
Tur Bazar Bhav : तुरीचे भाव कमी करण्यासाठी सरकारचे सर्व प्रयत्न अपयशी ठरत आहेत. सरकारने व्यापारी, स्टाॅकीस्ट, प्रक्रियादार आणि आयातदारांवर तुरीचे भाव कमी करण्यासाठी मोठा दबाव आणला. पण तुरीच्या दारतील तेजी वाढत आहे. त्यामुळं सरकारनं आता एक निर्णय घेऊन आयातदारांनी तूर बाजारात आणावी यासाठी दबाव आणला. सरकारने आयातदारांना ३० दिवसांपेक्षा अधिकचा स्टाॅक बाजारात आणण्याचे आदेश दिले आहेत. पण याचा बाजारावर विशेष परिणाम होणार नाही, असे आयातदार सांगत आहेत. सध्या तुरीला ८ हजार ५०० ते ९ हजार ८०० रुपयांचा भाव मिळत आहे. तूर १० हजारांचाही टप्पा गाठू शकते, असा अंदाज तूर बाजारतील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
दरकारच्या दबावानंतरही तुरीतील तेजी कायम आहे. सरकारच्या दबावाला झुगारून तूर अनेक बाजारांमध्ये १० हजार रुपयांच्या दरम्यान पोचली. तुरीच्या दरातील तेजी कमी होत नसल्याने सरकारची मात्र चांगलीच कोंडी झाली. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सरकार डाळींचे भाव दबावात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या तुरीच्या डाळीचे भाव अनेक बाजारांमध्ये १३० ते १४० रुपयांच्या दरम्यान आहेत. तूर डाळ १३० रुपयांच्या आतच ठेवण्याचा सरकारचे उद्दीष्ट होते. पण तूर डाळ यापेक्षा महाग झाल्याने सरकारचीही कोंडी होत असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
सरकारने तुरीचे भाव करण्यासाठी व्यापारी, स्टाॅकीस्ट, प्रक्रियादार आणि आयातदरांकडून स्टाॅकची माहिती मागितली. याचा बाजारावर काही परिणाम झाला नाही. कारण देशात स्टाॅकच कमी आहे. त्यामुळे सरकारने आयातदारांवर दबाव वाढवत ३० दिवसांपेक्षा अधिकचा स्टाॅक बाजारात विकण्याचे आदेश दिले आहेत. पण आयातदारांकडे स्टाॅक कमीच आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचा बाजारावर काही परिणाम होणार नाही, असेही आयातदारांनी सांगितले.
तमिळनाडू सरकारने तूर डाळ खरेदीसाठी टेंडर काढले. यामुळे तुरीच्या दरात आणखी सुधारणा झाली. आफ्रिकेतून आयात होणाऱ्या तुरीच्या दरात तमिळनाडू सरकारच्या या निर्णयामुळे सर्वाधिक वाढ झाली. सध्या म्यानमार आणि देशात तुरीचा स्टाॅक खूपच कमी आहे. देशातील नवी तूर येण्यास किमान ७ महिन्यांचा कालावधी लागेल. तर आफ्रिकेतील तूर आयात होण्यास ऑक्टोबर उजाडू शकतो. तोपर्यंत सरकारला तूर डाळीचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल.
सध्या देशातील बाजारात तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ५०० ते ९ हजार ८०० रुपयांचा सरसरी भाव मिळत आहे. दरात पुढील काळात आणखी सुधारणा होऊ शकते. कारण देशातील मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत आहे. तर किमान ५ ते ७ महिने तुरीचा पुरवठा वाढणार नाही. परिणामी तुरीचे दर १० हजारांचाही टप्पा गाठू शकतात. पण पुढील काळात तुरीचे दर माॅन्सून आणि सरकारच्या धोरणावरही बऱ्यापैकी अवलंबून असतील, असे जाणकारांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.