Drought And Agriculture : दुष्काळात होरपळतेय जगाची शेती

जगातील अनेक देशांना यंदा दुष्काळाचा फटका बसत आहे. युरोपीय महासंघ, अमेरिका, चीन हे देश धान्य आणि इतर शेतीमाल उत्पादनात जगात आघाडीवर आहेत. परंतु या देशांसह इतर काही देश सध्या दुष्काळाच्या वणव्यात होरपळत आहेत. या देशांमधील धान्य, कापूस आणि तेलबिया उत्पादनावर परिणाम झाला आहे. यामुळे केवळ या देशांमध्येच नाही तर जागतिक पातळीवर शेतीमालाची टंचाई भासू शकते. या महत्त्वाच्या देशांमध्ये दुष्काळाची काय स्थिती आहे? याचा घेतलेला हा आढावा...
Agriculture
Agriculture Agrowon

जगाला बदलत्या वातावरणाचा (Climate Change) मागील काही वर्षांपासून फटका बसत आहे. अति पाऊस (Excessive Rain), अतिवृष्टी (Heavy Rain), ढगफुटी (Cloudburst), दुष्काळ (Drought), पूर, भूस्खलन (Landsliding), हिमस्खलन, हिमनग वितळणे आदी घटना वाढल्या आहेत. यामुळे मानवी जीवनावर परिणाम होत आहे. या वातावरण बदलाचा शेतीलाही मागील ७ वर्षांपासून जास्त फटका बसत आहे. तर यंदा अति पाऊस, पूर आणि दुष्काळामुळे शेतीचे नुकसान वाढले आहे. युरोपियन ड्रॉट ऑब्जर्वेटरीच्या अहवालानुसार यंदा जगातील तब्बल १३५ देशांना दुष्काळाचा कमी अधिक प्रमाणात फटका बसत आहे. या देशांमध्ये आधी उष्णतेची लाट आली आणि त्यानंतर आता कमी पावसामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली. यंदा जगातील शेती उत्पादनात महत्त्वाच्या असलेल्या तब्बल ३३ देशांमध्ये उष्णतेची लाट आली होती. यंदा जगातील मका, सोयाबीन, सूर्यफूल, कापूस, गहू, तांदूळ आदी पिकांच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, असेही या अहवालात म्हटले आहे.

दुष्काळाचा आफ्रिकेतील देशांना फार मोठा फटका बसत आहे. यात दक्षिण सुदान आणि युगांडामध्ये दुष्काळाची दाहकता भीषण आहे. तर सोमालिया, इथिओपिया, केनिया या देशांमध्येही पावसाचं प्रमाण कमी राहिले. परिणामी, या देशांमध्ये यंदा धान्य उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. म्हणजेच आफ्रिकेत यंदा अन्नसुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. युरोपला यंदा भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. दुष्काळामुळे युरोपमधील अनेक नद्या मागील काही महिन्यांपासून कोरड्या पडल्या. त्यामुळे बहुतेक देशांना पाणीटंचाई जाणवत आहेत. अनेक गावे आणि शहरांमध्ये पाण्याचा प्रश्‍न भीषण बनत आहे. अमेरिका आणि चीनमध्ये कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती आहे.

चीनमध्ये धान्य उत्पादन घटणार

चीनमध्ये यंदा अति उष्णता आणि दुष्काळ अशी स्थिती निर्माण झाली. सध्या चीनमधील जवळपास ६६ नद्या आटल्या आहेत. या नद्या पिकांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणारा प्रमुख स्रोत आहेत. केवळ नद्याच नाही आटल्या, तर शेती सिंचनासाठी महत्त्वाच्या असलेल्या तलावांमध्ये केवळ ३० ते ३५ टक्के पाणी आहे. बहुतेक तलाव ७० टक्क्यांपर्यंत आटले आहेत. काही प्रांत ५०० वर्षांतील सर्वांत जास्त उष्णतेची लाट सहन करीत आहेत. चीनमध्ये मका आणि भात पिकाला दुष्काळाचा फटका मोठा फटका बसत आहे. यांगत्से नदीच्या पात्रात ही दोन पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. मका पीक सध्या दाणे भरण्याच्या स्थितीत आहे. मात्र उष्णता आणि पाणीटंचाईमुळे उत्पादकतेवर परिणाम होत आहे. सध्या मका उत्पादक महत्त्वाच्या पाच प्रांतांमध्ये दुष्काळी स्थिती असल्याचे अहवाल आहेत. परिणामी, यंदा चीनमध्ये मका उत्पादन घटण्याची शक्यता आहे. असे झाल्यास चीनला अमेरिका आणि ब्राझीलमधून मका आयात करावा लागेल.

Agriculture
China Drought : दुष्काळामुळे चीनमध्ये धान्य उत्पादन घटणार

चीनधील सिचुआन प्रांतात तब्बल ७० दिवसांपेक्षा जास्त काळ उष्णतेची लाट होती. १९६१ नंतर प्रथमच एवढ्या प्रमाणात उष्णता वाढली होती. उष्णतेमुळे दुष्काळी स्थितीची दाहकता अधिक वाढली. त्यामुळे चीनमध्ये शेतीला देण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात करण्यात येत आहे. याचा शेती उत्पादनावर परिणाम परिणाम होत आहे. चीनच्या विविध विभागांनीही यंदा देशात धान्य उत्पादनात घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे चिनी सरकारपुढे यंदा अन्नसुरक्षेचा प्रश्‍न उभा असेल. पाण्याची कमी उपलब्धता असल्याने यंदा चीन कोळशाचा वापर वाढविण्याची शक्यता व्यक्त केली जाते. कारण चीनची जलविद्युत निर्मिती ५० टक्क्यांनी घटली आहे.

चीनमध्ये काय परिणाम होत आहे?

महत्त्वाच्या ६६ नद्या कोरड्या.

सिंचनासाठी महत्त्वाचे तलाव ७० टक्क्यांपर्यंत आटले.

शेती सिंचनासाठीचे पाणी कमी केले.

मका आणि भात पिकाला फटका बसत आहे. उत्पादन घटल्याने मका आयात

वाढवावी लागेल.

कापूस पिकाचेही उत्पादन घटण्याची शक्यता.

जलविद्युत उत्पादन निम्म्यावर.

अमेरिकेतील कापूस पिकाला मोठा फटका

यंदा दुष्काळाची झळ अमेरिकेलाही बसत आहे. अमेरिकेतील महत्त्वाच्या कापूस उत्पादक टेक्सास राज्यात यंदा दुष्काळाची तीव्रता जास्त आहे. या राज्यातील ९५ टक्के भागात दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे यंदा टेक्सासमधील शेतकरी आणि कापूस उद्योगाला किमान २०० काटी डाॅलरचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. टेक्सासमध्ये अनेक भागांतील कापूस पीक हातचे गेले. तर ज्या भागात पीक आहे तेथे उत्पादकता घटली. लब्बॉक भागात टेक्सास राज्यातील ६६ टक्के कापूस उत्पादन होते. तर अमेरिकेतील एकूण उत्पादनापैकी जवळपास ३५ टक्के आणि जगाच्या ४ टक्के उत्पादन होते. मात्र या भागात यंदा कापूस पिकाची स्थिती दयनीय आहे. येथे निम्मे पिकही हाती येईल की नाही याबाबत शंका आहे. टेक्सासमध्ये परिस्थिती चांगली असल्यास जवळपास ५०० कोटींची उलाढाल होते. मात्र यंदा ही उलाढाल ३०० कोटींपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. टेक्सासमधील कापूस उत्पादन यंदा निम्म्यावर येण्याची शक्यता असल्याने येथील जिनिंग कंपन्याही अडचणीत आल्या आहेत. हा अमेरिकेतील कापूस उद्योगालाच मोठा फटका आहे.

Agriculture
Cotton Production : अमेरिकेतील कापूस उत्पादन ४० टक्क्यांनी घटणार?

टेक्सास राज्यात केवळ कापूसच नाही तर इतर पिकांचंही नुकसान होत आहे. उष्णता आणि पाण्याअभावी पिके जळत आहेत. टेक्सास राज्यात दुग्धोत्पादनही मोठ्या प्रमाणात होते. मात्र चारापिकेही जळून जात आहेत. त्यामुळे गाईंना काय खाऊ घालावे हा प्रश्‍न शेतकऱ्यांपुढे आहे. राज्यात पाण्याचा साठा कमी असल्याने पाणी वापरावर बंधने आहेत. परिणामी, अनेक शेतकरी आपल्या गायी विकत आहेत. ही वेळ पहिल्यांदाच आल्याची भावना येथील शेतकरी माध्यमांकडे व्यक्त करत आहेत.

अमेरिकेत टेक्सासह इतर काही भागांमध्येही दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अमेरिकेतील धान्य उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत. परिणामी, यंदा अमेरिकेतील नागरिकांना दूध, धान्य आणि मांस यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. अमेरिकेत आधीच महागाई उच्चांकावर आहे. त्यातच दुष्काळी स्थितीमुळे आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

अमेरिकेतील स्थिती

कापूस पीक निम्म्यावर येण्याची शक्यता.

निम्म्या जिनिंग अडचणीत येण्याची शक्यता.

शेतकऱ्यांना २०० कोटी डॉलर फटका.

मका आणि सोयाबीनलाही फटका बसण्याचा अंदाज.

चारापिकांना पाण्याअभावी नुकसान.

पशुपालक पाणी आणि चाऱ्याअभावी संकटात.

शेतकऱ्यांवर गाई विकण्याची वेळ.

दूध, धान्य आणि मांस उत्पादनही घटणार.

जागतिक कापूस पुरवठा घटणार

चालू हंगामात जगातील भारत, अमेरिका आणि चीन या महत्त्वाच्या कापूस उत्पादक देशांमध्ये पिकाला फटका बसत आहे. भारतात मागील हंगामात कापसाची टंचाई होती. त्यामुळे भारताला कापूस आयात करावा लागला. मात्र यंदाही पाऊस, कीड-रोगांचा फटका कापूस पिकाला बसत आहे. परिणामी, यंदाही उत्पादन कमी राहून भारतावर कापूस आयात करण्याची वेळ येऊ शकते, असा अंदाज जागतिक पातळीवरील काही संस्था व्यक्त करत आहेत. तर चीनमध्ये अति उष्णतेचा फटका कापूस पिकाला बसत आहे. येथील उत्पादकता यंदा घटणार आहे. त्यामुळे चीनची भिस्तही आयातीवर असेल. अमेरिकेत तर यंदा उत्पादन ४० टक्क्यांनी कमी राहण्याची शक्यता आहे. अमेरिका हा जागतिक पातळीवर सर्वांत मोठा कापूस निर्यातदार देश आहे. तर दुसरा महत्त्वाचा निर्यातदार ब्राझीलही सध्या अति उष्णता आणि दुष्काळाच्या झळा सहन करत आहे. त्यामुळे ब्राझीलमधील कापूस उत्पादनही ३० टक्क्यांनी घटले आहे. म्हणजेच यंदा जगातील सर्वांत मोठा कापूस उत्पादक भारत, पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे कापूस निर्यातदार अमेरिका आणि ब्राझील, तसेच आयातदार चीन या सर्व देशांमध्ये कापूस उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. म्हणजेच जागतिक पातळीवर कापसाची टंचाई निर्माण होईल. परिणामी, जागतिक बाजारातच कापूस भाव खाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशातही कापसाचे दर वाढतील. देशातील शेतकऱ्यांना यंदा ९ हजार ते १० हजार रुपये दर मिळू शकतो, असा अंदाज यापूर्वीच जाणकारांनी व्यक्त केला आहे.

Agriculture
Cotton Production : अमेरिकेतील कापूस उत्पादन ४० टक्क्यांनी घटणार?

कापूस पिकाची स्थिती

भारत

पाऊस आणि कीड-रोगांचा प्रादुर्भाव

अमेरिका

दुष्काळामुळे उत्पादन ४० टक्क्यांनी घटण्याची शक्यता

चीन

कापूस पिकाला अति उष्णतेचा फटका

ब्राझील

अति उष्णता आणि दुष्काळामुळे उत्पादन ३० टक्क्यांनी घटले

दुष्काळाची झळ बसलेले देश

स्पेन, फ्रान्स, इटली, अल्बानिया, बोस्निया, हर्जेगोविना, बल्गेरिया, क्रोएशिया, कोसोवो, मॉन्टेनेग्रो, उत्तर मॅसेडोनिया, रोमानिया, सर्बिया आणि स्लोव्हेनिया.

या पिकांचे उत्पादन घटणार

मका, गहू, सोयाबीन, सूर्यफूल आणि चारापिके

पाणीटंचाईची स्थिती

अनेक तलाव आटले.

लहान नद्या कोरड्या पडल्या.

पिकांना सिंचन करण्यावर मर्यादा.

काही भागांत पिकांसाठी पाणी बंद.

अनेक शहरांची पाणीकपात.

शेकडो गावे पाणीटंचाईच्या विळख्यात.

पाण्याअभावी पशुपालन अडचणीत.

युरोपीय महासंघामधील धान्य उत्पादन घटणार

दुष्काळाचा सर्वाधिक फटका यंदा युरोपीय महासंघाला बसत आहे. युरोपातील अनेक देशांमध्ये उष्णतेची लाट आणि कमी पावसामुळे स्थिती बिकट बनली आहे. स्पेन, फ्रान्स, इटली, अल्बानिया, बोस्निया, हर्जेगोविना, बल्गेरिया, क्रोएशिया, कोसोवो, मॉन्टेनेग्रो, उत्तर मॅसेडोनिया, रोमानिया, सर्बिया आणि स्लोव्हेनिया या देशांना दुष्काळाचा फटका बसतो आहे. जगाला गहू पुरवठ्यात युरोपीय महासंघाचा मोठा वाटा आहे. जगाच्या एकूण गहू निर्यातीपैकी तब्बल ३० टक्के युरोपियन युनियन पुरवतो. मात्र २०२२-२३ च्या हंगामात येथे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा ५ टक्क्यांनी कमी राहण्याची शक्यता व्यक्त आहे. युरोपीय महासंघामधील गहू काढणी सध्या संपली आहे. पण पिकाला शेवटच्या टप्प्यात पाणीटंचाई आणि उष्णतेचा फटका बसला.

युरोपीय महासंघामध्ये मका उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा १५ टक्क्यांनी कमी राहण्याचा अंदाज आहे. यंदा मका लागवड गेल्या वर्षीपेक्षा कमी राहून उत्पादकता १३ टक्क्यांनी कमी राहीली. तर उत्पादन ६०० लाख टनांवर स्थिरावेल, असा अंदाज आहे. युरोपीय महासंघामधील इटली, स्पेन आणि फ्रान्स या देशांमध्ये सिंचनावर मका पीक घेतले जाते. मात्र पाण्याची उपलब्धता कमी असल्याने वापरावर मर्यादा घातल्या जात आहेत. मका, सोयाबीन आणि सूर्यफूल पीक ऐन फुले आणि दाणे भरण्याच्या स्थितीत असताना पाऊस नव्हता. दुष्काळामुळे चराई क्षेत्र कमी झाले. तर पशुखाद्य उत्पादनातही मोठी घट झाली. गाई आणि मेंढ्यांना खाद्याची टंचाई निर्माण होत आहे.

स्पेनमध्ये दुष्काळाची तीव्रता जास्त आहे. येथील संशोधकांच्या मते यंदा देशात अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली. दुष्काळामुळे स्पेनमधील कधीही न आटणारे जलाशये यंदा आटली. स्पेनमधील पिण्याच्या पाण्याच्या जलाशयांमध्ये निम्म्यापेक्षाही कमी पाणीसाठा शिल्लक आहे. स्पेनमध्ये सध्या पिण्याचा पाणीसाठा ४० टक्क्यांवर आला, असे येथील संशोधकांनी सांगितले. स्पेनमध्ये अनेक भागांत पेरण्या होऊ शकल्या नाहीत. तर ज्या भागात पेरण्या झाल्या तेथे पिकांचे पावसाअभावी भवितव्य अधांतरित आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com