अमेरिका बनला भारताचा सर्वांत मोठा व्यापार भागीदार

चीनला मागे टाकले; द्विपक्षीय व्यापार ११९.४२ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला
Agriculture Export
Agriculture ExportAgrowon

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका भारताचा (India America Trade) सर्वांत मोठा व्यापार भागीदार (Trade Partner) बनला असून, द्विपक्षीय व्यापार ११९.४२ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला असून, चीनला मागे टाकले असल्याचे भारताच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या ताजा आकडेवारीवरून दिसून आले आहे.

आतापर्यंतच्या माहितीवरून, भारताची अमेरिकेतील व्यापार निर्यात मागील आर्थिक वर्षात सुमारे ५१.६२ बिलियन डॉलरवरून ७६.११ बिलियन डॉलर झाली आहे. तर आयात सुमारे २९ बिलियन डॉलरवरून सुमारे ४३.३१ बिलियन डॉलरपर्यंत वाढली आहे. भारतातून अमेरिकेला होणाऱ्या प्रमुख निर्यातीत पॉलिश केलेले हिरे, औषधी उत्पादने, दागिने, हलके तेल आणि पेट्रोलियम, गोठवलेली कोळंबी, सौंदर्यप्रसाधने आणि बरेच काही समाविष्ट आहे. अमेरिकेतून भारतात प्रामुख्याने तेल, द्रवीभूत नैसर्गिक वायू, सोने, कोळसा, पुनर्वापर केलेली उत्पादने आणि भंगार लोखंड, मोठे बदाम आदींची आयात होते. २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारत आणि चीनमधील द्विपक्षीय व्यापाराचे प्रमाण सुमारे ११५.४२ अब्ज डॉलर आहे, जे मागील आर्थिक वर्षातील ८६.४ अब्ज डॉलरपेक्षा सुमारे १/३ ने वाढले आहे, असेही या आकडेवारीवरून दिसून आले आहे.

त्यापैकी, चीनला भारताची निर्यात सुमारे २१.२५ अब्ज डॉलर आहे आणि चीनची आयात सुमारे ९४.१६ अब्ज डॉलर आहे, असे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. चीनमधून आयात केलेल्या वस्तूंच्या व्यापाराचे प्रमाण वाढत आहे आणि शीर्ष १०० आयात केलेल्या वस्तूंचे आयात मूल्य १०० दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त आहे. उत्पादित वस्तूंच्या आयातीसाठी चीनवरील भारताचे अवलंबित्व कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत, असे भारतीय तज्ज्ञांचे मत आहे.

चीन आणि भारताची सांख्यिकीय माहिती भिन्न आहे, ज्यामुळे त्या प्रत्येकाने घोषित केलेल्या व्यापाराच्या आकड्यांमध्ये फरक दिसून येतो. २०१३-१४ ते २०१७-१८ आणि २०२०-२१ या कालावधीत चीन भारताचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार असल्याचे चीनकडील आकडेवारी दर्शवते. चीनव्यतिरिक्त, अमेरिका आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) हे एकेकाळी भारताचे सर्वांत मोठे व्यापारी भागीदार होते. चीन नेहमीच भारताचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार राहिलेला नाही आणि अमेरिका भारताचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार बनण्याची ही पहिलीच वेळ नाही. बऱ्याच काळापासून, चीन आणि भारताने तुलनेने मोठी व्यापार तूट कायम ठेवली आहे, तर भारताने अमेरिकेसोबत व्यापार अधिशेष राखला आहे. त्यामुळे भारताने अमेरिकेला नेहमीच महत्त्वाची निर्यात बाजारपेठ मानली आहे.

भारत लहान स्क्रूपासून मोठ्या टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाइल फोनपर्यंतच्या वस्तूंची आयात करतो, यातील बहुतेक उत्पादने चीनची आहेत. ही चिनी उत्पादने उच्च दर्जाची आणि कमी किमतीची आहेत आणि इतर देशांपेक्षा जवळ जवळ अतुलनीय आहेत. ज्यामुळे चिनी उत्पादने भारतीय बाजारपेठेवर कब्जा करत आहेत. तर अमेरिकेची भारताला होणारी बहुतांश निर्यात ऊर्जा उत्पादने आणि कृषी उत्पादनांची आहे.

भारताला चीनला बाजूला ठेवायचेय

अमेरिका-भारत व्यापार संबंधांचे सतत बळकटीकरण हे महासाथ आणि चीनपासून ‘दुकल’ करण्याचा भारताचा प्रयत्न या दोन्हींमुळे आहे. भारताला चीनला बाजूला ठेवायचे आहे, अमेरिका आणि इतर देशांकडून भांडवल गुंतवणूक वाढवायची आहे. उच्च-तंत्रज्ञान उपक्रम हाती घ्यायचे आहेत आणि भारताच्या देशांतर्गत उत्पादन उद्योगाच्या मोठ्या विकासाला चालना देण्यासाठी जागतिक पुरवठा साखळीत भाग घ्यायचा आहे. मात्र सद्यःस्थितीत चीन-भारत आर्थिक आणि व्यापारी सहकार्याच्या मूलभूत गोष्टी बदललेल्या नाहीत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com