Onion Rate : दहा पिशव्या कांद्यापोटी शेतकऱ्यास दोन रुपये

कांद्याच्या दरातील घसरणीने आधीच शेतकरी घायकुतीला आलेला असताना सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बार्शी तालुक्यातील एका शेतकऱ्याला दहा पिशव्यांच्या कांदा विक्रीपोटी ५०० रुपये मिळाले.
Onion Rate
Onion RateAgrowon

Onion Market Update सोलापूर ः कांद्याच्या दरातील (Onion Rate) घसरणीने आधीच शेतकरी घायकुतीला आलेला असताना सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Solapur APMC) बार्शी तालुक्यातील एका शेतकऱ्याला दहा पिशव्यांच्या कांदा विक्रीपोटी ५०० रुपये मिळाले.

पण त्यातून हमाली, तोलाई, मोटारभाडे असा खर्च वजा जाता अवघे दोन रुपये उरले आणि त्यावर कडी म्हणजे या दोन रुपयांच्या पट्टीपोटी व्यापाऱ्याने शेतकऱ्याला चक्क अवघ्या दोन रुपयांचा चेक देत थट्टा केल्याचा प्रकार घडला आहे.

सोलापूर बाजार समितीत कांद्याची रोज तब्बल ७०० ते ८०० गाड्यांपर्यंत आवक आहे. स्थानिक भागासह शेजारील उस्मानाबाद, नगर, पुणे, सांगली, सातारा या भागांतूनही कांद्याची आवक होत आहे.

गेल्या महिन्यात १५०० ते १८०० रुपयांवर असणारा कांद्याचा दर आता मात्र २०० ते ५०० रुपयांवर खाली आला आहे. त्यामुळे शेतकरी हताश आहेत.

पण किमान खर्च तरी निघेल, या आशेपोटी शेतकरी कांदा घेऊन येत आहेत. एकीकडे ही परिस्थिती असताना, आता व्यापाऱ्यांकडूनही शेतकऱ्यांची थट्टा होत असल्याचा प्रकार घडला आहे.

Onion Rate
Onion Rate : कांदा बाजाराचे अंदाज का चुकले?

बार्शी तालुक्यातील शेतकरी राजेंद्र चव्हाण यांनी १७ फेब्रुवारीला सोलापूर बाजार समितीत सूर्या ट्रेडिंग या अडत व्यापाऱ्याकडे दहा पिशव्या कांदा विक्रीस आणला. त्यांच्या कांद्याचे वजन ५१२ किलो भरले.

त्यात प्रतिकिलो अवघा एक रुपया इतका दर त्यांना मिळाला. त्यानुसार ५१२ रुपयांची पट्टी त्यांना मिळाली. पण त्यातून पुन्हा हमाली, तोलाई, मोटारभाडे आदी ५०९.५१ पैसे खर्च वजा जाता २ रुपये ४९ पैसे शिल्लक उरले.

इथे हा व्यवहार झाला, पण पुढे शेतकऱ्याची चक्क थट्टा करण्यात आली. संबंधित व्यापाऱ्याने उरलेले दोन रुपये देण्यासाठी थेट चेक हातावर टेकवला. शिवाय तोही तब्बल १५ दिवसांनी वटेल, अशा पद्धतीची तारीख टाकून दिली.

या प्रकारामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांप्रती व्यापाऱ्यांची असलेली असंवेदनशीलता दिसून आली. आता या प्रकाराचा सर्वच स्तरांतून निषेध तर व्यक्त होत आहेच, पण संतापही व्यक्त होत आहे.

Onion Rate
Onion Rate : उत्पादकांच्या हितार्थही दाखवा तत्परता

‘राज्यकर्त्यांनो जरा लाज बाळगा’

दोन दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचला, तेव्हा त्यांनी स्वतः ही पावती आणि चेक सोशल मीडियावर प्रसारित करत, त्यावर ‘‘राज्यकर्त्यांनो जरा तरी लाज बाळगा, शेतकऱ्यांनी जगायचे कसे, हे आता तुम्हीच सांगा, एका बाजूला शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडता, त्याचे पीक त्याच्या डोळ्यासमोर करपून जाते आणि पुन्हा शेतकऱ्याच्या मालाला असा भाव देत, दोन रुपयांचा चेक देत, त्यांची थट्टा करता, आपल्याला लाज वाटते की नाही,’’ अशा शब्दांत संदेश लिहीत संताप व्यक्त केला.

बाजार समितीचे दुर्लक्ष

वास्तविक, बाजार समितीत शेतीमाल विक्रीस आणणाऱ्या शेतकऱ्यांना कोणत्याही शेतीमालाचे पैसे हे रोखीने मिळणे अपेक्षित आहे. तसा नियम आहे. पण सोलापूर बाजार समितीत सर्रास व्यापारी शेतकऱ्यांना पंधरा ते वीस दिवसांच्या पुढच्या तारखा देऊन चेक देत आहेत.

यात अनेक व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे. तसेच दोन ते तीन वर्षांपासूनच्या पट्ट्या व्यापाऱ्यांकडे थकल्याच्या घटनाही घडल्या आहेत. पण बाजार समिती या व्यवहाराकडे लक्ष द्यायला तयार नाही.

व्यापाऱ्याकडे दोन रुपयेही नाहीत

कांद्यासह भाजीपाल्यामध्ये कोट्यावधीची उलाढाल करणारे बाजार समितीतील आडत व्यापारी बाजार समितीत आहेत. रोज सहजासहजी पाचशे-हजार रुपयांचा खर्च ते करतात. पण ज्या व्यापाऱ्याने दोन रुपयांचा हा चेक दिला. त्याच्याकडे पट्टीपोटी शेतकऱ्याला देण्यासाठी दोन रुपये नसावेत, असा प्रश्‍न आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com