Raisin Market : सौदे होऊनही ऐनवेळी बेदाणा खरेदीसाठी व्यापाऱ्यांची ‘ना’

एकीकडे द्राक्षाचे दर पडले असताना, द्राक्ष उत्पादक घायकुतीला आला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बेदाणा उत्पादनाकडे वळले.
Raisin Market
Raisin MarketAgrowon

Solapur Raisin Market : एकीकडे द्राक्षाचे दर (Grape Rate) पडले असताना, द्राक्ष उत्पादक घायकुतीला आला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बेदाणा उत्पादनाकडे (Raisin Production) वळले.

पण आता बेदाणा विक्रीत पासिंगच्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून सौदे होऊनही ऐनवेळी बेदाणा नाकारण्याचा अर्थात थेट अडवणुकीचा प्रकार पंढरपूर बाजार समितीमध्ये (Pandharpur APMC) सर्रास घडतो आहे.

पण या प्रकारावर बाजार समितीचे प्रशासन मात्र शेतकऱ्यांच्या तक्रारीची वाट पाहत आहे.

सोलापूर जिल्ह्यात सुमारे २५ हजार एकरांहून अधिक क्षेत्रांवर द्राक्ष घेतली जातात. त्यात जवळपास १७ हजार एकरांवरील द्राक्षाचा बेदाणा तयार होतो.

तर उर्वरित द्राक्ष क्षेत्र हे टेबलग्रेप आणि निर्यातीसाठी उपयोगात आणली जातात. वास्तविक अलीकडच्या दोन-तीन वर्षांत द्राक्षाला दर मिळत नाही. त्यामुळे बहुतांश शेतकरी बेदाण्याकडे वळले आहेत.

Raisin Market
Raisin Market : बेदाणा उत्पादकांवर ढगाळ वातावरणाच संकट

पंढरपूर, बार्शी, मोहोळ, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापुरात प्रामुख्याने बेदाण्याचे उत्पादन घेतले जाते. सोलापूर आणि पंढरपूर या दोन्ही बाजार समित्यांमध्ये बेदाण्याचे सौदे होतात.

सोलापुरात दर गुरुवारी आणि पंढरपुरात दर मंगळवारी व शनिवारी बेदाण्याचे सौदे होतात. तासगावनंतर पंढरपुरातील बेदाणा बाजाराकडे पाहिले जाते. परंतु खरेदीदार व्यापाऱ्यांच्या या लुटीच्या भूमिकेमुळे बेदाणा बाजारावर प्रश्न निर्माण झाला आहे.

Raisin Market
Raisin Market : ढगाळ वातावरणामुळे बेदाणा उत्पादक धास्तावला

आदल्यादिवशी पसंत, दुसऱ्यादिवशी नाही

पंढरपुरात दर मंगळवारी आणि शनिवारी दुपारी एकच्या सुमारास बेदाण्याचे सौदे होतात. त्यावेळी शेतकऱ्यांकडील बेदाण्याच्या नमुन्याची पाहणी केली जाते आणि दरही ठरतो. त्यासाठी बेदाण्याचे दोन- चार बॉक्स काढून, फाडून त्यातील बेदाणा हातात घेऊन व्यापारी पडताळतो.

पण दुसऱ्यादिवशी जेव्हा प्रत्यक्षात माल नेण्याची वेळ येते. तेव्हा मात्र माल पासिंगच्या नावाखाली ऐनवेळी बेदाणा नाकारला जातो. त्यासाठी काहीही कारणे दिली जातात. नेट मशिनद्वारे अगदी स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण बेदाणा शेतकरी बाजारात आणतो.

आदल्यादिवशी तो माल व्यापाऱ्याला पसंतही पडतो, मग दुसऱ्यादिवशी लगेच तो नापसंत का होतो, माल नकोच होता, तर आधी सौद्यात का स्वीकारला, हा प्रश्न आहे.

बेदाणा तयार होण्याच्या प्रक्रियेवेळी कडक ऊन असल्यास बेदाण्याला साखर फुटते. परिणामी गुणवत्तेवर परिणाम होतो. अर्थात यात कोणाचीही चूक नाही. हा तांत्रिक विषय आहे. आम्हाला आडत नकोय का, आम्ही का नाकारू. याचाही विचार व्हावा.

- आनंद शेटे, आडत व्यापारी, पंढरपूर.

सध्या हंगाम सुरु आहे. त्यामुळे आवक जास्त आहे. एखादा- दुसऱ्या ठिकाणी हा प्रकार घडला असेलही. पण आपण त्याची पडताळणी करू. योग्य तो निर्णय घेऊ.

- कुमार घोडके, सचिव, पंढरपूर बाजार समिती, पंढरपूर

माझे बेदाण्याचे ७२ बॉक्स होते. लिलावादिवशी नमुन्यासाठी एक बॉक्स घेऊन गेलो. खरेदीदार व्यापाऱ्याला माल पसंत पडला. १६० रुपये किलोने सौदाही झाला. पण दुसऱ्यादिवशी ऐनवेळी माल नाकारला.

- शिवाजी सिरसट, बेदाणा उत्पादक, पडसाळी, ता. उत्तर सोलापूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com