूचर्स रु. ६३,००० वर आले आहेत. ते सध्याच्या स्पॉट भावापेक्षा २ टक्क्यांनी अधिक आहेत.
कपाशीचे स्पॉट भाव (प्रती २० किलो) गेल्या सप्ताहात रु. १,५५८ वर आले होते. या सप्ताहात ते ०.७ टक्क्यांनी घसरून रु. १,५४७ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,५६० वर आहेत. कपाशीचे हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) रु. ६,३८० व मध्यम धाग्यासाठी रु. ६,०८० जाहीर झाले आहेत.
मका
NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (गुलाब बाग) या महिन्यात घसरत आहेत. या सप्ताहात त्या पुन्हा १.३ टक्क्याने घसरून रु. १,८९४ वर आल्या आहेत. फ्यूचर्स (मे डिलिव्हरी) किमतीसुद्धा १.५ टक्क्याने घसरून रु. १,९०३ वर आल्या आहेत.
जुलै फ्यूचर्स किमती रु. १९२६ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या १.७ टक्क्याने अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. १,९६२ आहे. रब्बी मक्याची आवक सुरू झाली आहे; त्याचा परिणाम किमतींवर दिसून येत आहे.
हळद
NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती गेल्या सप्ताहात रु. ६,७९५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.६ टक्क्याने घसरून रु. ६,७५५ वर आल्या आहेत. मे फ्यूचर्स किमती रु. ६,७२८ वर आल्या आहेत. जून फ्यूचर्स किमती रु. ६,८१४ वर आल्या आहेत; स्पॉट भावापेक्षा त्या ०.९ टक्क्याने अधिक आहेत.
हरभरा
हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात ३ टक्क्यांनी घसरून रु. ४,८०० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.५ टक्क्यांनी घसरून रु. ४,७७५ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,३३५ आहे. आवक वाढू लागली आहे. त्याचा परिणाम किमतींवर दिसत आहे.
मूग
मुगाच्या किमती एप्रिल महिन्यात घसरत आहेत. मुगाची स्पॉट किमत (मेरटा) या सप्ताहात ५.८ टक्क्यांनी घसरून रु. ८,१०० वर आली आहे. आवक कमी आहे.
सोयाबीन
सोयाबीनच्या स्पॉट किमती एप्रिल महिन्यात घसरत होत्या. गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किमत (अकोला) १.९ टक्का घसरून रु. ५,३५३ वर आली होती. या सप्ताहात ती पुन्हा २.४ टक्क्यांनी घसरून रु. ५,२२७ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,३०० आहे. सोयाबीनची आवक कमी होत होती; पण गेल्या तीन सप्ताहांत ती वाढलेली आहे.
तूर
तुरीची स्पॉट किमत (अकोला) या सप्ताहात १.४ टक्क्याने वाढून रु. ८,०७५ वर आली आहे. हमीभाव रु. ६,६०० आहे
(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.