गावातील पाईपलाईन गळतीची समस्या सुटणार; सिमेंट चेंबर्स, रोडबॉक्सला M.S चेअरचा पर्याय

आजकाल बऱ्याच गांवामध्ये अतिक्रमणामुळे अरुंद झालेले रस्ते, इलेक्ट्रीक पोलचे अडथळे, वाहनांची वाढलेली संख्या या कारणांमुळे पाणी पुरवठा व्यवस्थेत अडचणी येतात.
M.S Chair
M.S Chair

औरंगाबाद - ग्रामीण भागातील घरांना पाणी पुरवठा करणाऱ्या स्लुईस व्हॉल्वसाठी (Sluice Valve) सिमेंट चेंबर्स (Cement Chembers) किंवा रोडबॉक्स (Roadbox) बसवलेले असतात. मात्र, या चेंबर्सचा भार पाईपच्या जोडण्यांवर पडतो. बऱ्याचदा अवजड वाहने या चेंबर्सवरून जातात. त्यावेळी वाहनांच्या वजनांचा आणि चेंबर्सचा भार पाईपच्या जोडण्यांवर आल्याने त्याठिकाणी गळती सरू होते. अशावेळी सिमेंटचे चेंबर्स फोडून पाईपची दुरूस्ती करावी लागते. हे काम खर्चिक असल्याने अशा कामांसाठी खर्चाचं कारण पुढे करून दुरूस्तीची कामे केली जात नाहीत. परिणामी अशा गळती झालेल्या जोडण्यांमधून दुषित पाण्याचा पुरवठा होत राहतो. यावर औरंगाबाद जिल्हा परिषदेचे उप कार्यकारी अभियंता अशोक घुगे यांनी कमी खर्चात टिकाऊ अशा एमएस चेअर (M.S Chair) म्हणजे लोखंडी खुर्च्यांचा पर्याय शोधला आहे. ज्यामुळे आता गावातील पाईपलाईन फुटण्याची समस्या दूर झाली आहे. 

आजकाल बऱ्याच गांवामध्ये अतिक्रमणामुळे अरुंद झालेले रस्ते, इलेक्ट्रीक पोलचे (Electric Poll) अडथळे, वाहनांची वाढलेली संख्या या कारणांमुळे पाणी पुरवठा व्यवस्थेत अडचणी येतात. पाच वर्षांपूर्वी वैजापूर तालुक्यातील शिऊर गावातही अशाच अडचणी निर्माण झाल्या होत्या. यावर पर्याय शोधत पाणी वितरण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यात आल्या. पाणी वितरण व्यवस्थेमध्ये सर्व्हिस पाइप लाईन (Service Pipe Line) टाकण्यात आल्या आणि आवश्यक त्या आकारच्या एमएस चेअर व्हॉल्वच्या ठिकाणी चेंबर आणि रोडबॉक्सऐवजी बसविण्यात आल्या. या लोखंडी चेअर खालच्या बाजूला चौरंगासारख्या असून त्याखालून पाइप जातो. आणि वरील बाजूला एक लोखंडी पाइप असतो. ज्यामधून व्हॉल्व ऑपरेट होतो.

हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द, वैजापूर ग्रामीण या गावातील पाणी पुरवठा योजनेसाठी लोखंडी चेअरचा वापर करण्यात आला. या तिन्ही गावांमध्ये व्हॉल्वच्या ठिकाणी लिकेज झाले नाही. त्यामुळे दुरुस्तीचा खर्च तर वाचलाच परंतु पाणी दूषित होण्याचा धोकाही कमी झाला. याशिवाय एमएस चेअरमध्ये व्हॉल्व ऑपरेट करण्यासाठी जो लोखंडी पाइप वापरण्यात येतो त्याचा व्यास कमी करता येत असल्याने कोणीही साधा पाना वापरून व्हॉल्व कमी जास्त करून पाण्याची चोरी करता येत नाही. हा याचा आणखी एक फायदा आहे.

व्हिडीओ पाहा - 

शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातील प्रत्येक घराला नळाद्वारे समान दाबाने शुद्ध पाणी मिळावे. यासाठी जल जीवन मिशन कार्यक्रम ही योजना सध्या महाराष्ट्रात राबवली जात आहे. या योजने अंतर्गत सर्व गावांना प्रति माणशी ५५ लिटर या दराप्रमाणे शुद्ध पाणी पुरवठा करणे आणि प्रत्येक घरांना नळ जोडणी देणे या कामांचा समावेश आहे. शहरांप्रमाणेच गावांनाही नळाद्वारे समान दाबाने पाणी द्यायचे झाल्यास स्लुईस व्हॉल्वची संख्या वाढवावी लागणार आहे. सहाजिकच इतक्या मोठ्या प्रमाणावर व्हॉल्व बसविल्यास ते सुस्थितित राहावेत यासाठी हा प्रयोग राज्यभरात राबवण्याची गरज आहे. जेणेकरून ग्रामीण भागातीला नागरिकांनाही शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com