भारतीय चहाच्या मागणीत घट का झाली ?

भारताच्या चहामध्ये मर्यादेच्या पलीकडे कीटकनाशक आणि रसायनं सापडत असल्याने जागतिक बाजारातून भारतीय चहा नाकारला जात असल्याने व्यापारामध्ये घसरण होत आहे.
भारतीय चहाच्या मागणीत घट का झाली ?
India Tea DemandsAgrowon

सध्या चहाच्या (Tea) इंटरनॅशनल मार्केट मध्ये श्रीलंकेची (Srilanka) बिकट अवस्था झालीय. या मार्केटचा फायदा उचलण्याचा प्रयत्न भारतीय व्यापारी करताना दिसतायत. त्यात निर्यात (Export) वाढावी म्हणून भारतीय चहा संघटना ही प्रयत्न करताना दिसते. मात्र भारताच्या चहामध्ये मर्यादेच्या पलीकडे कीटकनाशक आणि रसायनं सापडत असल्याने जागतिक बाजारातून भारतीय चहा नाकारला जात असल्याने व्यापारामध्ये घसरण होत आहे. अनेक देश चहा आयात करताना कठोर नियमांची अंमलबजावणी करतात. हे नियम युरोपीयन संघाने घालून दिलेत. आणि ते एफएसएसएआय नियमांपेक्षा ही कठोर आहेत. (India Tea Demands)

कोणतीही कंपनी बाजारातून कीटकनाशक आणून चहामध्ये मिसळत नाही. त्यात त्यांचा काही फायदाही नसतो. ही कीटकनाशके पिकांवर फवारलेली असतात. हवामान बदलामुळे चहाच्या पानांवर किडींचा हल्ला वाढलाय. या कीटकांपासून संरक्षण मिळविण्यासाठी चहाच्या बागांमध्ये कीटकनाशकांचा वापर वाढलाय. या कीटकनाशकांचा पानांवर काही प्रमाणात अंश राहतो. कीटकनाशक फवारल्यानंतर साधारणतः 10 ते 20 दिवसांनी पानं तोडली जातात. चहाच्या झाडांवर मारलेली कीटकनाशके चहाच्या पावडरमध्ये उतरतात आणि तीच चहाच्या पावडरमध्ये सापडतात. आज बाजारात मिळणारी कोणतीही खाद्यवस्तू, भाजी किंवा फळ यापैकी काहीही प्रयोगशाळेत नेऊन तपासलं तर त्यात अशा कीटकनाशकांचा आणि रसायनांचा अंश सापडेलच. आता यात दोष द्यायचा कोणाला तर, रासायनिक खत, कीटकनाशक वापरून केलेल्या आधुनिक शेतीला.

आता चहामध्ये कीटकनाशक आणि रसायनं सापडल्यामुळे मागणीत घट झालीय. त्यामुळे देशांतर्गत बाजारात ही चहाचे दर घटलेत. चहाच्या पानात कीटकनाशके आणि रसायनांचे प्रमाण जास्त असल्यानं खरेदीदारांनी ते घेण्यास नकार दिलाय. आता चहाचे दर किलोमागे ३० ते ४० रुपयांनी घसरले आहेत. गेल्या एका महिन्यात चहाच्या किमतीत 27 रुपयांची घट झाली असून किंमत प्रतिकिलो 214 वरून 187.06 प्रतिकिलोवर आली आहे.

यामुळे दुसऱ्या हंगामात चहाच्या किमती घटण्याची भीती चहा उत्पादकांना आहे.
देशात विकला जाणारा सर्व प्रकारचा चहा भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणच्या (FSSAI) मानदंडांचं पालन करत असल्याचा दावा केला जातोय. मात्र ‘बिझनेस लाइनने’ दिलेल्या बातमीनुसार, कोलकाता लिलावात खरेदीदारांनी सुमारे 39 हजार किलो चहा परत पाठवलाय. मागच्या वर्षी 226.77 रुपये किलो दराने चहा विकला गेला होता, मात्र यंदा त्याचा सरासरी भाव 186.41 रुपये किलो आहे.

चहामध्ये कीटकनाशक सापडू नयेत यावर कोणता उपाय असू शकतो का? तर सेंद्रीय शेती हा यावरचा एक इलाज असू शकतो. यात वापरण्यात येणाऱ्या खतांचे दुष्परिणाम शरीरावर होत नाहीत, असं म्हणतात. जगात सेंद्रीय शेती करण्याचं प्रमाण वाढतय. भारतात फक्त सिक्कीममध्ये संपूर्णपणे सेंद्रीय शेती केली जाते. परंतु चहासारख्या व्यावसायिक पिकाच्या बाबतीत संपूर्ण सेंद्रीय शेती करणं शक्य आहे का, हा खरा प्रश्न आहे. सेंद्रीय शेतीमध्ये उत्पादन घटतं, मग ते नुकसान कसं भरून काढणार? कारण सेंद्रीय चहा आहे म्हणून त्याला वाढीव दर मिळण्याची काही गॅरंटी नाही. यावर दुसरा उपाय म्हणजे रेसिड्यू फ्री शेती करणं. म्हणजे चहाचं पीक घेताना खतं, रसायनं एकदम मापात वापरायची. जेवढी गरज आहे तेवढंच प्रमाण ठेवायचं. त्यामुळे खतं-रसायनांचे अंश चहाच्या पानांत सापडणार नाहीत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com