Soybean Rate : सोयाबीन बाजाराला इंडोनेशियाच्या धोरणांचा आधार मिळणार?

इंडोनेशिया हे मुस्लिम बहुल राष्ट्र आहे. तिथे जवळपास ८६.७ टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. त्यामुळे तिथे रमजानचे महत्त्व खूप मोठे आहे. रमजान तोंडावर आलेला असताना खाद्यतेलाच्या किंमती भडकल्या आहेत.
Soybean Rate
Soybean RateAgrowon

Soybean Market Update इंडोनेशिया पामतेलाच्या निर्यातीवर (Pam Oil Export) काही बंधने आणण्याच्या तयारीत आहे. परंतु त्यामुळे भारतात खाद्यतेलाचा तुटवडा (Edible Oil Shortage) पडण्याची शक्यता नाही.

कारण गेल्या तीन महिन्यांत भारताने खाद्यतेलाची आक्रमक आयात (Edible Oil Import) केल्यामुळे देशात सध्या खाद्यतेलाचा विक्रमी साठा आहे. परंतु इंडोनेशियाच्या निर्णयामुळे आयात घटल्यास त्याचा फायदा सोयाबीनचे दर (Soybean Rate) वाढण्यासाठी होऊ शकतो, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.

रमजानमुळे इंडोनेशिया सरकारवर दबाव

इंडोनेशिया हे मुस्लिम बहुल राष्ट्र आहे. तिथे जवळपास ८६.७ टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. त्यामुळे तिथे रमजानचे महत्त्व खूप मोठे आहे. रमजान तोंडावर आलेला असताना खाद्यतेलाच्या किंमती भडकल्या आहेत.

त्यामुळे खाद्यतेलाचे दर कमी करण्यासाठी तेथील सरकारवर लोकांचा दबाव वाढला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पामतेलाच्या निर्यातीवर बंधने आणली जातील, काही निर्यात परवाने रद्द केले जातील, असे इंडोनेशिया सरकारने गेल्या आठवड्यात जाहीर केले.

Soybean Rate
Soybean Cotton Rate : केंद्र, राज्याकडून सोयाबीन, कापूस उत्पादकांची फसवणूक

गेल्या वर्षी सरसकट बंदी

गेल्या वर्षीही इंडोनेशियाने पामतेलाच्या निर्यात धोरणात अचानक बदला केला होता. पामतेलाच्या निर्यातीवर संपूर्ण बंदी घातली होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ उडाली होती. भारताला त्याचा मोठा फटका बसला होता.

भारताला खाद्यतेलाचा तुटवडा भरून काढण्यासाठी मलेशियाकडून आयात करणे भाग पडले होते. त्यावेळी मलेशियात पामतेलाचे दर आभाळाला भिडले होते. यंदा मात्र तशी परिस्थिती उद्भवणार नाही, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.

Soybean Rate
Soybean Rate : हिंगोलीत सोयाबीनला क्विंटलला सरासरी ५१०५ रुपये दर

यंदा केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या बाबतीत सुरूवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरकारने काही राज्यांतील विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेऊन महागाई रोखण्यासाठी खाद्यतेलाच्या आयातीचा सपाटा लावला.

गेल्या तीन महिन्यांत खाद्यतेलाची आयात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल २५ टक्के वाढली आहे. एक नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या पहिल्या तिमाहीत खाद्यतेलाची आयात सुमारे ४५ लाख टनावर पोहोचले.

Soybean Rate
Soybean Rate : सोयाबीनचे दर कोणत्या बाजारात वाढले? सर्वाधिक दर कुठे मिळाला?

खाद्यतेलाचा विक्रमी साठा

वाढत्या आयातीमुळे देशातील खाद्यतेलाचा साठा विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. एक फेब्रुवारीपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशातील खाद्यतेलाचा साठा ३६ लाख टन आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत साठा १८.३ लाख टन होता. म्हणजे साठा जवळपास दुप्पट झाला आहे.

‘‘इंडोनेशियाने पामतले निर्यातीवर बंधने घातली तरी त्यामुळे भारतात काही समस्या उद्भवणार नाही. साठ्याची स्थिती समाधानकारक आहे,'' असे सॉल्वेन्ट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (एसईए)चे अध्यक्ष अजय झुणझुणवाला म्हणाले.

पुढच्या महिन्यापासून मोहरीची आवक वेग पकडेल. गेल्या वर्षीपेक्षा यंदा मोहरीचे उत्पादन १० ते १५ टक्के वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे खाद्यतेलाची उपलब्धता वाढेल, असे झुणझुणवाला म्हणाले.

सूर्यफुल तेलाचा मुबलक पुरवठा

दरम्यान, एका ग्लोबल ट्रेड हाऊसच्या मुंबई येथील डिलरने सांगितले की, इंडोनेशियातील पामतेलाच्या निर्यातीवरील बंधने रमजानचा महिना संपल्यानंतर उठवली जाण्याची शक्यता आहे. रमजानचा महिना २१ एप्रिलला संपणार आहे.

‘‘यंदाची स्थिती वेगळी आहे. गेल्या वर्षी जेव्हा इंडोनेशियाने पामतेलाची निर्यात बंद केली होती, त्यावेळी बाजारात सूर्यफुल तेलाचा पुरवठा व्यवस्थित होत नव्हता.

कारण रशिया-युक्रेन युध्दामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झालेली होती. यंदा मात्र सूर्यफुल तेलाचा मुबलक पुरवठा आहे,'' असे या डिलरने सांगितले.

रशिया आणि युक्रेन त्यांच्याकडील सूर्यफुल तेलाचा साठा कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे भारताची सूर्यफुल आयात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जानेवारी महिन्यात भारताने विक्रमी ४ लाख ७३ हजार टन सूर्यफुल तेल आयात केले. सरासरी मासिक आयातीच्या हे प्रमाण जवळपास तिप्पट भरते.

यंदाही इंडोनेशियाच्या निर्बंधानंतर मलेशियातून पामतेलाची खरेदी वाढेल, परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत त्याचे प्रमाण खूप कमी राहील, असे सिंगापूर येथील एका डिलरने सांगितले.

इंडोनेशियाने गेल्या वर्षी पामतेलाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर तेथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्याची तीव्र प्रतिक्रिया तिथे उमटली. त्यामुळे यंदा इंडोनेशिया सरकारने सरसकट बंदी घालण्याऐवजी काही महिन्यांसाठी निर्यातीवर बंधने घालण्याच्या विचारात आहे, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com