Rice Export : केंद्र सरकार तांदूळ निर्यातबंदी करेल का?

भारत तांदूळ उत्पादनामध्ये (Rice Production) चीननंतर दुसरा महत्त्वाचा देश आहे. तर निर्यातीत (Rice Export) भारत अव्वल स्थान राखून आहे. जगातील एकूण तांदूळ निर्यातीत भारताचा वाटा तब्बल ४० टक्के आहे. भारतातून १५० देशांना तांदळाची निर्यात होते. २०२१-२२ मध्ये भारतातून २१० लाख टन तांदूळ निर्यात झाली. मात्र २०२२-२३ मध्ये २३० लाख टनांवर निर्यात पोहोचण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. परंतु दुसरीकडे सरकारकडील तांदळाचा साठा मात्र घटत आहे. गव्हाचे उत्पादन आणि सरकारी खरेदी कमी झाल्याने तांदळावरील भिस्त वाढली. त्यामुळे केंद्र सरकार तांदूळ निर्यातबंदी करेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. पण सरकार खरंच तांदूळ निर्यातबंदी करेल का? देशातील तांदळाची स्थिती काय आहे? याचा घेतलेला आढावा...
Rice Export
Rice ExportAgrowon

गरीब देशांची अन्नसुरक्षा (Food Security) अबाधित राखण्यात भात पिकाचा (Paddy Crop) मोठा वाटा आहे. परंतु भात हे जास्त मजूर आणि पाणी लागणारे पीक आहे. तसेच भात पिकाच्या वाढीसाठी उबदार आणि दमट हवामान आवश्यक असते. त्यामुळे भाताचे सर्वाधिक उत्पादन (Paddy Production) आशियायी देशात होते. उपलब्ध अन्नधान्याचा विचार करता तांदूळ उत्पादन (Rice Production) तिसऱ्या क्रमांकावर येतो. पहिला मका (Maize), दुसरा गहू (Wheat) आणि तिसरा तांदळाचा (Rice) क्रमांक लागतो.

२०२१-२२ मधील धान्य उत्पादन (दशलक्ष टन)

पीक…उत्पादन

मका…१२१५

गहू…७७९

तांदूळ…५१३

जगात तांदळाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः आशिया आणि आफ्रिका देशांमध्ये तांदळाचा वापर सर्वाधिक होतो. परिणामी, तांदळाची मागणी वाढत आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून तांदळाचे उत्पादन वर्षनिहाय वाढताना दिसते. २००८-०९ मध्ये जगात ४४८ दशलक्ष टन तांदूळ उत्पादन झाले होते. २०१८-१९ मध्ये हे उत्पादन ४९८ दशलक्ष टनांवर पोहोचले. या काळात अपवाद वगळता दरवर्षी उत्पादनात वाढ होत गेली. तर २०२०-२१ मध्ये ५०९ दशलक्ष टन आणि २०२१-२२ मध्ये ५१३ दशलक्ष टन तांदूळ उत्पादन झाले.

जगातील तांदूळ उत्पादन

२०१२-१३…४७१.९

२०१३-१४…४७८.४

२०१४-१५…४८०

२०१५-१६…४७२.९

२०१६-१७…४८६.९

२०१७-१८…४९५

२०१८-१९…४९७.८

२०१९-२०…४९८.८

२०२०-२१…५०९.२

२०२१-२२…५१३

२०२२-२३…५१५*

(*अंदाजित उत्पादन)

(स्रोत ः यूएसडीए)

Rice Export
Rice Export Ban: भारत तांदूळ निर्यातीवर बंदी घालणार ?

तांदूळ उत्पादनाचा विचार करता चीनचा पहिला क्रमांक लागतो. चीननंतर भारतात सर्वाधिक तांदूळ उत्पादन होते. विशेष म्हणजे जागतिक तांदूळ उत्पादनात चीन आणि भारत या दोनच देशांचा वाटा निम्म्यापेक्षा अधिक आहे. तर आशियातील देशांचा वाटा ८० टक्क्यांपेक्षा अधिक येतो. तांदूळ उत्पादनातील पहिल्या १० देशांमध्ये ९ देश हे आशियातील आहेत. आशियाबाहेरील फक्त ब्राझील पहिल्या १० देशांमध्ये येतो. हे देश जगातील ८५ टक्के तांदूळ उत्पादन करतात.

देशनिहाय तांदूळ उत्पादन वर्ष २०२१-२२ (दशलक्ष टन)

देश…उत्पादन

चीन…१४९

भारत…१२९.७

इंडोनेशिया…३४.४

बांगलादेश…३४

व्हिएतनाम…२७.३

फिलिपिन्स१२.५

म्यानमार…१२.३

पाकिस्तान…८.७

ब्राझील…७.३

इतर…९७.८

(स्रोत ः यूएसडीए)

Rice Export
Rice Procurement: एफसीआयला आढळली तेलंगणाच्या तांदूळ खरेदीत खोट?

जगातील तांदूळ निर्यात

मागील काही दिवसांपासून जगातील शेती क्षेत्रावर तीन महत्त्वाच्या घडामोडींचा मोठा प्रभाव पडला. त्यात पहिली गोष्ट म्हणजे कोरोनामुळे विस्कळीत झालेली शेतीमालाची जागतिक पुरवठा साखळी. दुसरी गोष्ट म्हणजे रशिया-युक्रेन युद्ध आणि तिसरी म्हणजे उष्ण तापमान. यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यांत विक्रमी उन्हाळा होता. याचा फटका जगातील पीक उत्पादनांवर झाला. कोरोनामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने माल वाहतुकीसाठी जहाजांची टंचाई, भाडेवाढ यामुळे शेतीमालाचे दर वाढले. तर रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली.

रशिया आणि युक्रेनमधून गव्हाचा पुरवठा ठप्प झाला. परिणामी, जगात गव्हाची टंचाई निर्माण झाली. गव्हाचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले होते. त्यामुळे गव्हाला पर्याय म्हणून अनेक देशांनी तांदळाची खरेदी वाढविली. परिणामी, तांदळाचेही दर वाढले. याचा फायदा निर्यातदार देशांनी घेतला. व्हिएतनाम, थायलँड आणि पाकिस्तान या देशांनी कार्टेल करून दर वाढविले. मात्र भारत यापासून दूर राहिला. परिणामी, भारतीय तांदळाचे दर या देशांच्या तुलनेत टनामागे ४० डॉलरपर्यंत कमी राहिले. म्हणून भारतीय तांदळाला मागणी वाढली.

जगातील महत्त्वाचे तांदूळ निर्यातदार देश (२०२१-२२) (लाख टन)

देश…निर्यात

भारत..२१०

थायलंड…७०

व्हिएतनाम…६५

पाकिस्तान…४३.५

अमेरिका…२६.७

बर्मा…२३

चीन…२२.५

ब्राझील…८.५

युरोपीय महासंघ…४.४

……….

(स्रोत ः यूएसडीए)

तांदूळ निर्यातीत भारत आघाडीवर

तांदूळ उत्पादनात चीन जगात अग्रेसर आहे. तसेच आयातीतही आघाडीवर आहे. चीनने २०२१-२२ या वर्षात तब्बल ५६ लाख टन तांदळाची आयात केली. दुसरीकडे भारत उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र निर्यातीत भारत जगात अव्वल आहे. २०२१-२२ या वर्षात जागतिक तांदूळ निर्यात ५२९ लाख टन झाली. त्यात भारताचा वाटा २१० लाख टनांचा होता. म्हणजेच एकट्या भारताने जगातील एकूण निर्यातीपैकी तब्बल ४० टक्के तांदूळ निर्यात केली. भारतानंतर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या थायलँडची निर्यात ७० लाख टनांवर होती. म्हणजेच भारताची निर्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या थायलँडपेक्षा तब्बल तीन पट अधिक आहे. यावरून जागतिक तांदूळ बाजारात भारताचे महत्त्व लक्षात येते.

भारतात मागील काही वर्षांपासून तांदूळ उत्पादन सतत वाढत आहे. भारतात तांदूळ उत्पादनात पश्‍चिम बंगाल आघाडीवर आहे. तर त्यानंतर उत्तर प्रदेशचा नंबर लागतो. त्यानंतर पंजाब, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, ओडिशा, आसाम आणि हरियानामध्ये उत्पादन होते.

भारतातील तांदूळ उत्पादन (दशलक्ष टन)

वर्ष…उत्पादन

२०१६-१७…१०९.७

२०१७-१८…११२.८

२०१८-१९…११६.५

२०१९-२०…११८.९

२०२०-२१…१२४.३

२०२१-२२…१२९.६

२०२२-२३…१३०.५

भारतातून होणारी तांदूळ निर्यात

भारत जगातील जवळपास १५० देशांना तांदूळ निर्यात करतो. परंतु एकूण निर्यातीपैकी ५७ टक्के निर्यात ही पहिल्या १० देशांना होते. यात नेपाळ, बेनीन, बांगलादेश, सेनेगल, टोगो, कोटे डी आयव्हरी, गिनी, मलेशिया, इराण, संयुक्त अरब अमिराती या देशांना भारत सर्वाधिक निर्यात करतो. सध्याच्या अन्नधान्य टंचाईच्या काळात इतर देश धान्याचा साठा करत असताना भारत मात्र निर्यात करत आहे. कोरोना काळात देशातून तांदूळ निर्यात वाढली. २०१९-२० च्या तुलनेत २०२०-२१ मध्ये तांदूळ निर्यात ८७ टक्क्यांनी वाढली. मात्र २०२१-२२ मध्ये पुन्हा कमी झाली.

भारतातून तांदूळ निर्यात (दशलक्ष टन)

वर्ष…बासमती…बिगर बासमती

२०१६-१७…१०.७७

२०१७-१८…१२.६५

२०१८-१९…१२

२०१९-२०…९.४९

२०२०-२१…१७.७२

२०२१-२२…११.७९

...या देशांना भारत करतो निर्यात

भारताच्या बासमती तांदूळ निर्यातीपैकी सौदी अरेबियाला २२ टक्के निर्यात झाली. तर इराणला १६ टक्के आणि इराकला १४ टक्के बासमती तांदूळ निर्यात झाला. बिगर बासमती तांदळाचा विचार करता नेपाळला ९.८ टक्के निर्यात झाली. तसेच बेनीन देशाला ९.४ टक्के, तर सेनेगलला ७.९ टक्के बिगर बासमती तांदूळ निर्यात झाला. भारताची तांदूळ निर्यात आशिया, आफ्रिका आणि युरोपीय महासंघामधील देशांमध्ये वाढत आहे. आफ्रिकी देश बिगर बासमती आणि त्यातही तुकडा तांदळाची खरेदी जास्त करतात. भारतीय तुकडा तांदळाला चीनची सर्वाधिक पसंती मिळत आहे.

भारताची बासमती तांदूळ निर्यात (लाख टन)

देश…निर्यात

सौदी अरेबिया…१०.३

इराण…७.५

इराक…६.४५

येमेन…३.३६

संयुक्त अरब अमिराती…२.२९

अमेरिका…१.८

कुवेत…१.७६

………….

भारताची बिगर बासमती तांदूळ निर्यात (लाख टन)

देश…निर्यात

नेपाळ…१२.९

बेनीन…१२.३१

सेनेगल…१०.३६

बांगलादेश…९.११

टोगो…७.८

कोटे डी आयव्हरी…७.३

गिनी…६.१

भारतातील तांदळाची स्थिती

भारतात गहू आणि तांदूळ हे मुख्य अन्नधान्य आहे. सरकार कल्याणकारी योजनांमध्ये या दोन धान्यांचे वितरण करत असते. आतापर्यंत या योजनांसाठी ६० टक्के गहू आणि ४० टक्के तांदूळ मिळत होता. मात्र आता सरकारने हे प्रमाण बदलून ४० टक्के गहू आणि ६० टक्के तांदूळ असे केले. देशातील घटलेले गहू उत्पादन आणि सरकारी खरेदी यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

सध्या सरकारकडे गव्हाचा ३११ लाख टन साठा आहे. हा साठा मागील १४ वर्षांतील नीचांकी आहे. यापूर्वी २००८ मध्ये २४१ लाख टन होता. तर गेल्या वर्षी ६०२ लाख टन गहू सरकारच्या गोदामात होता. यंदा गहू साठा जवळपास निम्म्यावर आला. त्यामुळे तांदळावरील भिस्त वाढली. मात्र सरकारकडे ३३१ लाख टन तांदूळ आहे. गहू आणि तांदूळ या दोन्हींचा साठा आवश्यकतेपेक्षा काहीसा जास्त आहे. परंतु सरकारला सप्टेंबरपर्यंत सार्वजनिक वितरण व्यवस्था (रेशन) आणि इतर कल्याणकारी योजनांसाठी ९७.५ लाख टन तांदूळ लागेल. तर ७५ लाख टन गहू द्यावा लागेल. तसेच पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेसाठी १३२ लाख टन तांदूळ आणि २८ लाख टन गहू पुरवावा लागणार आहे. म्हणजेच सरकारला सप्टेंबरपर्यंत या योजनांसाठी २२९ लाख टन तांदूळ आणि १०२ लाख टन गहू द्यावा लागणार आहे. एकूण साठ्यातून योजनांसाठीची गरज वगळता १०२ लाख टन तांदूळ आणि २०८ लाख टन गहू ऑक्टोबरमध्ये शिल्लक राहील. परंतु कायद्याप्रमाणे १ ऑक्टोबरला सरकारकडे १०३.२ लाख टन तांदूळ शिल्लक असणे गरजेचे आहे. म्हणजेच सरकारकडे कमी तांदूळ उपलब्ध असेल. तसेच या काळात सरकारची खरेदीही बंद असते. मग या परिस्थितीत सरकारने खुल्या बाजारात तांदळाची विक्री केल्यास साठा आवश्यकतेपेक्षा कमी होईल. परंतु तांदळाची निर्यात अशीच सुरू राहिल्यास खुल्या बाजारात दर आणखी वाढतील. हे दर कमी करण्यासाठी सरकारकडे दोन पर्याय असतील. एकतर निर्यातबंदी किंवा खुल्या बाजारात साठ्यातील तांदूळ विक्री. त्यामुळे पुढील काळात सरकार कसा मेळ घालते हे पाहावे लागेल.

तांदूळ निर्यातबंदी केल्यास काय होईल?

एकूण जागतिक तांदूळ निर्यातीत भारताचा वाटा तब्बल ४० टक्के आहे. तसेच इतर देशांच्या तुलनेत भारताचा तांदूळ स्वस्त असतो. भारताच्या नॉन बासमती तांदळाचे मुख्य आयातदार गरीब आणि मध्यम उत्पन्न असणारे देश आहेत. बिगर बासमती तांदळाची जवळपास १५० देशांना निर्यात केली जाते. यात जास्तीत देश गरीब आहेत. जागतिक बाजारात गहू महाग झाल्यानंतर या देशांनी तांदळाचा वापर वाढवला. या देशांना सध्या भारतातूनच स्वस्त तांदूळ मिळतो आहे.

या परिस्थितीत भारताने तांदूळ निर्यातबंदी केल्यास या देशांना मोठा फटका बसेल. गव्हाप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाचा तुटवडा निर्माण होऊन दर वाढतील. थायलँड, व्हिएतनाम आणि पाकिस्तान या संधीचा फायदा उचलतील. शिवाय भारतालाही आंतरराष्ट्रीय पातळीवर या देशांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com