Cotton Rate : कापूस दर कधी वाढतील?

देशातील कापूस बाजारात आजही नरमाई दिसली. अनेक बाजारांमध्ये कापूस दर क्विंटलमागं १०० रुपयाने कमी झाले होते. तर आंतरराष्ट्रीय बाजारात आज काहीशी सुधारणा पाहायला मिळाली.
Cotton
CottonAgrowon

पुणेः देशातील कापूस बाजारात (Cotton Market) आजही नरमाई दिसली. अनेक बाजारांमध्ये कापूस दर (Cotton Rate) क्विंटलमागं १०० रुपयाने कमी झाले होते. तर आंतरराष्ट्रीय बाजारात आज काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. कापसाच्या दरात पुढील दीड महिना चढउतार येऊ शकतात. मात्र जानेवारीनंतर दरात वाढ होण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

Cotton
Cotton Rate : कापूस दर नरमले

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर तुटल्यानंतर त्याचा परिणाम देशातील बाजारदरावरही होत आहे. कापसाचा मोठा ग्राहक असलेल्या चीनमध्ये पुन्हा कोरानाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळं येथील सरकार लगेच पूर्ण निर्बंध उठवण्याची शक्यता कमी आहे. म्हणजेच चीनचे मार्केट पूर्णपणे लगेच खुले होण्याची शक्यता धुसर झाली. त्यामुळं चीनकडून कापसाला लगेच मागणी वाढण्याचा अंदाज नाही. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर दिसत असल्याचे जाणकारांचं म्हणणं आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दराने आज नोव्हेंबरमधील सर्वात निचांकी पातळी गाठत ७९.७१ सेंट प्रतिपाउंडचा टप्पा गाठला होता. मात्र त्यानंतर कापूस दरात सुधारणा होत गेली. दुपारी ३ वाजेपर्यंत कापसाचे व्यवहार ८०.८८ सेंट प्रतिपाऊंडने झाले. यंदा अमेरिकेत कापूस उत्पादन घटलं. तसंच इतरही देशांमधील उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. मात्र मागणीच्या बाजुने उठाव कमी जास्त होत असल्याचा परिणाम सध्या कापूस दरावर होताना दिसत आहे.

Cotton
Cotton Rate : कापूस दर आणखी वाढणार का?

आज आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वाढले तरी देशातील काही बाजारांमध्ये आजही कापसाचे दर काहीसे नरमले होते. आज कापसाला सरासरी ८ हजार ३०० ते ८ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. मात्र दुसरीकडे कापसाचे दर कमी झाल्यानंतर बाजारातील आवकही कमी झाली आहे. शेतकरी या नरमलेल्या दरात कापूस विकण्यास इच्छूक दिसत नाहीत.

बाजारातील आजची आवक

देशातील बाजारात आज जवळपास सव्वालाख गाठी कापसाची आवक झाल्याचा अंदाज व्यापारी सुत्रांनी वर्तविला आहे. उत्तर भारतातील पंजाब, हरियाना आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये आज जवळपास १८ ते २० लाख गाठी कापसाची आवक झाली. तर गुजरातमधील आवक ही ४५ हजार गाठींवर स्थिरावली. मध्य प्रदेशात ९ हजार तर महाराष्ट्रात १८ हजार कापूस गाठींची आज बाजारात आवक झाली होती. तसेच कर्नाटकात १० हजार तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणात १५ हजार गाठी कापूस आज बाजारात आला होता, अशी माहिती व्यापारी संस्थांनी दिली.

महिनाभरातील स्थिती

जाणकारांच्या मते, पुढील महिनाभर कापसाच्या दरात चढ-उतार होण्याचा अंदाज आहे. शेतकरी आहे त्या दरात कापूस विक्री करण्याची वाट उद्योग पाहत आहेत. तर शेतकरी दरवाढीची अपेक्षा बाळगून आहेत. त्यामुळे पुढील महिना दीड महिना कापूस दर शेतकरी बाजारात किती कापूस आणतात यावर अवलंबून असल्याचे जाणकार सांगतात.

दरात सुधारणा अपेक्षित

पण जानेवारी महिन्यापासून कापूस दर पुन्हा पूर्वपातळीवर येऊ शकतात, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांना सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने कापूस विक्री करणं गरजेचं आहे, असं आवाहन कापूस बाजारातील अभ्यासकांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com