
जळगाव ः जिल्ह्यात तुरीची मळणी (Tur Harvesting) बऱ्यापैकी पूर्ण झाली आहे. उशिरा लागवडीच्या तूर (Tur Cultivation) पिकात मळणी किंवा कापणी सुरू आहे. एकरी दीड ते सहा क्विंटल, असे उत्पादन (Tur Production) तूर पिकात आल्याची स्थिती आहे.
सध्या तुरीचे दर टिकून आहेत. कमाल दर काही बाजार समित्यांत सात हजार रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. तूर आवकही कमी आहे. खानदेशात तुरीची लागवड कमी असते. मुख्य पीक म्हणून फक्त मुक्ताईनगर, बोदवड, रावेर तालुक्यात काही शेतकरी तूर लागवड करतात.
सुमारे अडीच हजार हेक्टरवर खानदेशात तूर पीक होते. कमाल शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबापुरती गरज पूर्ण करण्यासाठी कापूस पिकात आंतरपीक म्हणून तूर लागवड केली होती.
तुरीची रावेर, मुक्ताईनगर भागात काही शेतकऱ्यांनी जूनच्या सुरुवातीलाच ठिबक सिंचन व गादीवाफा तंत्रज्ञानाचा उपयोग करूनही लागवड केली होती.
वेळेत लागवड केलेल्या तूर पिकातून उत्पादन हाती आले आहे. तसेच जुलैच्या मध्यात लागवड केलेल्या तूर पिकातही मळणी काही शेतकऱ्यांनी केली आहे.
कोरडवाहू क्षेत्रात तूर उत्पादन कमी आहे. कोरडवाहू क्षेत्रात एकरी एक, सव्वा, दीड ते दोन क्विंटल असे उत्पादन येत आहे. तर बागायती क्षेत्रात किंवा सिंचनाची सुविधा असलेल्या क्षेत्रातून तुरीचे एकरी सहा, सात, आठ ते नऊ क्विंटल उत्पादन हाती आले आहे.
यात सरासरी स्थिती लक्षात घेतल्यास एकरी दीड ते सहा क्विंटल व सरासरी साडेचार क्विंटल तुरीचे उत्पादन हाती आले आहे. मुक्ताईनगर तालुक्यात काही शेतकऱ्यांनी एकरी नऊ क्विंटल उत्पादन साध्य केले आहे.
मळणीचा खर्च अधिक...
मळणीचा खर्च २०० रुपये क्विंटलपेक्षा अधिक आहे. बागायती क्षेत्रात तूर उत्पादनासाठी एकरी १२ ते १५ हजार रुपये खर्च आला आहे. कोरडवाहू क्षेत्रातील खर्च कमी आहे. पण दर टिकून असल्याने तूर पीक तूर्त परवडणारे ठरत आहे.
उत्पादन मात्र कमी आले आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना तूर पीक फारसे परवडलेले दिसत नसल्याची स्थिती आहे. मध्यंतरी तूर पिकात मर रोगही दिसत होता. यात झाडे पूर्णतः नष्ट झाली. तसेच किडींमुळे फवारणीचा खर्चही अधिक लागला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.