Green Gram : देशात मुगाचा पेरा का वाढतोय?

मूग हे मुळचं भारतीय पीक मानलं जातं. मुगाची लागवड मुख्यतः आशियातच होत होती. मात्र नंतरच्या काळात आफ्रिका आणि अमेरिकेतही मुगाचा विस्तार होत गेला.
Green Gram
Green GramAgrowon

पुणेः देशातील खरिपाचा पेरा (Kharif Sowing India) आता अंतिम टप्प्यात आलाय. ५ ऑगस्टपर्यंत झालेल्या पेरणीत कडधान्याची लागवड (Pulses Cultivation) अडीच टक्क्यांनी घटली. तूर आणि उडदाचा पेरा (Green Gram Sowing) मोठ्या प्रमाणात घडला. मात्र मुगाची लागवड (Green Gram Cultivation) वाढली.

मूग हे मुळचं भारतीय पीक (Green Gram Indian Crop) मानलं जातं. मुगाची लागवड मुख्यतः आशियातच होत होती. मात्र नंतरच्या काळात आफ्रिका आणि अमेरिकेतही मुगाचा विस्तार होत गेला. जगात साधारणपणे ४० ते ४३ लाख टन मूग उत्पादन होतं. जागतिक मूग उत्पादनात भारताचा वाटा जवळपास ७० टक्के आहे. भारतात खरिपात राजस्थानमध्ये सर्वाधिक लागवड होते. तर त्यानंतर कर्नाटक आणि महाराष्ट्राचा नंबर लागतो. देशात मागील हंगामात मूग लागवड ३० लाख २३ हजार हेक्टरवर झाली होती. तर उत्पादन ३० लाख ६० हजार टन होतं.

देशात मुगाची लागवड माॅन्सून दाखल झाल्यानंतर जून आणि जुलै महिन्यात होते. तर सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये मूग काढणीला येतो. मात्र मागील काही वर्षांत ऐन काढणीच्या काळात पावसाचं प्रमाण वाढलंय. त्यामुळं पीक हाती येतंय असं वाटत असताना मोठं नुकसान होतंय. त्यामुळं महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात या राज्यांमध्ये मुगाचं लागवड क्षेत्र घटलं. यापैकी काही राज्यांतील शेतकऱ्यांनी मागील पाच वर्षांपासून सोयाबीनला पसंती दिल्याचं दिसतंय. महाराष्ट्रातही मागील काही वर्षांपासून काढणीला आलेला मूग हातचा जातोय. पावसामुळं शेंगा भिजतात, कोंब येतात त्यामुळं हाती काहीच लागत नाही.

देशात खरिपातील कडधान्य लागवड यंदा घटली. ५ ऑगस्टपर्यंत कडधान्याखालील क्षेत्र अडीच टक्क्यांनी कमी झालं. यात तूर १०.४२ टक्के आणि उडीद ६ टक्क्यांनी घटला. मात्र दुसरीकडे मुगाची लागवड अडीच टक्क्यांनी वाढली. मागील वर्षी ५ ऑगस्टपर्यंत ३० लाख २३ हजार हेक्टरवर मुगाची लागवड होती. मात्र यंदा ३० लाख ९९ हजार हेक्टरपर्यंत पोचली.

Green Gram
मूग आणि उडदाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली

देशात यंदा राजस्थानमध्ये मुगाची लागवड २ लाख २४ हजार हेक्टरने वाढली. मागील वर्षी राजस्थानमध्ये १८ लाख हेक्टरवर मूग होता. मात्र महाराष्ट्रात मुगाचं क्षेत्र जवळपास एक लाख हेक्टरने घटलं. मागील वर्षी महाराष्ट्रात ३ लाख ६२ हजार हेक्टरवर मूग होता. आंध्र प्रदेशात एक हजार हेक्टरने आणि तेलंगणात २७ हजार हेक्टरने मुगाची लागवड कमी झाली. मात्र कर्नाटकात लागवड ४ हजार हेक्टरने वाढली.

Green Gram
मूग, उडदाची लागवड का घटतेय?

खरिपात इतर पिकांची लागवड कमी झाल्यानंतरही मुगाला मात्र शेतकऱ्यांनी पसंती दिल्याचं दिसतं. याचं महत्वाचं कारण म्हणजे मुगाच्या हमीभावात सरकारने केलेली मोठी वाढ. खरिपातील कडधान्याच्या हमीभावाचा विचार करता मुगाला जास्त हमीभाव मिळाला. २०१५-१६ मध्ये मुगाचा हमीभाव तूर आणि उडदाच्या हमीभावापेक्षा २२५ रुपयांनी अधिक होता. मात्र २०२२-२३ मध्ये तूर आणि उडदाच्या तुलनेत मुगाचे हमीभाव तब्बल ११५५ रुपयांनी जास्त आहेत. यंदा मुगासाठी ७ हजार ७५५ रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला.

देशात दरवर्षी कमी अधिक प्रमाणात मुगाची आयात होत राहते. भारतात प्रामुख्याने म्यानमार, टांझानिया आणि केनियातून मूग येतो. मागील वर्षात सर्वाधिक म्हणजेच १ लाख ६१ हजार टन मूग आयात झाली होती. तर त्याआधीच्या वर्षातील आयात ८२ हजार टन होती. मात्र यंदा सरकारने यंदा मुगाच्या आयातीवर निर्बंध घातलेले आहेत. त्यामुळं सध्यातरी यंदा कमी मूग आयात होईल असं वाटतंय. या सर्व कारणांमुळं देशात यंदा मुगाचा पेरा वाढलेला दिसतोय, असं जाणकारांनी सांगितलं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com