सुपर लक्झरी गाड्यांची तामिळनाडूत एवढी क्रेझ का?

आज तर या लक्झरी कार्सने एवढा स्पीड घेतलाय की भारतातल्या तामिळनाडू राज्यात 1 कोटींपेक्षा जास्त किंमत असलेल्या सुपर लक्झरी कारसाठी सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे.
Luxury Cars
Luxury CarsAgrowon

आजचा विषय आहे सुपर लक्झरी कार्सचा (Luxury Car). एका रिपोर्टनुसार म्हणे भारतात लक्झरी गाड्यांचा खप (Luxury car Sale In India) वाढलाय. त्यातल्या त्यात मुंबई, दिल्ली, बेंगलोर सारख्या मेट्रो सिटीजना मागे टाकत तामिळनाडू राज्य या गाड्यांच्या खपात आघाडीवर आहे. हे कसं काय घडलं हे बघण्यासाठी आपण जरा 90 च्या दशकात जाऊया. 90 च्या दशकात भारत जेव्हा खाऊजा अर्थात खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या टप्प्यात आला तसा भारतात आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सुळसुळाट वाढला.

दुचाकी, चारचाकी गाड्या असो, मोबाईल, कंप्यूटर, खाद्यपदार्थ, FMCG चे वेगवेगळे प्रॅाडक्ट असो, गरीबासाठी असो वा श्रीमंतांसाठी लागणाऱ्या गोष्टी असो, भारतात याची प्रचंड मोठी बाजारपेठ आ वासुन उभी राहिली. भारताचा स्पीड नव्या जगाशी मॅचअप करण्यासाठी गाड्याघोडे वाढले. नव्या कार कंपन्या भारतात आल्या. पण आपल्या भारतीयांची मानसिकता काय होती ? तर आपल्याला आखूड शिंगी, कमी चारा खाणारी, जास्त दूध देणारी, पांढऱ्या रंगाची, बहुगुणी गाय हवी असायची. तशीच चौकोनी कुटुंबासाठी छोटी, कमी तेल खाणारी, जास्त मायलेज देणारी बहुगुणी चारचाकी हवी असायची. पण एकविसाव्या शतकात इंटरनेट आणि मोबाईल लोकांच्या हातात आले, जास्तीचे चार पैसे हातात खुळखुळायला लागले. मग चौकोनी कुटुंबासाठी हव्या असणाऱ्या बहुगुणी गाडीची जागा स्पोर्टस आणि लक्जरी कार्सने घेतली.

आज तर या लक्झरी कार्सने एवढा स्पीड घेतलाय की भारतातल्या तामिळनाडू राज्यात 1 कोटींपेक्षा जास्त किंमत असलेल्या सुपर लक्झरी कारसाठी सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे. हे ऐकून साहजिकच कोणाचा ही विश्वास बसणार नाही. पण 1 कोटींच्या गाड्या विकत घेण्यात तामिळनाडू राज्य सुपर फास्ट सुटलंय. आणि याचा सर्व्हे केलाय प्रीमियम कार मर्सिडीज-बेंझ इंडियाने.

आता तामिळनाडूचे लोक म्हंटले की आपल्या डोळ्यासमोर येतात ते पारंपारिकपणे पुराणमतवादी लोक. हे तामिळी लोक मितभाषी असतात पण उत्तर किंवा पश्चिम भारतातल्या त्यांच्या सहकाऱ्यांप्रमाणेचं आपल्या संपत्तीचं प्रदर्शन करायला माग पुढं पाहत नाहीत. मर्सिडीज-बेंझ इंडिया म्हणते की, डॉक्टर, वकील, सिनियर आयटी व्यावसायिक, तरुण उद्योजक यांच्याकडून आमच्या गाड्यांना मोठी मागणी आहे. या गाड्यांमध्ये मर्सिडीज-मेबॅच, जीएलएस मेबॅच, जीटी 63 एएमजी, जी 63 एएमजी, जी 350 या गाड्यांना मोठी मागणी आहे. या गाड्यांची किंमत नाही म्हंटल तरी 1.7-3 कोटींच्या घरात आहे.

मर्सिडीज-बेंझच्या संबंध भारतातल्या 100 टक्के विक्रीच्या 90 टक्के विक्री एकट्या तामिळनाडूत होते. आणि इतर राज्यांच्या तुलनेत कैकपट जास्त दर आहे. या गाड्यांच्या विक्रीची आकडेवारी पाहता 2022 च्या पहिल्या तिमाहीत मर्सिडीजच्या एकूण लक्झरी कारमध्ये 26 टक्के वाढीच्या तुलनेत तमिळनाडूने 35 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. भारतीय वाहन उद्योगाचा भारताच्या जीडीपी मधला वाटा ७.१ टक्के असून भारतातल्या उत्पादन क्षेत्रातला वाटा जवळपास ४९ टक्के आहे.

आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडू शकतो की भारतात गाड्यांची एवढी क्रेझ का आहे? तर प्रगत देशांच्या तुलनेत आजही भारतातल्या मोठ्या शहरातली, मेट्रोमधील वाहतूक व्यवस्था सोडली तर देशभर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अजूनही पुरेशी सक्षम नाही. साहजिकच भारतीयांना वाहतुकीसाठी खाजगी वाहनांच्या वापराशिवाय पर्याय नाही. कालपर्यंत सायकलवर फिरणारा पेपरवाला, दूधवाला, इस्त्रीवाला, बांधकाम कामगार यासारखे असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगारही आता जुन्या का होईना पण टू व्हिलरवर फिरतात. ते चैन म्हणून नव्हे तर त्यांची गरज म्हणून फिरतात.

सर्वसामान्य नोकरदार, व्यावसायिक मध्यमवर्गीय माणूस टू व्हिलर वापरतो साधारण आठ ते दहा वर्षें. त्यानंतर गरज म्हणून, हायटेक व्हायचय म्हणून टू व्हीलर ऐवजी फोर व्हिलर वापरतात. साहजिकच लोक त्यांचा कम्फर्ट बघतात. म्हणजे टू व्हिलर नंतर 4 व्हिलर आणि मग हायटेक गाड्यांना पसंती मिळते. आता जसं वेगवेगळ्या सुपर लक्झरी कार्सच मार्केट वाढतंय अगदी त्याचप्रमाणे मध्यमवर्गातही छोट्या कारची विक्री वाढते आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com