संपत्ती आणि संपत्ती निर्माणकर्ते

काही दिवसांपूर्वी शेअर मार्केटवरील ‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले, त्यांना श्रद्धांजली. त्यांच्या निधनानंतर काही दिवस गेल्यानंतर झुनझुनवाला वित्त भांडवलाच्या ज्या तत्त्वज्ञानाचे प्रतिनिधी होते त्याची चिरफाड करण्याची गरज आहे.
Wealth Creators
Wealth CreatorsAgrowon

काही दिवसांपूर्वी शेअर मार्केटवरील ‘बिग बुल’ (Share Market Big Bull) राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचे निधन झाले, त्यांना श्रद्धांजली. त्यांच्या निधनानंतर काही दिवस गेल्यानंतर झुनझुनवाला वित्त भांडवलाच्या ज्या तत्त्वज्ञानाचे प्रतिनिधी होते त्याची चिरफाड करण्याची गरज आहे. शेअर मार्केटवरील सट्टेबाज गुंतवणूकदार (Investors In Share Market), कंपन्यांचे प्रवर्तक स्वतःला ‘संपत्ती निर्माणकर्ते (wealth creators)’ म्हणवतात. स्वतःसाठी कोणी व्यक्ती संपत्ती निर्माण करत असेल तर आमचे काही म्हणणे नाही; पण आम्ही देशासाठी संपत्ती निर्माण करतो, असा कोणाचा दावा असेल तर देशाची संपत्ती म्हणजे नक्की काय आणि ती संपत्ती निर्माण करणारे नक्की कोणकोण, यावर चर्चा व्हावयास हवी.

एखाद्या कंपनीचे ‘मार्केट कॅपिटलायझेशन’ गतवर्षी १ लाख कोटी रुपये असेल आणि त्याचे भाव वाढल्यामुळे एका वर्षानंतर मार्केट कॅपिटलायझेशन २ लाख कोटी रुपये झाले तर त्या कंपनीने (देशासाठी) १ लाख कोटी रुपयांची संपत्ती निर्माण केली असे म्हटले जाते. खरे तर संपत्तीतील ही वाढ फक्त इक्विटी शेअर्समधील गुंतवणूकदारांसाठी असते; पण अल्पसंख्य इक्विटी गुंतवणूकदार स्वतःला संपूर्ण भारतीय नागरिकांचे प्रतिनिधी मानतात आणि शेअरमार्केट म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचे प्रतिबिंब! असो. आम्ही संपत्ती निर्माणाच्या विरोधात नाही; पण मग संपत्ती म्हणजे काय? आणि ती निर्माण करणारे कोण, यावर होऊन जाऊ देत चर्चा.

Wealth Creators
China Drought : दुष्काळामुळे चीनमध्ये धान्य उत्पादन घटणार

देशाची संपत्ती म्हणजे काय? संपत्तीची व्याख्या देशाच्या स्टॉक मार्केटमधील मार्केट कपिटलायझेशनपुरती सीमित आहे का? देशात आरोग्यदायी जीवन जगणारे स्त्री पुरुष, सुदृढ बालके, रसरसलेले, अगणित क्षेत्रात आव्हाने घेण्यासाठी मुसमुसलेले तरुण-तरुणी ही देशाची संपत्ती नाही? पुढच्या पिढ्यांना उपभोगासाठी अधिक समृद्ध करून दिलेली नैसर्गिक साधनसामग्री देशाची संपत्ती नाही?

Wealth Creators
Cotton Production : अमेरिकेतील कापूस उत्पादन ४० टक्क्यांनी घटणार?

चला ,चर्चेसाठी अर्थव्यवस्थेपुरती आपली चर्चा मर्यादित करूया; पण मग देशाच्या अर्थव्यवस्थेच्या जवळपास ५० टक्के जीडीपी निर्माण करणारे छोटे (एमएसएमई) उद्योग जे निर्माण करतात ती संपत्ती नाही काय? आणि कोट्यवधी शेतकरी? आपल्या तुटपुंज्या साधनसामग्रीने जे काही तयार करू पाहतात त्यांना त्यापेक्षा जास्त संपत्ती तयार करावीशी वाटत नाही? आणि संपत्ती तयार करण्याची मनीषा उरी बाळगणारे, त्यासाठी विविध गोष्टी शिकावयास तयार असणारे, दिवसाचे बारा तास राबण्याची तयारी असलेले कोट्यवधी तरुण, कष्टकरी बायका यांचे काय? संपत्ती निर्माण करण्यास मानवी श्रमाची उत्पादकता वाढवावी लागते. त्याचा संबंध शिक्षण, आरोग्य यांच्याशी आहे, पायाभूत सुविधांच्या व भांडवलाच्या उपलब्धतेशी आहे; ते काय प्रत्येक नागरिकाने स्वतःचे स्वतः तयार करायचे असते? मग शासनाचा नक्की रोल काय?

दुर्दैव हे आहे, की शासनामागून शासन कोट्यवधी सामान्य नागरिकांना देशाच्या संपत्ती निर्माणात सामीलच करून घेत नाहीये आणि सारी नजर त्या मूठभर कॉर्पोरेट्सकडे लावून बसत आहेत. खरे तर संपत्ती निर्माणाचा पाया जेवढा व्यापक असतो त्या प्रमाणात सामान्य नागरिकांच्या क्रयशक्तीचा पाया देखील व्यापक बनतो आणि त्या प्रमाणात देशांतर्गत बाजारपेठ. ‘संकुचित, अप्पलपोटी’ कॉर्पोरेट क्षेत्राला या गोष्टी परस्परावलंबी आहेत, हे कळून घ्यायचे नाहीये; पण आमचे ‘मायबाप सरकार’ पण संपत्ती व संपत्ती निर्माणकर्त्यांची व्याख्या व्यापक करीत नाही हे दुर्दैव आहे.

प्रादेशिक भाषा

म ला ज्येष्ठ पत्रकार रवीशकुमार खूप ग्रेट वाटतात. त्यांची मेहनत, धैर्य, चिकाटी, सामान्य नागरिकांप्रती तगमग ही कारणे तर झालीच; पण मला अपील झालेली त्यांची गोष्ट म्हणजे त्यांनी काम करण्यासाठी निवडलेली भाषा- हिंदी. जी भारतातील कोट्यवधी नागरिकांची भाषा आहे. मागे एका मुलाखतीत रवीशकुमार म्हणाले होते, की त्यांच्याबरोबर कॉलेजमध्ये असणऱ्यानी हार्वर्डमध्ये जाऊन पीएच.डी. केली आहे; पण सामान्य लोकांना पचेल अशी एक साधी पोस्ट ते लिहीत नाहीत!

सामाजिक, राजकीय अर्थव्यवस्थेविषयक जनजागृती करायची आहे त्यांना प्रादेशिक भाषांमध्ये काम करण्याशिवाय पर्याय नाही. हिंदुत्ववाद्यांचे किती साहित्य इंग्रजीमध्ये आहे आणि किती प्रादेशिक भाषेत? माहिती काढून तुलना केल्यास कळेल त्यांची ताकद कशात आहे ते. सामाजिक, राजकीय, आर्थिक विषयांवर जनकेंद्री परिप्रेक्ष्यातून मूलभूत आणि पोटतिडिकीने इंग्रजी भाषेत काम करणारे आपल्या देशात खूप जण आहेत. परंतु आपल्याला आवडो नावडो त्यांची परिणामकारकता क्षीण राहिली आहे. चांगली गोष्ट म्हणजे भारतात इंग्रजी भाषेत जनकेंद्री परिप्रेक्ष्यातून वैचारिक काम करणाऱ्या प्रत्येकाला किमान एक प्रादेशिक भाषा येत आहे. त्यांनी ठरवून आपापल्या प्रादेशिक भाषेत काम करायचे ठरवले आणि मुख्य म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचे ठरवले तर ‘वज्रासारखा कठीण वाटणारा बर्फ'' वितळू लागेल.

(लेखक प्रख्यात अर्थविश्लेषक असून, टाटा समाजविज्ञान संस्थेत अध्यापन करतात.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com